आजचा अग्रलेख : किती धोंडे पाडून घेणार?

अमेरिकेने फटकारल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कायम आहे ती चीनच्या ‘ऑक्सिजन’वर, पण युनोच्या सुरक्षा मंडळात हे चिनी ऑक्सिजनचे सिलिंडरदेखील त्या देशाच्या उपयोगास आले नाही. आधीच पाकिस्तान हा सध्या ‘आयसीयू’मध्ये गेला आहे. तेव्हा त्या देशाच्या पंतप्रधानांनी कश्मीर आणि हिंदुस्थानच्या बाबतीत नसती उठाठेव करण्यापेक्षा स्वतःच्या देशाकडे पाहावे. कश्मीरप्रश्नी जागतिक पातळीवर आणि आता युनोच्या सुरक्षा मंडळातही तुमचे तोंड काळेच झाले. स्वतःच्या पायावर आणखी किती धोंडे पाडून घेणार आहात?

हिंदुस्थानने कश्मीरप्रश्नी घेतलेल्या निर्णयामुळे थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानला सगळय़ा बाजूंनी थपडा बसत आहेत. तरीही तो देश ताळ्यावर यायला तयार नाही. घटनेचे 370 आणि 35-अ कलम रद्द करण्याचा हिंदुस्थानचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नेण्याचा प्रयत्न पाकड्यांनी चीनच्या मदतीने केला, पण तिथे हे दोन्ही देश तोंडघशीच पडले. याप्रश्नी दोन्ही देशांच्या मागणीनुसार सुरक्षा मंडळात बंद दाराआड शुक्रवारी चर्चा करण्यात आली, मात्र अपेक्षेप्रमाणे या दोन्ही देशांच्या हाती भोपळाच आला. जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर खुली चर्चा करावी अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली होती ती फेटाळली गेली. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात अनौपचारिक चर्चा करावी अशी मागणी चीनच्या मदतीने करण्यात आली. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असल्याने नियमानुसार तो अशी मागणी करू शकतो. त्यामुळे ही मागणी मान्य झाली, पण सुरक्षा मंडळाच्या पंधरापैकी बहुतेक सदस्य देशांनी हिंदुस्थानच्याच पारड्यात वजन टाकले. अगदी या बैठकीचे निवेदन करण्याची पाकिस्तान आणि चीनची मागणीही फेटाळली गेली. मंडळाचा अध्यक्ष असलेल्या पोलंडनेही

निवेदन करण्यास नकार 

दिला आणि चीन तसेच पाकिस्तान यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर स्वतंत्र निवेदन देण्याची वेळ आली. अर्थात त्याला काहीच अर्थ नव्हता. पाकिस्तानसारख्या देशासाठी ही नसती उठाठेव करून चीननेदेखील स्वतःचे तोंड पोळून घेतले. पाकड्यांना कश्मीरप्रश्नी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची सवयच आहे, पण सुरक्षा मंडळात चीननेदेखील तेच केले. मुळात सुरक्षा मंडळातील अशा अनौपचारिक चर्चेचे कुठेही इतिवृत्त नसते. त्यामुळे ‘कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर सुरक्षा मंडळात अनौपचारिक चर्चा झाली’ एवढेच समाधान चीन आणि पाकिस्तानला मिळाले असे फार तर म्हणता येईल. अर्थात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान दुसरे काय करू शकतात? युद्धासाठी सज्ज वगैरे असल्याच्या फुकाच्या डरकाळ्या फोडणे, हिंदुस्थानशी व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडणे, हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेली रेल्वेसेवा बंद करणे, सीमेपलीकडून गोळीबार करणे आणि ‘पुलवामा’सारख्या दहशतवादी हल्ल्यांच्या धमक्या देणे हेच उद्योग गेल्या काही दिवसांत पाकिस्तानचे सुरू आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्याचे नापाक उद्योग तर तो देश पूर्वीपासूनच करीत आहे. आताही त्यांनी तेच सुरू केले आहे आणि हिंदुस्थानी सैन्य नेहमीप्रमाणे त्याला मूंहतोड जवाब देत आहे. आपला एक जवान शुक्रवारी त्यात शहीद झाला असला तरी

आपल्या सैन्याने 

पाकड्यांच्या तीन चौक्या उद्ध्वस्त केल्या, दोन अधिकाऱ्यांसह पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. म्हणजे संयुक्त राष्ट्रांत तोंड पोळले आणि सीमेवर हात पोळले अशी सध्या पाकिस्तानची दारुण परिस्थिती झाली आहे. पाकड्यांचे शेपूट हिंदुस्थानबाबत पूर्वीपासूनच वाकडे आहे आणि आता युनोच्या सुरक्षा मंडळात ते ठेचले गेले तरी त्याची वळवळ कायमच राहणार हे उघड आहे. म्हणूनच ‘‘कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला सज्ज आहोत’’ अशा पोकळ गमजा पाकिस्तान करीत आहे. अमेरिकेने ‘‘तुमचे तुम्ही बघा’’ अशा शब्दांत फटकारल्यानंतरही पाकिस्तानची धुगधुगी आणि खुमखुमी कायम आहे ती चीनच्या ‘ऑक्सिजन’वर, पण युनोच्या सुरक्षा मंडळात हे चिनी ऑक्सिजनचे सिलिंडरदेखील त्या देशाच्या उपयोगास आले नाही. आधीच पाकिस्तान हा सध्या देशांतर्गत पातळीवर ‘आयसीयू’मध्ये गेला आहे. तेव्हा त्या देशाच्या पंतप्रधानांनी कश्मीर आणि हिंदुस्थानच्या बाबतीत नसती उठाठेव करण्यापेक्षा स्वतःच्या देशाकडे पाहावे. आकाशाला भिडलेली महागाई, दारिद्रय़, अनागोंदी या दुष्टचक्रात गुदमरलेली आपली अर्थव्यवस्था निदान स्वतःचा श्वास स्वतः कशी घेईल याचा प्रयत्न करावा. कश्मीरप्रश्नी जागतिक पातळीवर आणि आता युनोच्या सुरक्षा मंडळातही तुमचे तोंड काळेच झाले. स्वतःच्या पायावर आणखी किती धोंडे पाडून घेणार आहात?

आपली प्रतिक्रिया द्या