सामना अग्रलेख – इम्रान मियाँचे तालिबानप्रेम!

अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सर्व सैन्य माघारी घेत आहे आणि तिथे पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची चिन्हे दिसत असल्याने इम्रान खान यांना तालिबानप्रेमाचे भरते आले असावे. त्यामुळे तालिबानी म्हणजे सर्वसामान्य नागरिकअसे विधान इम्रान यांनी केले असावे. बामियानमधील भगवान बुद्धाच्या मूर्ती स्फोटकांनी उडविणारे, बुरखा घातला नाही म्हणून महिलांचे गळे चिरून हत्या करणारे, किरकोळ कारणावरून आपल्याच नागरिकांवर गोळय़ांचा वर्षाव करणारे, क्रूर कत्तली व हत्याकांडे घडवून त्याचे व्हिडीओ जारी करणारे तालिबानी म्हणजे सज्जन नागरिक आहेत, असे इम्रान मियाँना वाटत असेल तर पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला आहे असेच म्हणावे लागेल.

उचलली जीभ आणि लावली टाळय़ाला’ अशी एक मराठी म्हण आहे. बेताल बडबडीसाठी कुप्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. ‘तालिबानी लोक हे तर सामान्य नागरिक आहेत,’ असा दिव्य विचार इम्रान मियाँनी मांडला आहे. अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी तालिबान्यांवर स्तुतिसुमने उधळली आणि अमेरिकेच्या चुकांचा पाढा वाचला. अफगाणिस्तानातील विद्यमान स्थितीबद्दल अमेरिकाच जबाबदार आहे. अमेरिकेने तालिबान्यांना योग्य प्रकारे हाताळले नाही, तालिबानी काही लष्करी पोषाखात नसतात हे अमेरिकेला समजले नाही आणि अमेरिकेमुळेच अफगाणिस्तानची परिस्थिती आज बिकट झाली, असा आरोप इम्रान यांनी केला. अमेरिकेच्या चुका जरूर असतील, परंतु जगभरातील अतिरेकी संघटनांचे आश्रयस्थान असलेल्या आणि दहशतवादाला कायमस्वरूपी रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेच्या चुका दाखविण्याचा नैतिक अधिकार आहे काय, हा खरा प्रश्न आहे. ज्या तालिबानने आजवर अफगाणिस्तानात हजारो निरपराध लोकांचे बळी घेतले, शेकडो हत्याकांडे घडविली ते तालिबानी राक्षस म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत, हे इम्रान खान यांचे विधान म्हणजे या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. मुळात तालि बान काय चीज आहे हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. असे असताना

तालिबानचे प्रवक्ते

असल्याच्या थाटात इम्रान खान यांनी तालिबानची नसती ओळख करून देत स्वतःचेच हसे करून घेतले आहे. अर्थात कश्मीरमध्ये मारल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांचा ‘शहीद’ असा उल्लेख करणाऱ्या पाकिस्तान्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार! उलट तालिबानी म्हणजे अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर धाडलेले थोर संतमहात्मे व देवदूत आहेत, असा उल्लेख इम्रान मियाँनी केला नाही हे नशीबच म्हणायचे. आम्ही तालिबानचे समर्थक नाही किंवा पाकिस्तानने तालिबान्यांना आश्रय दिलेला नाही, असे दावे हजारेक वेळा तरी पाकिस्तानच्या पंतप्रधान व लष्करप्रमुखांनी आजवर केले असतील. मात्र, खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानचा कैवार घेऊन त्यांना निरागस ठरविण्यासाठी जी वकिली केली आहे, त्यामुळे पाकिस्तानने आजवर केलेले सर्व दावे तद्दन खोटे होते हे आपोआपच सिद्ध झाले. अमेरिकेने ‘9/11’ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई करून तालिबान्यांची राजवट उलथवून लावली, तेव्हापासून पाकिस्ताननेच तालिबान्यांना पोसले. अमेरिका आणि तालिबान यांच्यातील संघर्षात खुद्द पाकिस्तानचेही 70 हजारहून अधिक नागरिक मरण पावले, असे इम्रान खान यांनी याच मुलाखतीत सांगितले आहे. अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून तालिबानी अतिरेकी

पाकिस्तानच्या गोधडीत

दबा धरून बसत होते, म्हणून तर अमेरिकेने पाकिस्तानच्या हद्दीत हल्ले चढविले. या हल्ल्यांत गव्हासोबत किडे रगडावेत तसे पाकिस्तानचे असंख्य निरपराध नागरिकही मरण पावले. एरवी हिंदुस्थानविरोधात ऊठसूट अणुबॉम्बच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने त्यांचे 70 हजार नागरिक मारल्याचा जाब अमेरिकेला का विचारला नाही, हा प्रश्नही उरतोच. तालिबान्यांचे पालनपोषण केल्यामुळेच पाकड्यांनी तोंड दाबून हा बुक्क्यांचा मार निमूटपणे सहन केला. आता अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सर्व सैन्य माघारी घेत आहे आणि तिथे पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची चिन्हे दिसत असल्याने इम्रान खान यांना तालिबानप्रेमाचे भरते आले असावे. त्यामुळे ‘तालिबानी म्हणजे सर्वसामान्य नागरिक’ असे विधान इम्रान यांनी केले असावे. मात्र, तालिबानला निरागस नागरिक म्हणणे म्हणजे ओसामा बिन लादेन आणि किंम जोंग उन यांना शांतिदूत म्हणण्यासारखे आहे.  बामियानमधील भगवान बुद्धाच्या मूर्ती स्फोटकांनी उडविणारे, बुरखा घातला नाही म्हणून महिलांचे गळे चिरून हत्या करणारे, किरकोळ कारणावरून आपल्याच नागरिकांवर गोळ्यांचा वर्षाव करणारे, क्रूर कत्तली व हत्याकांडे घडवून त्याचे व्हिडीओ जारी करणारे तालिबानी म्हणजे सज्जन नागरिक आहेत, असे इम्रान मियाँना वाटत असेल तर पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला आहे असेच म्हणावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या