
देशाच्या पंतप्रधानांनी भाषण कसे करावे? भाषण निःपक्ष असावे. संसदेत बोलताना कोणती पथ्ये पाळावीत याचे राजकीय संकेत ठरलेले आहेत. मोदी यांनी प्रथम संसदेत पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायरीवर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. आज सात वर्षांत तीच संसद व लोकशाही अश्रू ढाळत असेल! इतके अराजक माजवले गेले आहे. पंतप्रधान मोदी यांना जे लोक भाषणे लिहून देतात त्यांनी मोदींना खोटे पाडायचे कंत्राट घेतलेले दिसते. कारण मोदींच्या भाषणांतील संदर्भ रोजच चुकत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे संसदेत भाषणे केली. आम्ही आहोत म्हणून देश आहे असाच सूर त्यांच्या बोलण्यातून दिसला. पाच राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे संसदेच्या व्यासपीठावरून मोदी यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराचे भाषण केले. त्याच वेळी संसदेत त्यांच्याच मंत्र्याने माहिती सादर केली की, ‘गेल्या दोन वर्षांत गरिबी व आर्थिक तंगीस कंटाळून पंचवीस हजार लोकांनी आत्महत्या केल्या.’ हा सरकारी आकडा आहे. खरा आकडा लाखोंत असू शकतो. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी या अशा प्रश्नांवर काहीच भाष्य केले नाही. साडेचार कोटी बेरोजगार नव्याने निर्माण झाले व त्यातून असंतोषाचा भडका उडणार आहे. पण नेहमीप्रमाणे त्यांनी जाहीर केले की, ज्या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या राज्यांत भारतीय जनता पक्षाची लाट उसळली आहे व निवडणुका आपणच जिंकणार. देशाच्या पंतप्रधानांनी भाषण कसे करावे? भाषण निःपक्ष असावे. संसदेत बोलताना कोणती पथ्ये पाळावीत याचे राजकीय संकेत ठरलेले आहेत. मोदी यांनी प्रथम संसदेत पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायरीवर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. आज सात वर्षांत तीच संसद व लोकशाही अश्रू ढाळत असेल! इतके अराजक माजवले गेले आहे. संसदेपासून बाहेर सार्वजनिक व्यासपीठावरून पंडित नेहरू, गांधी, काँग्रेस यावर बेताल तोंडसुख घेणे म्हणजे राज्य करणे नव्हे. उत्तर प्रदेशातील निवडणुका कठीण जात आहेत. म्हणून कर्नाटकात ‘हिजाब’वरून दंगे पेटवले जात आहेत. ‘हिजाब’ हा काही दंगे पेटविण्याचा, हिंदू-मुसलमानांत भडके उडविण्याचा विषय होऊ शकत नाही. पण हिंदू, मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तान असे खेळ केल्याशिवाय या लोकांना निवडणुका लढवता येत नाहीत. काँग्रेस अनेक राज्यांत कमजोर झाली, पण तरीही काँग्रेसवर हल्ले करायचे. सात वर्षांत आपण काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने काँग्रेसने काही केले नाही, असे सांगावे लागते.
गोव्याची निवडणूक
हे त्याचे महत्त्वाचे उदाहरण. नेहरू नसते तर गोवा 1947 सालीच स्वतंत्र झाला असता, असे मोदी-शहा सांगतात. गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून उशिरा सुटला याचे खापर काँग्रेसवर फोडले हे ठीक, पण महाराष्ट्रातून, बिहारातून जे स्वातंत्र्यसैनिकांचे जथे गोव्यात पोहोचले त्यात संघ परिवाराचे किती लोक छातीवर गोळय़ा झेलण्यासाठी पुढे होते? गोव्यात भाजपच्या काळात पराकोटीचा भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच गोव्यातील भ्रष्टाचाराचा स्फोट केला. आता प्रचारात गोव्यास आत्मनिर्भर, स्वर्णीम गोवा बनविण्याचे बोलले जात आहे. पंतप्रधानांच्या भाषणांचे संग्रह ग्रंथरूपात प्रसिद्ध होत असतात. कारण संदर्भग्रंथ म्हणून त्याचा उपयोग होत असतो. पण मोदी यांच्या भाषणांचा जर ग्रंथ निघाला तर त्यातील काही भाषणे गाळावी लागतील. कारण त्यात काही चुका आहेत. तेव्हा पंतप्रधानांचे भाषण बिनचूक असावे याचे भान काटेकोरपणे ठेवले गेलेच पाहिजे. मात्र पंतप्रधान मोदी यांना जे लोक भाषणे लिहून देतात त्यांनी मोदींना खोटे पाडायचे कंत्राट घेतलेले दिसते. कारण मोदींच्या भाषणांतील संदर्भ रोजच चुकत आहेत. गोव्यात निवडणुका असल्याने त्यांनी मंगेशकर कुटुंब आणि गोव्याच्या नातेसंबंधांवर काही माहिती दिली. लता मंगेशकर यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर हे आकाशवाणीवर नोकरीस होते. तेथे नोकरीत असताना पंडितजींनी वीर सावरकरांच्या काही गीतांना चाली लावल्या. त्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली असा ठपका मोदींनी ठेवला. खरे तर आता या गोष्टीला अनेक दशके उलटून गेली आणि त्याबाबत तसे अधिकृत रेकॉर्डही कुठे उपलब्ध नाही. मुळात एवढय़ा दशकांनंतर आणि सावरकरांचा तसा काही विषय नसताना पंतप्रधानांनी हा विषय उकरून काढत त्यावर भाष्य करण्याची गरज नव्हती. दुसरे असे की, वीर सावरकरांची गाजलेली अनेक गाणी वर्षानुवर्षे आकाशवाणीवर वाजत आहेत. ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, ‘शतजन्म शोधिताना’ यांसारखी नाटय़पदे
आकाशवाणीमुळेच
घराघरांत पोहोचली. सावरकरांवर राग असता तर सावरकरांच्या गाण्यांवरही बंदी घातली असती. ‘सागरा प्राण तळमळला’ या गीताच्या लोकप्रियतेचे श्रेय तर आकाशवाणीलाच द्यावे लागेल. मग मोदी यांनी वीर सावरकरांबाबत ही चुकीची, दिशाभूल करणारी माहिती संसदेत का द्यावी, हे कोडेच आहे. त्यांचे भाषण ज्यांनी लिहून दिले त्याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यायचे राहिले बाजूला, पण गोव्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोदी यांनी भलत्याच विषयाला हात घातला. तो त्यांना त्रासदायक ठरल्याशिवाय राहणार नाही. गोव्यातील पोर्तुगीज स्वातंत्र्यानंतरही पंधरा वर्षे गोव्यातच बसून राहिले. ही नेहरू किंवा काँग्रेसची कमजोरी असेल. नेहरूंनी स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली नाही, मदतीस सैन्य पाठवले नाही, असे आता मोदी व शहा सांगतात. पण लडाख हा संपूर्ण हिंदुस्थानचाच भाग असताना तेथे चिनी सैन्य घुसून बसले आहे. ते चिनी सैन्य हुसकावण्यासाठी तर पंडित नेहरू किंवा राहुल गांधींची परवानगी लागणार नाही. पोर्तुगीज तीनेकशे वर्षांपासूनच गोव्यात ठाण मांडून होते. पण चिनी सैन्य गेल्या वर्षभरात लडाखमध्ये घुसले आहे. ते कसे बाहेर काढणार? यावर पंतप्रधानांनी देशाला मार्गदर्शन केले असते तर राष्ट्राला सत्य समजून घेता आले असते. मोदींचे लोक इतर राज्यांतील भ्रष्टाचारावर बोलतात. जेथे भाजपचे मुख्यमंत्री नाहीत तेथे ईडी, आयकरवाले चौकशी व धाडी टाकतात. पण भाजपशासित राज्यांत तर लुटमारीस ऊत आला आहे. मध्य प्रदेश हे भाजपशासित आदर्श राज्य असल्याचे बोलले जाते. तेथे कन्याविवाह योजनेत कोटय़वधींचा घोटाळा झाला आहे. म्हणजे गरीबांच्या लग्नांत घोटाळे करण्याचा विश्वविक्रम या राज्याने केला आहे. मध्य प्रदेशातील प्रत्येक विभागात घोटाळे सुरू आहेत, पण भ्रष्टाचारावरून अटक झाली ती पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्या भाच्याला. ईडी, सी.बी.आय. ओव्हर टाइम करीत आहेत ते प. बंगाल आणि महाराष्ट्रात. 2024 पर्यंत हे सर्व सहन करावे लागेल.