सामना अग्रलेख – नाकी नऊ!

मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळय़ा गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या दृष्टीने ‘मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी’, पण प्रत्यक्षात हा प्राचीन देश म्हणजे एका व्यक्तीच्या हाती असलेला ‘सन्गोल’ म्हणजे राजदंड नाही. मोदींनी 28 तारखेस नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यात राजदंडाचे प्रतीक बसवले ते स्वतःची राजेशाही स्थापित करण्यासाठी. आता या नव्या राजेशाहीमुळे जगात देशाची मान कशी उंचावली? भारत म्हणजे लोकशाहीची जननी आहे. ही जननी राजदंडात नाही. राजदंडातील राजधर्माचे पालन सध्या होत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे. अशा वेळी राजदंड काय करणार? मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे!

श्री.नरेंद्र मोदी व त्यांचे सध्याचे सहकारी म्हणजे कमाल आहे. खोटारडेपणाच्या बाबतीत एकाला झाकावे व दुसऱयाला काढावे असेच एकापेक्षा एक असे सरस लोक आहेत. मोदी सरकारला नऊ वर्षे झाली व त्यानिमित्त मोदींच्या माणसांनी खोटेपणाची बहार उडवून दिली आहे. देशभरात केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा सुरू आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबईत आल्या व त्यांनी खोटेपणावर कळस चढवला. मोदींमुळे देशाला मान मिळाला, जगभरात भारताची मान उंच झाली वगैरे हास्यतुषार त्यांनी उडवले. मोदी 2014 साली पंतप्रधानपदी आले. त्याआधी जगात देशाला मान नव्हता असे निर्मलांना सांगायचे आहे काय? मोदी व त्यांच्या अंध भक्तांच्या दृष्टीने हिंदुस्थान 2014 नंतरच निर्माण झाला. त्याआधी हा देश अस्तित्वात नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात व देशाच्या उभारणीत कोणतेही योगदान नसलेला राजकीय पक्ष गेल्या नऊ वर्षांपासून सत्तेवर आहे व हीच नऊ वर्षे म्हणजे देश असे त्याचे सांगणे आहे. मोदींमुळे जगात मान वाढला. म्हणजे कसा? अंध भक्तांनी मोदींविषयी अनेक कल्पित कथा पसरवल्या. मोदी हे नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आले. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी असे सांगितले की, मोदी हेच ‘बॉस’ आहेत, पण त्याच ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानातील पाच राज्यांतील विद्यार्थ्यांना व्हिसा नाकारला आहे. सात राज्यांवर निर्बंधच घातले. मोदी ‘बॉस’ असल्याचे हे लक्षण कसे मानायचे? जपानमध्ये ‘क्वॉड’ परिषद झाली. तेथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन होते. मोदी भक्तांनी असे पसरवले की, मोदी यांच्या जागतिक प्रभावामुळे बायडेन प्रभावित झाले. त्यांनी मोदींना विचारलं, ‘‘तुम्ही इतकी वर्षे राष्ट्रीय राजकारणात कसे काय टिकलात? त्याचा मंत्र काय?’’ मुळात बायडेन यांचे वय 80 आहे व ते 1971 पासून अमेरिकेच्या सिनेटवर आहेत. त्यामुळे बायडेन मोदींकडे यशाचा मंत्र विचारतील हे शक्य नाही, पण भक्तांनी तसे पसरवले. बायडेन हे मोदींचे इतके फॅन बनले की, त्यांनी मोदींचा ऑटोग्राफ घेतला. हे असे घडले याची

एक ओळीची बातमी

अमेरिकेच्या मीडियात नाही. अशा बातम्या पसरवल्यामुळे पंतप्रधानांचे हसे होते हे भक्तांनी समजून घेतले पाहिजे. मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन व युव्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात गोड समझोता केला असून दोन देशांतले युद्ध मोदींमुळे शांत झाल्याची पुडी भक्तांनी मोदी जपानच्या दौऱयावर असताना सोडली. प्रत्यक्षात चित्र असे आहे की, पुतीन यांनी युव्रेनवर हल्ले वाढवले आहेत. युव्रेनची पुरती राखरांगोळी करायची हे पुतीन यांनी ठरवले आहे. युक्रेननेही रशियावर ड्रोन हल्ले चढवून मोठे नुकसान केले आहे. युरोप, अमेरिका, नाटो, युनोचे ऐकायला पुतीन तयार नाहीत तेथे मोदी यांनी युद्ध शांत केले असे सांगण्याचा मूर्खपणा भक्त मंडळी कसा करू शकतात? अर्थात निर्मला सीतारामन यांच्यासारखे तोंडपुंजे असल्यावर दुसरे काय व्हायचे? सीतारामन यांनी असेही सांगितले की, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी देशाला दहशतवादापासून मुक्त केले असून मोदी यांच्या धाडसी पावलांमुळेच जगाने भारताची वाहव्वा केली आहे!’’ मुळात आजही कश्मीर खोऱयात हिंसाचार थांबलेला नाही, जवानांच्या हत्या सुरूच आहेत. कश्मिरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत. नऊ वर्षांतील मोदी राज्यातील हे खरे चित्र आहे. गेल्या एक महिन्यापासून देशातील मणिपूर राज्य हिंसेच्या आगीत पेटले आहे व शेकडो लोक त्यात मारले गेले. गृहमंत्री अमित शहा मणिपूरचा वणवा शांत करू शकलेले नाहीत. मोदींनी देश दहशतवादमुक्त केला तो हा असा काय? देशाच्या राजधानीत दिल्लीत रोज मुली व महिलांवर अत्याचार व हत्या होत आहेत. महिला कुस्तीपटू त्यांच्यावरील अत्याचारांविरोधात दिल्लीच्या रस्त्यावर एक महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. काल जेव्हा दिल्लीतल्या संसद भवनाचे उद्घाटन मोदी करीत होते त्याच वेळी या महिला कुस्तीपटूंना केंद्राचे पोलीस फरफटत पोलीस व्हॅनमध्ये कोंबत होते. हासुद्धा एक प्रकारचा सरकारी दहशतवाद आहे. त्यामुळे भारतास दहशतवादापासून मुक्त केले म्हणजे नक्की काय केले? हा सवाल आहे. निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे की, ‘‘या सरकारच्या काळात 80 कोटी लोकांना

मोफत धान्य

दिले ही मोदींची कृपाच आहे!’’ खरं तर 140 कोटी लोकसंख्येपैकी 80 कोटी लोकांना आजही सरकारच्या रेशनवर गुजराणा करावा लागतो, ते स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनू शकत नाहीत हा मोदींचा पराभव आहे. 80 कोटी लोक सरकारी भिकेवर जगतात यास सीतारामन विकासाचे मॉडेल मानतात काय? पेट्रोल, डिझेल महागले, स्वयंपाकाचा गॅस, कडधान्य, शिक्षण, वाहतूक सर्वच महागले, पण महागाईला मोदींचे सरकार जबाबदार नसून सूर्य, चंद्र म्हणजे निसर्ग जबाबदार असल्याची मुक्ताफळे सीतारामन यांनी उधळली होती. नोटाबंदीसारखे प्रयोग फसले आहेत. नऊ वर्षांत दोन वेळा नोटाबंदी करून मोदी सरकारने काय साधले? अर्थव्यवस्था ढिसाळ केली. दोन हजारांची नोट आणतात काय आणि लगेच रद्द करतात काय? सगळाच खेळखंडोबा सुरू आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. काळा पैसा वापरून विरोधकांची सरकारे पाडण्यात आली. या सगळय़ा गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या दृष्टीने ‘मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी’, पण प्रत्यक्षात हा प्राचीन देश म्हणजे एका व्यक्तीच्या हाती असलेला ‘सन्गोल’ म्हणजे राजदंड नाही. मोदींनी 28 तारखेस नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यात राजदंडाचे प्रतीक बसवले ते स्वतःची राजेशाही स्थापित करण्यासाठी. आता या नव्या राजेशाहीमुळे जगात देशाची मान कशी उंचावली? भारत म्हणजे लोकशाहीची जननी आहे. ही जननी राजदंडात नाही. राजदंडातील राजधर्माचे पालन सध्या होत नाही, भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात आहे. अशा वेळी राजदंड काय करणार? मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे!