सामना अग्रलेख – डॉ. प्रियंकाचा तळतळाट… माणसांतील जनावरे!

6291

प्राण्यांची डॉक्टर असलेल्या प्रियंकावर माणसांतील जनावरांनी बलात्कार केला. सामूहिक अत्याचार करून तिला जाळून टाकले. प्रियंकाच नव्हे तर तिच्यासोबत माणूसकीही जळून भस्मसात झाली. कायदेकानून तर आहेतच. प्रियंकाच्या गुन्हेगारांना भविष्यात कदाचित फाशीची शिक्षा होईलही. पण तेवढेच पुरेसे नाही. बलात्काराची भयंकर विकृती रोखण्यासाठी समाजाला आता पुढाकार घ्यावाच लागेल. अन्यथा समस्त मानवजातीला प्रियंकाचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही!

 हिंदुस्थानातील तमाम जनतेची मान शरमेने खाली झुकावी अशी क्रूर घटना तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे घडली आहे. डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला आणि आपल्या राक्षसी गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. डॉ. प्रियंका जळून भस्मसात झाली. शंभर टक्के जळाल्याने तिच्या देहाचा जागेवरच कोळसा झाला. तमाम मानवजातीला काळिमा फासणारी ही घटना घडून आता एक आठवडा उलटला पण अजूनही देशभरात या नृशंस आणि निर्घृण घटनेचे पडसाद म्हणावे तसे उमटले नाहीत, हे डॉ. प्रियंकाचे दुर्दैवच म्हणायला हवे. डॉ. प्रियंका ही तशी व्हेटरनरी म्हणजेच जनावरांची डॉक्टर. गुरा-ढोरांवर, प्राण्यांवर सहजपणे उपचार करणारी डॉ. प्रियंका ज्या क्लिनिकमध्ये काम करत होती तिथे येणाऱ्या सर्वच प्राण्यांसोबत ती सहजपणे वावरायची. दररोज जनावरांसोबत राहूनही प्रियंकाला त्यांच्यातला हिंस्त्रपणा कधी जाणवला नाही, पण माणसांतील ‘जनावरां’समोर मात्र ती हतबल झाली, उद्ध्वस्त झाली आणि संपली. 27 नोव्हेंबरच्या रात्री डॉ. प्रियंकाच्या भविष्यातील सुंदर स्वप्नांचा चक्काचूर झाला. सकाळी नेहमीप्रमाणे हैदराबादहून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या शमशादबाग येथील क्लिनिकमध्ये ड्युटीला जाण्यासाठी डॉ. प्रियंका आपल्या स्कुटीवरून निघाली. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे अर्धे अंतर ओलांडाल्यानंतर येणाऱ्या

टोल प्लाझावर

स्कुटी पार्क करुन ती पुढे कॅबने क्लिनिकला पोहचली. ड्युटीनंतर स्वतःच्या उपचारासाठी एका डॉक्टरला भेटून टोल प्लाझावर पोहचेपर्यंत रात्र झाली होती. सकाळपासूनच तिच्या मागावर असलेल्या गुन्हेगारांनी तिची स्कुटी मुद्दाम पंक्चर करून ठेवली होती. त्यामुळे घाबरलेल्या प्रियंकाने बहिणीला फोन केला आणि हकीकत सांगितली. बहिणीने स्कुटी तिथेच ठेऊन सरळ कॅबने घरी येण्याचा सल्ला दिला. पण पुढे काय वाढून ठेवले आहे याची प्रियंकाला काय खबर? उद्या परत क्लिनिकला जाताना गाडी लागणार म्हणून तिने पंक्चरचे दुकान शोधण्यासाठी विचारपूस सुरू केली. गाडी पंक्चर करून ठेवणाऱ्या टोळक्यातील एकेक जण मदतीचा बहाणा करत होता. प्रियंकाने पुन्हा बहिणीला फोन लावला आणि खूप भीती वाटत असल्याचे सांगितले. आता मात्र मी कॅबने येते आहे असे तीने बहिणीला सांगितले आणि त्याच वेळी फोन स्विचऑफ झाला. त्याच क्षणाला प्रियंकाचा घात झाला होता. प्रियंकाची शिकार करण्यासाठी सकाळपासून टपलेल्या नराधमांनी तिला टोल प्लाझापासून काही अंतरावर नेले आणि दोन ट्रक्सच्या आडोशामागे तिच्यावर भयंकर अत्याचार केले. मदतीसाठी प्रियंकांने जिवाच्या आकांताने टाहो फोडला पण निर्जन काळोखात तिच्या किंकाळय़ा विरून गेल्या. आपल्या कृत्याची वाच्यता कुठे होऊ नये म्हणूनच चारही क्रूरकर्म्यांनी बलात्कारानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी डॉ. प्रियंकाला जाळून भस्मसात केले. राक्षस, नराधम, पाशवी

हे शब्दही थिटे पडावेत

एवढे भयंकर क्रौर्य डॉ. प्रियंकाने सहन केले. टोल प्लाझाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या चारही गुन्हेगारांना आता अटक केली आहे. चौघांनीही आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली आहे. या भयंकर घटनेनंतर तेलंगणात सर्वत्र संतापाचा आगडोंब उसळला. प्रियंकाला जाळणाऱ्या आमच्या मुलांनाही तशीच शिक्षा मिळावी अशी संतप्त प्रतिक्रिया चारही नराधमांच्या आईंनी आता नोंदवली आहे. माणूसकीला काळिमा फासणाऱ्या या भयंकर घटनेचे पडसाद तेलंगणाबाहेर मात्र फारसे उमटताना दिसले नाहीत. 2012 साली देशाच्या राजधानीत निर्भयाच्या बाबतीत जे क्रौर्य घडले आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात जो संतापाचा लाव्हा उसळला तो डॉ. प्रियंकाच्या बाबतीत का उसळू नये? दिल्लीच्या निर्भयाला मृत्यूनंतर न्याय मिळाला. तोच न्याय हैदराबादच्या प्रियंकाला मिळणार आहे काय? प्राण्यांची डॉक्टर असलेल्या प्रियंकावर माणसांतील जनावरांनी बलात्कार केला. सामूहिक अत्याचार करून तिला जाळून टाकले. प्रियंकाच नव्हे तर तिच्यासोबत माणूसकीही जळून भस्मसात झाली. कायदेकानून तर आहेतच. प्रियंकाच्या गुन्हेगारांना भविष्यात कदाचित फाशीची शिक्षा होईलही. पण तेवढेच पुरेसे नाही. बलात्काराची भयंकर विकृती रोखण्यासाठी समाजाला आता पुढाकार घ्यावाच लागेल. अन्यथा समस्त मानवजातीला  प्रियंकाचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही!

आपली प्रतिक्रिया द्या