आजचा अग्रलेख : ठरल्याप्रमाणे होईल!

108

मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंचावर आले व उरलीसुरली किल्मिषे त्यांनी दूर केली. ते शिवसेनेसाठी अतिथी नव्हते तर आमच्यातलेच एक होते. उद्याच्या विधानसभेत युतीला दिल्लीप्रमाणे मोठे बहुमत मिळावे यासाठीच एकदिलाने काम केले पाहिजे. युतीची वज्रमूठ अभेद्य आहे. फडणवीसांनी सांगितले, ‘त्यांना सत्ता खुर्ची आणि पदासाठी नको आहे.’ आम्हीही तेच सांगत आहोत. इतरही अनेक विषय आहेत. त्यावर नंतर पाहू. बाकी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेच, ‘‘सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल!’’

शिवसेनेचा 53 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला. शिवसैनिकांचे सगळे दिलखुलास असते. त्यामुळे 53 व्या वर्धापन दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांचे त्याच दिलदारीने स्वागत केले गेले. षण्मुखानंद सभागृह आत आणि बाहेरही गच्च भरले होते. ही बंदिस्त ऊर्जा असते. ‘‘शिवसैनिकांकडून ऊर्जा घेण्यासाठी मी येथे आलो आहे,’’ असे मुख्यमंत्री सहज बोलून गेले, पण समोरची उसळती ऊर्जा पाहून तेही त्या जल्लोषाचा एक भाग बनले. शिवसेनेच्या ‘शुद्ध’ व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. कदाचित बुबुळेही खोबणीतून बाहेर पडली असतील. आता स्पष्टच सांगायचे तर शिवसेना-भाजप युतीच्या विरोधकांनी पाण्यात घातलेले देव बाहेर काढावेत हेच बरे! एकतर ही युती आता तुटणार नाही, मतभेदांच्या खडकावर आपटून फुटणार नाही. महाराष्ट्राचे भवितव्य आणि नशिबाची गाठ युतीबरोबर बांधली गेली आहे. शिवसेनेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री कसे? यावर अनेकांना जे खाजवायचे ते खाजवत बसू द्या. डोकी नसल्याने ते खाजवण्याचा प्रश्नच येत नाही. अतिथींना बोलवून त्यांचे विचार ऐकणे ही परंपरा शिवसेनेची आहेच. तसे नसते तर शिवसेनेचे घोर विरोधक असलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात खास अतिथी म्हणून निमंत्रित केलेच गेले नसते. वेळोवेळी असे अनेक जण शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेच आहेत. अगदी जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवारांनीही

शिवतीर्थावर हजेरी

लावली आहे. शिवसेनाप्रमुख काय किंवा आज आम्ही काय, शिवसैनिकांना मार्गदर्शन नेहमीच करीत असतो, पण अनेकदा नव्या दमाचे पाहुणे नवा विचार घेऊन येतात. हे विचार नवी दिशा दाखवतात. जसे की, मुख्यमंत्र्यांनी अगदी टोकदार शब्दांत सांगितले, ‘‘मी भगव्याचा शिलेदार आहे.’’ मुख्यमंत्री बिनधास्तपणे म्हणाले, ‘‘आमच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद नाहीत. सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल.’’ हे मुख्यमंत्र्यांचे विधान लाखमोलाचे आहे. युतीत मुख्यमंत्रीपदाचे काय? यावर चघळत बसणाऱया मीडियाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे उत्तर आहे. जे ठरले तेच होईल हा युतीतील समन्वयाचा मंत्र आहे. युती म्हटली की सर्व समसमान होईल, असे आम्ही सांगताच मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास दाद दिली. थोडक्यात काय, मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंचावर आले व उरलीसुरली किल्मिषे त्यांनी दूर केली. ते शिवसेनेसाठी अतिथी नव्हते तर आमच्यातलेच एक होते. उद्याच्या विधानसभेत युतीला दिल्लीप्रमाणे मोठे बहुमत मिळावे यासाठीच एकदिलाने काम केले पाहिजे. युतीची वज्रमूठ अभेद्य आहे. महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी ती आवश्यक आहे. फडणवीसांनी सांगितले, ‘त्यांना सत्ता खुर्ची आणि पदासाठी नको आहे.’ आम्हीही तेच सांगत आहोत. राज्यात दुष्काळ आहे, पाणीटंचाई आहे, शेतकऱयांचे प्रश्न आहेत, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रकरण चिंता वाढवत आहे. हे सर्व सोडवायला सत्ता हवी आहे. विरोधकांच्या फालतू टीकेची पर्वा न करता

कामांचा निचरा

केला पाहिजे. दिल्लीत मोदीही नेमके तेच करीत आहेत. विरोधकांचे शहाणपण हरवले आहे. लोकसभा निवडणुकीतील युतीच्या विजयाने ते बिथरले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागरांना स्थान देण्यात आले आहे. त्यांनी आधीच्या पक्षांच्या आमदारकीचा राजीनामा दिला व नंतर ते ‘युती’च्या घरात आले. हे दोन मंत्री सध्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांची मंत्रीपदे घटनाविरोधी असल्याची बोंब मारली जात आहे. या अर्धवटरावांनी समजून घेतले पाहिजे की, आमदार नसतानाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक पावटय़ांनी मंत्री म्हणून शपथा घेतल्या आहेत व नंतर सहा महिन्यांत ते विधिमंडळात निवडून आले आहेत, पण लोकांनी पार्श्वभागावर लाथा हाणूनही ही मंडळी त्यांचा जुनाच नाद सोडायला तयार नाहीत. भारतीय जनता पक्षानेही आता पळत्यांच्या मागे फार लागू नये. संसदेत बहुमत आहे, पाठीशी शिवसेना आहे. मग इतरांची मनधरणी का करायची? आंध्रच्या जगन पक्षाला म्हणे लोकसभा उपाध्यक्षपदाची ‘ऑफर’ देण्यात आली, पण जगन यांनी भाजपला काही अटी घातल्या. अटी-शर्ती पूर्ण झाल्या तरच लोकसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारू असे कळविण्यात आले. जगन यांच्या इतके मागे लागण्याची गरज आहे काय? एखादे ओम बिर्ला एन.डी.ए.मधूनही उपाध्यक्षपदासाठी शोधायला हवेत. इतरही अनेक विषय आहेत. त्यावर नंतर पाहू. बाकी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेच, ‘‘सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल!’’

आपली प्रतिक्रिया द्या