सामना अग्रलेख – चला, शिवतीर्थावर! विजयाची सुरुवात!

शिवसेनेचा दसरा मेळावा आता शिवतीर्थावरच वाजतगाजत, उत्साहाचा गुलाल उधळत होणार. शिवसेनेच्या परंपरेस साजेसा होणार. शिवसेनेच्या दुष्मनांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. संभ्रम निर्माण केला, पण आजपासून महाराष्ट्रात ज्या नवरात्रीचा जागर, आई दुर्गेचा उत्सव सुरू झाला आहे त्या जगदंबेचे आशीर्वादही शिवसेनेला लाभले आहेत. ज्याच्या पाठीशी देवदेवता, महाराष्ट्राची जनशक्ती, त्यांना कुणाचे भय? सत्य, न्याय आणि धर्म हाच महाराष्ट्राचा प्राण आहे. शिवसेना हा धर्म पाळत आली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्य व न्यायाचा तराजू ढळू दिला नाही. शिवसेनाप्रमुखांचा पवित्र आत्मा त्या न्यायाच्या तराजूवर नक्कीच अभिमानाची फुले उधळत असेल. चला शिवतीर्थावर… तेथेच भेटू!

रामशास्त्रींच्या महाराष्ट्रात न्याय आणि सत्य मेले नाही. ते मुंबई उच्च न्यायालयाने मरू दिले नाही. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होईल, असे स्पष्टपणे सांगून ‘सत्यमेव जयते’ हे शब्द न्यायालयाच्या भिंतीवर लटकवण्यासाठी नाहीत तर आचरणात आणण्यासाठी आहेत हे न्यायालयाने दाखवून दिले व मुंबई उच्च न्यायालयाची महान परंपरा कायम राखली. चार दिवसांपूर्वीच (उप) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, ‘‘मला संपविण्याचे खूप प्रयत्न शत्रूंनी केले, पण मी संपलो नाही.’’ राजकारणात कोणी संपत नसतो. शिवसेनेचेही तसेच आहे. गेल्या 56 वर्षांत शिवसेनेला संपविण्यासाठी काय कमी प्रयत्न झाले? पण शिवसेना प्रत्येक वेळी नव्या जोमाने आणि तेजाने उसळून वर गेली. त्यामुळे गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीत खुपसलेले खंजीर पचवले व ते पुढे गेले. त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत. इतिहासात तोतयांचे बंड म्हणून एक प्रकरण आहे. त्याचा अभ्यास या मंडळींनी केला पाहिजे. आम्ही कोणत्याही युद्धास तयार आहोत. समोरून या नाहीतर पाठीमागून वार करा. तुमचा प्रत्येक घाव शिवसेनेला, महाराष्ट्राला नवे बळ देणार आहे. चाळीस बेइमानांची शिवसेना म्हणे खरी, त्या बेइमानांच्या शिवसेनेशी कमळाबाईची युती आहे, असे शंभरदा रेटून बोलल्याने महाराष्ट्राची जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, असे वाटत असेल तर तो भ्रम आहे. काय तर म्हणे

बेइमानांचा गट

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार आणि त्यांनाच तो अधिकार आहे. या दळभद्री प्रकाराबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परंपरा शिवसेनेचीच आहे. फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधडय़ा भिजवत होते तेव्हापासून शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावरून विचारांचे सोने विजयादशमीस उधळत आले आणि त्याच दिशेने महाराष्ट्र व देश पुढे गेला. त्या बाळासाहेबांनाच आव्हान देण्याइतपत बेइमानांची मजल गेली ती फक्त कमळाबाईच्या नादी लागल्याने. खऱ्या-अस्सल शिवसेनेचा नाद करायचा नाही व कमळाबाईच्या नादास जो लागला त्याचा कार्यभाग संपला हे जर मिंध्यांना कळत नसेल तर त्यांच्या बेइमान गटाने स्वतःच्या सर्वनाशाला आमंत्रण दिले आहे हे नक्की. दसरा मेळाव्याचे प्रकरण मस्तवाल, सूडवादी सत्ताधाऱ्यांमुळे उच्च न्यायालयात गेले. मुळात मुंबई महानगरपालिकेस काय माहीत नाही की, दसऱ्याचा दिवस हा शिवतीर्थावर शिवसेनेच्या मेळाव्यासाठीच राखीव असतो. हा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी जनांसाठी, हिंदुत्वासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणारा असतो. याच शिवतीर्थावरून शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांनी अनेक आव्हाने झेलली व परतवून लावली. शिवतीर्थ हे नामकरणच शिवसेनाप्रमुखांनी केले. त्या शिवतीर्थाचे कोणी नरकतीर्थ करू पाहत असेल तर ते थांबविण्याचे काम जसे श्री. फडणवीसांचे होते तसे महापालिकेच्या विधी खात्याचे होते. कोणी सोम्या-गोम्या आपल्या मिंधे गटासाठी दसरा मेळावा करायचा म्हणून शिवतीर्थावर दावा सांगतो व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या

भंपक सबबीखाली

सरा मेळाव्यास शिवतीर्थ नाकारले जाते, याची खोल जखम महाराष्ट्राच्या मनावर झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एक ‘डुप्लिकेट’ पुण्यात आढळला. त्या डुप्लिकेटबरोबर काही हवशा-नवशा-गवशांनी सेल्फी काढल्या म्हणून त्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास दम भरला. ते ‘मिंधे’ असले तरी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान करू नका. आता हाच न्याय ‘मिंधे’ गटाच्या डुप्लिकेट सेनेस लागायला नको काय? स्वतःचा डुप्लिकेट चालत नाही, पण जे स्वतःच डुप्लिकेट ‘सेना’ चालवीत आहेत त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची खाज सुटली. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्या व न्याय केला. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेचा दसरा मेळावा आता शिवतीर्थावरच वाजतगाजत, उत्साहाचा गुलाल उधळत होणार. शिवसेनेच्या परंपरेस साजेसा होणार. शिवसेनेच्या दुष्मनांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. संभ्रम निर्माण केला, पण आजपासून महाराष्ट्रात ज्या नवरात्रीचा जागर, आई दुर्गेचा उत्सव सुरू झाला आहे त्या जगदंबेचे आशीर्वादही शिवसेनेला लाभले आहेत. ज्याच्या पाठीशी देवदेवता, महाराष्ट्राची जनशक्ती, त्यांना कुणाचे भय? सत्य, न्याय आणि धर्म हाच महाराष्ट्राचा प्राण आहे. शिवसेना हा धर्म पाळत आली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्य व न्यायाचा तराजू ढळू दिला नाही. शिवसेनाप्रमुखांचा पवित्र आत्मा त्या न्यायाच्या तराजूवर नक्कीच अभिमानाची फुले उधळत असेल. चला शिवतीर्थावर… तेथेच भेटू!