
हिंदुस्थानच्या शेजारचे प्रत्येक राष्ट्र आज चीनच्या लाल मुठीत बंद आहे. हे चित्र चांगले नाही. आमचे सैन्य शूर आहे व राष्ट्रासाठी बलिदान देण्यास मागेपुढे पाहणार नाही. नव्हे, कश्मीरच्या भूमीवर अशी बलिदाने रोजच सुरू आहेत. त्यामुळे दुश्मनाला चोख प्रत्युत्तर उत्तर मिळणार कधी? ‘कारगील विजय दिवस’ आम्ही साजरा करतो ते कारगीलचे युद्धही आपल्याच भूमीवर लढले गेले. दुबळय़ा पाकिस्ताननेच ही किंमत आम्हाला मोजायला लावली. त्यामुळे चीन काय किंवा पाकिस्तान काय, त्यांना वेसण घालताना संरक्षणमंत्र्यांना अधिक दमदार पावले उचलावी लागतील. देश दुबळा नसतो, देशातले फालतू राजकारण देशाला दुबळे करीत असते. आज तेच सुरू आहे.
कारगील विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू येथे गेले व तेथे त्यांनी तिरंगा फडकवला. संरक्षणमंत्र्यांनी जम्मूत प्रेरणादायी तसेच वीरश्रीयुक्त भाषण केले. ‘‘कुणीही आम्हाला दुबळे समजण्याची चूक करू नये. एक शक्तिशाली देश म्हणून हिंदुस्थानची आता ओळख आहे. पाकिस्तानला प्रत्येक वेळी आम्ही नमविले आहे. चीनने आता फाजील आत्मविश्वासात राहण्याचे कारण नाही’’, असे श्री. राजनाथ सिंह म्हणत आहेत, पण त्याच वेळी चीनची लढाऊ विमाने हिंदुस्थानच्या हद्दीत, लडाखच्या आकाशात घुसल्याचे वृत्त चिंताजनक आहे. चीनने लडाखमधील हिंदुस्थानच्या हद्दीत आधीच घुसखोरी करून जमीन बळकावली आहे. पेंगाँग लेकजवळ रस्ते, पूल, हवाई तळ उभारून आव्हान उभे केले आहे. हे सर्व हिंदुस्थानी हद्दीत घडत आहे. त्यामुळे चीनचा हा फाजील आत्मविश्वास हिंदुस्थानला महाग पडताना दिसत आहे. चिन्यांनी अनेकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले आहे. आता त्यांची विमाने आपल्या हद्दीत घुसू लागली. आश्चर्य म्हणजे, दोन देशांतील कोअर कमांडरस्तरीय चर्चा सुरू असताना चीन हे सर्व करीत आहे. एकीकडे वाटाघाटीला बसायचे व त्याच वेळी दगाबाजी करायची हे चीनचे धोरण आहे. पाकला नमविणे आणि
दम भरणे सोपे
आहे, पण चीनचे तसे नाही. पाकिस्तानवर कर्जाचा अतोनात भार आहे. राष्ट्रीय संपत्ती विकून ते पैसा उभा करीत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था साफ ढेपाळली आहे. श्रीलंकेपेक्षा वाईट अवस्था पाकिस्तानची होईल असे चित्र आहे. पुन्हा पाकिस्तानला दम भरल्याने इकडे ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ विषयाला गती मिळते, पण चीनच्या बाबतीत तसे नाही. चीनचे अर्थबळ व शस्त्रबळ तसेच मनुष्यबळ पाहता हिंदुस्थानलाही विचारपूर्वकच पाऊल उचलावे लागते. पाकिस्तानला आपण युद्धाची धमकी सहज देऊ शकतो तशी चीनला देऊ शकतो काय? पाकव्याप्त कश्मीरवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चा बॉम्बहल्ला करू शकतो तसे धाडस आपण चीनच्या बाबतीत करू शकतो काय? चीनला सडेतोड उत्तर देण्यास आपण सज्ज आहोत हे बोलणे ठीक आहे, पण चिनी सैन्य लडाखमध्ये घुसले आहे व बाहेर निघायला तयार नाही. ते कसे निस्तरणार आहात? लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीन 1962 पासूनच घुसखोरी करीत आहे. पंडित नेहरूंच्या काळात चीन आमच्या हद्दीत घुसला असा जे आरोप करीत आहेत त्यांनी घुसलेल्या चिन्यांना बाहेर काढले नाहीच. उलट तुमच्या काळात
चीन जास्तच पुढे
घुसून शिरजोर झाला आहे. हिंदुस्थानला कुणीही दुबळे समजू नये, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सांगतात ते योग्यच आहे, पण पाकिस्तान व चीनमध्ये फरक करायला हवा. हिंदुस्थानच्या शेजारचे प्रत्येक राष्ट्र आज चीनच्या लाल मुठीत बंद आहे. हिंदुस्थानला कुणी शेजारी मित्र राहिला आहे काय? नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान अशी अनेक राष्ट्रे हिंदुस्थानच्या मित्रयादीत खरेच आहेत काय? अगदी नेपाळसारखे हिंदू राष्ट्रही लाल चिन्यांच्या पकडीत विसावले आहे. हे चित्र चांगले नाही. आमचे सैन्य शूर आहे व राष्ट्रासाठी बलिदान देण्यास मागेपुढे पाहणार नाही. नव्हे, कश्मीरच्या भूमीवर अशी बलिदाने रोजच सुरू आहेत. कश्मिरी पंडितही संकटात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आमच्या सैन्याची आमच्याच भूमीवर बलिदाने सुरू आहेत. त्यामुळे दुश्मनाला चोख प्रत्युत्तर, सडेतोड उत्तर मिळणार कधी? ‘कारगील विजय दिवस’ आम्ही साजरा करतो ते कारगीलचे युद्धही आपल्याच भूमीवर लढले गेले व आमचेच हजारांवर सैन्य त्यावेळी कामी आले. दुबळय़ा पाकिस्ताननेच ही किंमत आम्हाला मोजायला लावली. त्यामुळे चीन काय किंवा पाकिस्तान काय, त्यांना वेसण घालताना संरक्षणमंत्र्यांना अधिक दमदार पावले उचलावी लागतील. देश दुबळा नसतो, देशातले फालतू राजकारण देशाला दुबळे करीत असते. आज तेच सुरू आहे.