सामना अग्रलेख – पहिला उंबरठा पार!

दहावी आणि बारावी या भावी पिढीसाठी फक्त परीक्षा नाहीत, तर त्यांच्या करीअरचे दोन उंबरठे आहेत. दहावी हा पहिला तर बारावी दुसरा. राज्यातील सुमारे 14 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी त्यांचा पहिला म्हणजे दहावीचा उंबरठा यशस्वीरीत्या ओलांडला. मात्र काही कारणांनी उंबरठय़ाआडच राहाव्या लागलेल्या सहा टक्के विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्नदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. पुन्हा या वर्षी तर अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण तीन टक्के वाढले आहे. तेव्हा उंबरठय़ाआड अडकलेल्यांचे या वर्षी वाढलेले प्रमाण पुढील वर्षी कमी कसे होईल याचाही विचार सरकार, शिक्षण मंडळ, शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थीपालकांना करावा लागेल.

करीअरचा उंबरठा असलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. गेल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतदेखील मुलींनीच बाजी मारली आहे आणि कोकण विभागाने अव्वल क्रमांक कायम राखला आहे. गेल्या काही वर्षांपासून दहावी असो की बारावी, एसएससी बोर्ड असो की इतर बोर्ड, मुलींनी निकालाबाबत मुलांवर मात करण्याची प्रथाच पडली आहे. याही वेळी ही प्रथा कायम राहिली आहे. बारावीमध्ये उत्तीर्ण मुलींचे प्रमाण 93.73 टक्के होते, तर मुलांचे प्रमाण 89.14 टक्के होते. म्हणजे सुमारे पाच टक्के अधिक मुली बारावीत उत्तीर्ण झाल्या होत्या.  दहावीच्या परीक्षेतही मुलींनी तोच कित्ता गिरवला आहे. दहावीत मुलींनी उत्तीर्णतेची टक्केवारी 95.87 टक्के एवढी नोंदवत मुलांवर मात केली आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 92.05 टक्के एवढे आहे. म्हणजे बारावीमध्ये पाच टक्के तर दहावीमध्ये तीन टक्के मुलींनी मुलांवर आघाडी घेतली आहे. तीच गोष्ट विभागवार निकालांचीही म्हणता येईल.  मागील काही वर्षांत दहावी-बारावीमध्ये कोकण विभागच अव्वल ठरत आला आहे. याही वर्षी वेगळे घडले नाही. बारावीमध्ये 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर होता. आता दहावीच्या परीक्षेत तर तब्बल 98.11 एवढय़ा

विक्रमी टक्केवारीसह

कोकण विभागाने प्रथम क्रमांकाची घोडदौड कायम राखली आहे. सर्वात कमी निकाल लावणाऱ्या विभागाबाबतही साम्यच आहे. बारावीमध्ये नऊ विभागांत तळाला होता तो 90.35 टक्के निकाल लावणारा नागपूर विभाग. दहावीमध्येही हेच चित्र आहे. 92.05 टक्के निकालासह नागपूरच शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यातल्या त्यात अमरावती विभागाने या वेळी थोडी प्रगती दाखवली आहे. गेल्या वर्षी अमरावती विभाग सातव्या स्थानावर होता. या वेळी 96.81 टक्के निकालासह तो सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. अर्थात मुली आणि कोकण विभागाने आघाडी दाखवली असली तरी एकूण निकालाने मात्र दहावीमध्येही घट नोंदवली आहे. मार्च 2022 मध्ये दहावीचा निकाल 96.94 टक्के होता. मार्च, 2023 चा निकाल 93.83 टक्के एवढा आहे. ही घट सुमारे तीन टक्क्यांची आहे. बारावीच्या निकालातही या वेळी जवळपास एवढीच घट दिसली होती. ही घट होण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाची व्यापक अंमलबजावणी कारणीभूत ठरली, असे शालांत बोर्डातर्फे सांगण्यात आले. त्यात नक्कीच तथ्य आहे. शिवाय 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा आणि कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर झालेला परिणाम ही कारणेदेखील

निकालातील घसरणीसाठी

दिली जात आहेत. ती खरी असतीलही, परंतु गेल्या वेळच्या तुलनेत यंदा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले हा मुद्दा गांभीर्याने घेण्यासारखा आहे. गेल्या वर्षी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी जवळपास तीन टक्के होती. यंदा ती थेट दुप्पट झाली आहे. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या, प्रावीण्य मिळविणाऱ्या, अव्वल क्रमांक कायम राखणाऱ्या मुली आणि कोकण विभागाचे कौतुक करतानाच वाढीव अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दहावी आणि बारावी या भावी पिढीसाठी फक्त परीक्षा नाहीत, तर त्यांच्या करीअरचे दोन उंबरठे आहेत. दहावी हा पहिला तर बारावी दुसरा. राज्यातील सुमारे 14 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी शुक्रवारी त्यांचा पहिला म्हणजे दहावीचा उंबरठा यशस्वीरीत्या ओलांडला. मात्र काही कारणांनी उंबरठय़ाआडच राहाव्या लागलेल्या सुमारे सहा टक्के विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्नदेखील दुर्लक्षित करून चालणार नाही. पुन्हा या वर्षी तर अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण तीन टक्के वाढले आहे. तेव्हा शैक्षणिक आयुष्याचा पहिला उंबरठा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच उंबरठय़ाआड अडकलेल्यांचे या वर्षी वाढलेले प्रमाण पुढील वर्षी वाढणार नाही, किंबहुना कमी कसे होईल याचाही विचार सरकार, शिक्षण मंडळ, शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थी-पालकांना करावा लागेल.