सामना अग्रलेख – नपुंसक लेकाचे!

धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्माचे राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील शीतल गाडेकरचा मृत्यू झाला. या घटनांकडे थंडपणे पाहत दाढीवर हात फिरवणे हेसुद्धा नपुंसकपणाचे लक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने अवमान केला म्हणून सत्तेतले ‘चोर मंडळ’ नपुंसक शेऱ्यावरही हक्कभंग आणणार काय?

महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून राज्यात धार्मिक तेढ विकोपाला जात असल्याचे आसूड देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण महाराष्ट्रातील सत्तेत कोणी शहाणेच राहिलेले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या डोक्यात हातोडा मारूनही त्यांचे डोके ठिकाणावर आलेले नाही. महाराष्ट्रात एकाच दिवशी मंत्रालयाच्या दारात तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात धुळय़ाच्या शीतल गाडेकर यांचा मृत्यू झाला. इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांनी मंत्रालयाच्या दारात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री किंवा त्यांच्या सरकारच्या चेहऱ्यावरची सुरकुती हलली नाही. तिघांचीही वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाली, लुबाडणूक झाली असे त्यांचे म्हणणे आहे व त्यामुळेच आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. पण जे सरकार फसवणुकीतून निर्माण झाले ते लोकांच्या फसवणुकीवर काय उतारा देणार? कोरोनाचा कहर, वाढलेला भ्रष्टाचार, ढासळती कायदा सुव्यवस्था अशा अनेक प्रश्नांवर सरकार षंढासारखे बसून आहे. छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होत आहे व त्याआधीच धार्मिक तेढ निर्माण करून दंगा करण्याचा प्रकार घडला. छत्रपती संभाजीनगरात आजही तणावाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात ऊठसूट ‘लव्ह जिहाद’च्या नावावर हिंदू आक्रोश मोर्चे काढून तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली जात आहेत. जनतेचे प्रश्न सोडवता येत नसल्याने

धर्माचे राजकारण करून

पोळय़ा भाजायच्या हेच सध्याच्या मिंधे सरकारचे धोरण आहे व सर्वोच्च न्यायालयाने त्यावर आसूड ओढले आहेत. त्यात आता हिंदुत्वाच्या नावावर ‘सावरकर गौरव यात्रे’ची घोषणा केली. ज्या मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या बेइमान गटाने सावरकर साहित्याची चार पाने कधी चाळली नाहीत, ते सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढीत आहेत. सावरकर गौरव यात्रा काढायची तर काढा, पण त्याआधी सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन गौरव तरी करा. ‘भारतरत्न’ हीच सावरकरांची गौरव यात्रा ठरेल, पण दिल्लीचे सरकार त्यावर गप्पच आहे. वीर सावरकरांना ‘दाढी’चा अत्यंत तिरस्कार होता. त्याबाबतीत त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाचे धोरण स्वीकारले. त्यामुळे सावरकरांना मान्य नसलेल्या दाढीला मुख्यमंत्री गुळगुळीत कात्री लावतील काय? दाढी वाढवणे वगैरे प्रकार, शेंडी-जानवे, गाईस गोमातेचा दर्जा देणे वगैरे कर्मकांडे वीर सावरकरांना मान्य नव्हती. मंत्र-तंत्र, जादूटोणा, रेडाबळी वगैरे प्रथांना त्यांचा विरोध होता. गौरव यात्रा काढणाऱ्यांनी सावरकरांच्या या विचारांचा प्रसारही करायला हवा. तरच सावरकर गौरव यात्रा सार्थकी लागेल. हिंदुत्वाच्या नावावर सध्या काहीही व कसेही खपवले जाते. धर्माचे राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनाही मान्य नव्हते. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही, असे ते जाहीरपणे म्हणत, पण महाराष्ट्राचे व देशाचेही राजकारण खोमेनींच्या मार्गाने सुरू आहे. आता हा खोमेनी कोण? हे डॉ. मिंधे यांनी विचारू नये. ते आता

आयतेच डॉक्टर

झाले आहेत. त्यामुळे जगाचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले पाहिजे. ज्ञान हे तपस्या व अनुभवातून मिळते, खोक्यांतून मिळत नाही व धर्मांध विचारांच्या कचऱयातून तर ते अजिबात प्राप्त होत नाही. धर्म आणि राजकारण जेव्हा भिन्न होतील आणि राजकारणी धर्माचा वापर राजकारणासाठी करणे थांबवतील तेव्हा ‘हेट स्पीच’ म्हणजे द्वेषमूलक भाषणेदेखील थांबतील, पण मुसलमानांकडे बोट दाखवून ‘गोली मारो साले को’ अशा चिथावण्या देणारे लोक केंद्रात मंत्री म्हणून बसले आहेत. बिल्कीस बानोवर बलात्कार करणाऱयांची जेलातून सुटका होते व त्यांचा धर्मवीर म्हणून गौरव केला जातो. महाराष्ट्रात सत्ता मिळावी म्हणून कामाख्या देवीच्या मंदिरात रेड्यांचे बळी दिले जातात. हे काही पुढारलेल्या पुरोगामी देशाचे लक्षण नाही. धर्म ही अफूची गोळी आहे व ती बंदुकीच्या गोळीपेक्षा घातक आहे. धर्मांध राजकारणाने एकदा देशाची फाळणी झाली आहे. जगभरात धर्मांधतेमुळे अनेक देश तुटले. हिंदुस्थानला असा नवा घाव परवडणारा नाही. धर्माचे राजकारण करून सत्ता मिळवणे व त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. मंत्रालयासमोर तिघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातील शीतल गाडेकरचा मृत्यू झाला. या घटनांकडे थंडपणे पाहत दाढीवर हात फिरवणे हेसुद्धा नपुंसकपणाचे लक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारच्या वर्मावरच घाव घातला. आता सर्वोच्च न्यायालयाने अवमान केला म्हणून सत्तेतले ‘चोर मंडळ’ नपुंसक शेऱयावरही हक्कभंग आणणार काय?