सामना अग्रलेख – आंतरराष्ट्रीय विनोद!

3659

पाकिस्तान वर्षानुवर्षे हिंदुस्थानात अतिरेकी घुसवून हत्याकांडे घडवतोय तेव्हा कधी मानवी हक्कांचे उल्लंघन जगाला दिसले नाही आणि हिंदुस्थानने कश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शांततेत’ 370 कलम हटवले तर मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चर्चा होते हा युनोचा नादानपणा आहे. जगातील सर्व दहशतवादी संघटनांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानला मानवता आणि मानवी हक्क या विषयावर भाषण झाडण्याची संधी युनोच्या मानवी हक्क परिषदेत मिळावी हा मोठाच आंतरराष्ट्रीय विनोद आहे!

कश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाच्या मंचावर मंगळवारी पाकिस्तानने हिंदुस्थानविरोधात नेहमीप्रमाणे कश्मीरचे तुणतुणे वाजवले, मात्र हिंदुस्थानच्या परराष्ट्र सचिवांनी या पाकिस्तानी तुणतुण्याच्या तारा उद्ध्वस्त करून जगाची दिशाभूल करण्याचा पाकड्यांचा डाव पुरता हाणून पाडला. मानवी हक्कांविषयी पाकिस्तानला आलेला उमाळा कसा ढोंगी आणि दांभिक आहे व पाकिस्तान हा देशच कसा मानवतेचा शत्रू आहे याचा पाढाच हिंदुस्थानने युनोच्या मंचावर वाचला. कश्मीरच्या मुद्दय़ावर जगभरात पाकिस्तान एकाकी पडला असतानाही पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची पाकिस्तानची खोड जुनीच आहे. जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या 42 व्या परिषदेतही पाकिस्तानने कश्मीरचा विषय उकरून काढलाच. ‘जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटविल्यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन सुरू आहे हो!!! असा गळा पाकिस्तानने या परिषदेत काढला. उंदराला मांजराची साक्ष म्हणतात त्याप्रमाणे चीननेही पाकिस्तानच्या रडगाण्यात आपला सूर मिसळून जम्मू-कश्मीरमध्ये मानवी अधिकारांचे हनन होत असल्याबद्दल चिंता वगैरे व्यक्त केली.  पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहंमद कुरेशी यांनी युनोच्या मानवी हक्क आयोगासमोर 115 पानांचा अहवाल सादर करताना हिंदुस्थान सरकार कश्मिरी जनतेवर

अत्याचार करत असल्याचा आरोप

केला. कुरेशी मियाँचे म्हणणे असे की, 370 कलम हटविल्यानंतर हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरचे जणू एका तुरुंगातच रूपांतर केले. जनतेला घराबाहेरही डोके काढू दिले जात नाही. सहा आठवड्यांपासून कश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने याची चौकशी करावी, अशी भीकही पाकचे परराष्ट्रमंत्री मागत होते. हिंदुस्थानचे परराष्ट्र सचिव विजय ठाकूर सिंग यांनी पाकड्यांचा हा रडीचा डाव लगेचच उधळून लावला. आज जे लोक इथे मानवी हक्काच्या मुद्दय़ावरून उर बडवून रडत आहेत तेच लोक माणुसकी आणि मानवतेचे कसे खरे शत्रू आहेत हे सोदाहरण सांगून पाकिस्तानच्या दाव्यातील हवाच हिंदुस्थानच्या परराष्ट्र सचिवांनी काढून घेतली. जम्मू-कश्मीर हा हिंदुस्थानचा सार्वभौम भाग आहे आणि तेथील 370 कलम हटवणे हा सर्वस्वी हिंदुस्थानचा अंतर्गत विषय आहे. या मुद्दय़ावर बोलण्याचा कुठल्याही देशाला अधिकार नाही. 370 कलम हटविण्याच्या निर्णयामुळे जम्मू-कश्मीर व लडाखमधील प्रत्येक सामान्य नागरिकासाठी प्रगती व विकासाचे दरवाजे खुले झाले आहेत, असे हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांनी मानवी हक्क परिषदेत ठणकावून सांगितले. मुळात मानवता आणि माणुसकी या दोन्ही शब्दांशी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांचा अर्थाअर्थी संबंध नाही. मानवतेचा गळा घोटण्यात पाकिस्तान आणि चीन हेच जगात आघाडीवर आहेत. हाँगकाँगमधील लोकशाहीसमर्थक आंदोलकांवर चीन करीत असलेले अत्याचार किंवा चीनमधील

उईगर मुसलमानांचे निर्दालन

याविषयी या परिषदेत चर्चा का होऊ नये? जगभरातील अतिरेकी संघटनांचे नंदनवन असलेल्या पाकिस्तानला मानवी हक्कांवर भाषण झोडण्याची संधी युनोच्या परिषदेत मिळूच कशी शकते? अल-कायदापासून लश्कर ए तोयबा, जैश ए मोहंमद, तालिबान ते इसिसपर्यंत सगळय़ा दहशतवादी संघटनांना पोसणारा पाकिस्तान जागतिक व्यासपीठावरून मानवतेवर लेक्चर देतो ही एक प्रकारे संयुक्त राष्ट्रसंघाचीच चेष्टा आहे. मानवतेचा मुडदा पाडणाऱ्या दहशतवादाचे पाकिस्तान हेच जागतिक केंद्र आहे. त्यामुळे मानवी हक्कांचे रडगाणे गाणाऱ्या पाकड्यांची दखल युनोच्या मानवी हक्क परिषदेने घेऊ नये ही हिंदुस्थानने मांडलेली भूमिका रास्तच आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून खतम केले तेव्हाच खरे तर ‘युनो’ने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करायला हवी होती. मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या लादेनला लपवून ठेवल्याचा जाब ‘युनो’ने पाकड्यांना कधी विचारला नाही. पाकिस्तान वर्षानुवर्षे हिंदुस्थानात अतिरेकी घुसवून हत्याकांडे घडवतोय तेव्हा कधी मानवी हक्कांचे उल्लंघन जगाला दिसले नाही आणि हिंदुस्थानने कश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘शांततेत’ 370 कलम हटवले तर मानवी हक्कांच्या उल्लंघनाची चर्चा होते हा युनोचा नादानपणा आहे. जगातील सर्व दहशतवादी संघटनांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानला मानवता आणि मानवी हक्क या विषयावर भाषण झाडण्याची संधी युनोच्या मानवी हक्क परिषदेत मिळावी हा मोठाच आंतरराष्ट्रीय विनोद आहे!

आपली प्रतिक्रिया द्या