सामना अग्रलेख – ‘हिरकण्यां’चा विजय!

1913

स्त्रीया कोठेच कमी नाहीत. एक दिवस त्या लष्करप्रमुख होतील व जगातील बलाढय़ हिंदुस्थानी सेनेचे नेतृत्व करतील याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही. न्यायालयाने हिंदुस्थानी स्त्रीला मर्दानीठरवले. हा निर्णय ऐतिहासिक आहेरायगडचा अत्यंत अवघड कडा रात्रीच्या किर्रर्र अंधारात उतरणाऱ्या हिरकरणीनेदेखील प्रचंड साहसाचे दर्शन घडवले होते. हिंदवी स्वराज्यातील ही हिरकणी काय किंवा स्वतंत्र हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांत शौर्य गाजविणाऱ्या आजच्या हिरकण्याकाय, सगळय़ांनी शौर्यशाली नारीशक्तीचाच परिचय वेळोवेळी जगाला करून दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा या सर्व हिरकण्यांचा विजय आहे!

आता यापुढे लष्करात महिलाही नेतृत्व करतील. शौर्य आणि त्याग याबाबतीत पुरुष आणि स्त्री असा लिंगभेद करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा देशातील स्त्रीशक्तीचा विजय आहे. शारीरिक मर्यादा आणि सामाजिक रूढी, परंपरांमुळे महिलांना लष्करात नेतृत्वपद देता येत नसल्याचा सरकारी दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले हे महत्त्वाचे. म्हणजे येथे महाराष्ट्र दिसला. एका बाजूला स्त्री ही अबला नसून ‘सबला’ असल्याचा तबला वाजवायचा आणि दुसऱ्या बाजूला लष्करात महिलांना समान संधी द्यायची नाही. महिलांना लष्करात कायमस्वरूपी नेमणुका देण्यास विरोध होता. महिलांची शारीरिक क्षमता आणि मानसिकता यावर सरकारने प्रश्नचिन्ह निर्माण करावे हे धक्कादायक होते. त्याविरोधात लष्करी गणवेशातील तीन रणरागिणी सर्वोच्च न्यायालयात गेल्या व न्यायालयाने सरकारला धक्का दिला. सरकारचे म्हणणे म्हणजे महिलांचा सरळ सरळ अपमानच ठरतो. केंद्र सरकारने सांगितले, महिलांना ‘कमांड’ पोस्टिंग देता येणार नाही. शत्रू राष्ट्र याचा फायदा उठविण्याची शक्यता आहे. पुन्हा हे जोखमीचे काम महिला अधिकाऱ्यांना कितपत झेपेल, असा सवाल सरकारने केला. सरकारने पुरोगामीपणाचा बुरखा पांघरून केलेले हे प्रतिगामी वर्तन आहे. सरकारचा इतिहास कच्चा आहे. युद्धभूमीवर स्त्रीयांनी प्रचंड कर्तृत्व गाजवले आहे. तसे नसते तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मासारख्या योद्धय़ा स्त्रीया जगाला माहीत झाल्याच नसत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी

तलवार गाजवलीच

आहे. इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेली आणखी एक रणरागिणी म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई. राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी मराठी राज्याची धुरा कणखरपणे सांभाळली. मोगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या आघाडीवर कॅ. लक्ष्मी सेहगल होत्या हे कसे विसरता येईल? या वीरांगणांचे दाखले भाषणात आणि प्रवचनात द्यायचे आणि महिलांना अशी धाडसी कामे जमणार नाहीत असे न्यायालयात सांगायचे हा दुटप्पीपणा झाला. न्यायालयाचे म्हणणे असे आहे की, महिलांच्या शारीरिक वैशिष्टय़ांविषयी केंद्राने केलेला युक्तिवाद अस्वस्थ करणारा आहे. केंद्र सरकारने आपल्या मानसिकतेत आणि दृष्टिकोनात बदल केला पाहिजे. अगदी परखड भाषेत सांगायचे तर सरकारच्या मेंदूत बिघाड आहे, असेच सर्वोच्च न्यायालयास सुनावायचे आहे. आजही शेकडो महिला लष्करात, वायुदलात आहेत व त्या संघर्षग्रस्त क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सातारा येथील कर्नल संतोष महाडिक हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाल्यावर त्यांची पत्नी स्वाती या धीराने तर उभ्या राहिल्याच, पण सैन्यात दाखल झाल्या. आज त्या लेफ्टनंट पदावर कार्यरत आहेत. विरार येथील मेजर प्रसाद महाडिक यांच्या पत्नी गौरी आणि मीरा रोड येथील शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कणिका यांनीही पतीच्या हौतात्म्यानंतर हाच धैर्य आणि शौर्याचा धडा घालून दिला. त्यासाठी त्या सर्व अवघड शारीरिक चाचण्या व स्पर्धांतून

तावून सुलाखून

बाहेर पडल्या. यास काय मानसिक व शारीरिक दुर्बलता म्हणणार? पोलीस खात्यात महिला आहेत. नक्षलग्रस्त भागातील मोहिमांचे नेतृत्व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. मोठय़ा शहरांचे पोलीस आयुक्त पद, राज्याचे पोलीस महासंचालक पद महिला अधिकाऱ्यांनी भूषवून गौरव वाढवला आहे. इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यांनी देशाचे नेतृत्व अत्यंत बेडरपणे केले. 1971 साली त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण बांगलादेशचे युद्ध जिंकले. त्यामुळे लष्करातील महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा कार्यक्षमतेत कमी असतात हा सरकारी दावा कुणालाच मान्य होणार नाही. हिंदुस्थानी स्त्रीयांनी भडकत्या चितेत उडी मारून स्वतःला अग्निकन्या म्हणून सिद्ध केले. हजारो स्त्रीयांनी ‘जोहार’ करून स्वतःच्या शीलरक्षणासाठी जे साहस, शौर्य दाखवले ते अनेकदा पुरुषांनाही जमले नसते. आमच्या स्त्रीया कुस्ती खेळतात, मुष्टियुद्ध खेळतात, कबड्डीच्या खेळात पदक मिळवतात. स्त्रीया कोठेच कमी नाहीत. एक दिवस त्या लष्करप्रमुख होतील व जगातील बलाढय़ हिंदुस्थानी सेनेचे नेतृत्व करतील याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही. न्यायालयाने हिंदुस्थानी स्त्रीला ‘मर्दानी’ ठरवले. हा निर्णय ऐतिहासिक आहे! रायगडचा अत्यंत अवघड कडा रात्रीच्या किर्रर्र अंधारात उतरणाऱ्या हिरकरणीनेदेखील प्रचंड साहसाचे दर्शन घडवले होते. हिंदवी स्वराज्यातील ही हिरकणी काय किंवा स्वतंत्र हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांत शौर्य गाजविणाऱ्या आजच्या ‘हिरकण्या’ काय, सगळय़ांनी शौर्यशाली नारीशक्तीचाच परिचय वेळोवेळी जगाला करून दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा या सर्व ‘हिरकण्यां’चा विजय आहे!

आपली प्रतिक्रिया द्या