सामना अग्रलेख – पोलीस झिंदाबाद! प्रियंकाला न्याय मिळाला!

6684

हैदराबादमधील बलात्काऱ्यांना मृत्युदंड देताच पोलीस सामान्य जनतेच्या दृष्टीने हीरो ठरले आहेत. ‘पोलीस झिंदाबाद’ अशी भावना तेथील जनतेच्या मनात आहे. दहशतवादी आणि बलात्काऱ्यांना किती काळ पोसायचे? हे धंदे आता पुरे झाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव हे सात दिवसांनंतरही प्रियंकाच्या माता-पित्यांना भेटायला गेले नाहीत अशी टीका झाली. आता ते ताठ मानेने जातील. प्रियंकाला न्याय मिळाला आहे. कुणी काही म्हणोत!

तेलंगणा पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. ‘पोलीस झिंदाबाद’च्या घोषणा देत जनतेने पोलिसांवर फुले उधळली आहेत. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले. पडद्यामागची पटकथा अशी आहे की, पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेले. तेथे त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार केले. या कथेवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, पण चार नराधमांचा खात्मा झाला याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला. प्रियंका रेड्डी या तरुणीवर 27 नोव्हेंबरला सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर बलात्काऱ्यांनी तिला ठार केले आणि तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला. तेव्हापासून देशात संतापाची लाट उसळली होती. मात्र आता गुरुवारच्या पोलीस चकमक प्रकरणानंतर हा संतापाचा अग्नी थंड झाला असेल. पोलिसांनी फक्त सात दिवसांत बलात्कारातील आरोपींना मृत्युदंड दिला. तपास, आरोपपत्र, खटल्याची सुनावणी, कोर्टातल्या तारखांवर तारखा या सगळय़ा प्रकारांना फाटा देऊन हैदराबाद पोलिसांनी ‘न्याय’ देण्याचा शॉर्टकट मार्ग स्वीकारला. अर्थात, त्याबाबत आता दोन तट पडले आहेत. पोलिसांनी ‘न्याय’ देण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारला नाही असे एका बाजूचे म्हणणे आहे. मुळात हा

कायदेशीर मार्ग म्हणजे नक्की काय असतो? वस्तुस्थिती अशी आहे की, पोलिसांनी जो बेकायदेशीर मार्ग स्वीकारला तीच लोकभावना आहे. चकमक झाली की नाही हा वाद सोडा. आम्ही स्वतः या चकमकीवर विश्वास ठेवायला तयार नाही. प्रियंका रेड्डीचे प्रकरण इतके संवेदनशील आहे की, चारही आरोपी कडक पोलीस बंदोबस्तात होते. किंबहुना ते आरोपी मानसिक दबावाखाली होतेच व गेले सात दिवस त्यांची अशी धुलाई झाली असेल की, त्यांना जागचे हलताही येत नसावे. अशा वेळी कडक बंदोबस्तात सशस्त्रा पोलिसांच्या पहाऱयात हे चार बलात्कारी पळून जाण्याचा प्रयत्न करतील हे संभवत नाही. मुंबईतदेखील अशा अनेक खऱया-खोटय़ा चकमकी झालेल्या आहेत, पण या चकमकीमुळेच मुंबईचे गुन्हेगारी जग साफ झाले. त्यामुळे हैदराबादच्या पोलिसांनी चार बलात्काऱ्यांना कायमचे संपवले असेल तर त्याचे स्वागत केलेच पाहिजे. मग भले ती चकमक खरी असेल अथवा बनावट. बलात्कार आणि ऑनर किलिंगसारख्या गुन्हय़ांनी देशाच्या प्रतिष्ठेला रोज तडे जात आहेत. ही एक सामाजिक विकृती आहे वगैरे बोलायला ठीक, पण कायद्याची लांबलचक प्रक्रियासुद्धा गुन्हेगारांना बळ देत आहे. दिल्लीत झालेल्या निर्भयाचे बलात्कारी अजून जिवंत आहेत. कारण त्यांना

फाशी देण्यासाठी जल्लाद सापडत नाही. कोपर्डीकांडाचे बलात्कारी जिवंत आहेत. नयना पुजारीचे बलात्कारी जिवंत आहेत. बलात्काऱयांना फाशी हा कायदा झाला आहे; मग हे बलात्कारी अद्यापि जिवंत कसे, हा प्रश्न आहे. म्हणूनच हैदराबादमधील बलात्काऱयांना मृत्युदंड देताच पोलीस सामान्य जनतेच्या दृष्टीने हीरो ठरले आहेत. ‘पोलीस झिंदाबाद’ अशी भावना तेथील जनतेच्या मनात आहे. बलात्काऱयांचा न्याय जागच्या जागी करा अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांनी उघडपणे घेतली होती. बलात्काऱ्यांना ‘इस्लामी’ कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणीदेखील अनेकदा होत असते, पण हैदराबादला चार नराधमांना पोलिसांनी दिलेली शिक्षा बेकायदेशीर नाही. तो जनआक्रोश होता. दहशतवादी आणि बलात्काऱयांना किती काळ पोसायचे? हे धंदे आता पुरे झाले. हैदराबादच्या पोलिसांनी जे केले ते कायद्याला धरून केले नाही, असे केल्याने कायद्याचे राज्य नष्ट होईल अशी पोपटपंची जे करतात त्यांनी तडफडणाऱ्या, किंकाळी मारणाऱ्या प्रियंकाच्या जागी आपल्या घरातील लेकी-सुनांचा चेहरा पाहावा. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव हे सात दिवसांनंतरही प्रियंकाच्या माता-पित्यांना भेटायला गेले नाहीत अशी टीका झाली. आता ते ताठ मानेने जातील. प्रियंकाला न्याय मिळाला आहे. कुणी काही म्हणोत!

आपली प्रतिक्रिया द्या