सामना अग्रलेख – ‘थँक यू’ मि. ट्रम्प आणि मंडळ; हा आहे हिंदुस्थान!

19412

कोरोनावर औषधे, लस वगैरे शोधण्याचे रोज नवे दावे समोर येत असले तरी त्यात आजपर्यंत कोणाला यश आलेले नाही. तसे आले असते तर ट्रम्प वगैरे मंडळींनी हिंदुस्थानकडे `क्लोरोक्विन’सारख्या औषधांची विनवणी केली नसती. पंतप्रधान मोदी यांनी ही औषधे खुल्या मनाने देऊन मानवधर्माचे पालन केले, पण गेल्या साठ वर्षांत आपला देश विज्ञान व औषधनिर्मिती क्षेत्रांत प्रगतीपथावर पोहोचल्याचे हे प्रमाणपत्र आहे. स्वातंत्र्यानंतरचे अथक परिश्रम आणि तत्कालीन नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे हे घडले. अमेरिका, इस्रायल व इतर राष्ट्रांच्या पुढे आज हिंदुस्थान पोहोचला. महासत्तांनी हिंदुस्थानचे आभार मानले. हा मानवतेचाही विजय आहे!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना `थँक यू’ म्हटल्याबद्दल काही मंडळींना आनंदाचे भरते आले आहे. इस्रायल आणि ब्राझीलच्या राष्ट्रप्रमुखांनीही आपल्या पंतप्रधानांना `थँक यू’ म्हटले आहे. लाख लाख आभार अशा भावना व्यक्त केल्या आहेत. “पहा, इतक्या मोठय़ा सुपर पॉवर राष्ट्रांचे प्रमुख आम्हाला `थँक यू’ म्हणतात. म्हणजे देशाची प्रतिष्ठा आणि ताकद किती वाढली आहे,” असा प्रचार सध्याच्या दु:खद प्रसंगातही सुरू आहे. या सगळय़ांनी हिंदुस्थानला `थँक यू’ म्हटले, ते त्यांची गरज हिंदुस्थानने पूर्ण केली म्हणून. कोरोना महामारीविरुद्ध लढताना हे सर्व ‘पॉवरफुल’ देश भयभीत झाले आहेत. ज्ञान-विज्ञानात, आरोग्य सेवेत मोठी झेप घेतल्याचा या देशांचा दावा कोरोना विषाणूने पोकळ ठरविला. कोरोनाशी मुकाबला करणारे `हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’या औषधांवरील या निर्यात बंदी लगेच उठवा आणि आम्हाला हे औषध तात्काळ पाठवा, अशी विनवणी ट्रम्प, नेतान्याहू आणि जायर बोल्सोनारो या त्रिमूर्तीने केली व पुढच्या चोवीस तासांत आपल्या मोदी सरकारने 21 औषधांवरील निर्यात बंदी उठवून अमेरिकेस हव्या असलेल्या औषध पुरवठय़ाचा मार्ग मोकळा केला. वेळेला आणि गरजेला पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तो खरा दोस्त. त्या दोस्तीस हिंदुस्थान जागला व त्याबद्दल ट्रम्प, नेतान्याहू, ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी आभार मानले. या दिलेरीबद्दल आम्हालाही आनंदच आहे. पण प्रे. ट्रम्प व इतर दोन राष्ट्राध्यक्षांच्या भाषेत फरक पहा. ट्रम्प यांनी औषधांची खेप मागताना धमकीवजा भाषेचा वापर केला. `देता की नाही? नाही दिलेत तर बघून घेऊ’ अशी भाषा त्यांनी केली. ती हिंदुस्थानी जनतेचा स्वाभिमान आणि अभिमान दुखावणारी आहे. आज जे लोक ट्रम्प यांनी हिंदुस्थानला `थँक यू’ म्हटल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत, तेच लोक ट्रम्प यांच्या धमकी व इशाऱ्याच्या अपमानास्पद भाषेनंतर

चिडीचूप बसले

होते. त्यांचा सोशल मीडियादेखील शेपटास तूप चोळून शांत बसला होता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण कोरोनाविरुद्धचे मोठे युद्ध लढत आहोत. हिंदुस्थान 130 कोटी लोकसंख्येचा, दाटीवाटीचा आणि गर्दीचा देश आहे. मलेरियासारखे आजार येथे सदैव हल्ला करीत असतात. त्यामुळे अशा आजारांवर जालीम उपाय ठरणाऱ्या औषधांची निर्मिती करणाऱ्या देशी कंपन्यांना पंडित नेहरूंपासून पुढील अनेक राज्यकर्त्यांनी पाठबळ दिले. ही औषधे येथील जनतेची गरज असल्याने त्यांच्या निर्यातीवर बंदी घातली. `क्लोरोक्विन’ हे औषध मलेरियावर गुणकारक आहे व हेच औषध कोरोनास रोखू शकते असे आता समोर आले आहे.  त्यामुळे जगातील सगळय़ांची तोंडे आमच्याकडे वळली, पण हे `क्लोरोक्विन’ औषध जगाला पुरवत असताना व त्याबाबत जागतिक वाहवा मिळवत असताना हिंदुस्थानी जनतेसाठी त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे काय, यावरही प्रकाश टाकला पाहिजे. अशा जीवनरक्षक औषधांवर आता पहिला अधिकार हा आमच्या लोकांचाच असायला हवा. यारी, दोस्ती निभावताना हा विचार होणे गरजेचे आहे. ट्रम्प वगैरे मंडळींना पुरवठा करण्यासाठी या औषधांचे उत्पादन वाढवा, पण जे आहे ते आमच्या कोरोनाग्रस्तांपर्यंत आधी पोहोचवा. कोरोनाने आतापर्यंत जगात एक लाखावर लोकांचा मृत्यू झाला आहे.  उत्कृष्ट आरोग्य यंत्रणेचा टेंभा मिरवणारी अमेरिका, ब्रिटन आणि इटलीसारखी राष्ट्रे कोरोनामुळे अतिदक्षता विभागात तडफडताना दिसत आहेत. हिंदुस्थानात कोरोनाची संक्रमण गती वाढत आहे. महाराष्ट्रात एका दिवसात 230 नव्या केसेस समोर आल्या. गुरुवारी एका दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला, तर देशात 700 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या. म्हणजेच देशात कोरोनाचे संक्रमण भयावह रीतीने आणि वेगाने फैलावत आहे. साहजिकच आता पुढे काय, या चिंतेने सगळय़ांनाच ग्रासले आहे. कोरोनावर औषधे, लस वगैरे शोधण्याचे रोज नवे दावे समोर येत असले तरी त्यात आजपर्यंत कोणाला यश आलेले नाही. तसे आले असते तर ट्रम्प वगैरे मंडळींनी हिंदुस्थानकडे `क्लोरोक्विन’सारख्या औषधांची विनवणी केली नसती. पंतप्रधान मोदी यांनी ही औषधे खुल्या मनाने देऊन मानवधर्माचे पालन केले, पण गेल्या साठ वर्षांत आपला देश विज्ञान व औषधनिर्मिती क्षेत्रांत प्रगतीपथावर पोहोचल्याचे हे प्रमाणपत्र आहे. अमेरिकादी राष्ट्रांनी हिंदुस्थानला सदैव शास्त्रास्त्रे, लढाऊ विमाने, संरक्षण सामग्री विकली (म्हणजे गळय़ात मारली), पण औषधांसाठी मात्र त्यांना हिंदुस्थानपुढे हात पसरावे लागले. आपल्या देशातील औषधनिर्मितीचा हा विकास आणि प्रगतीचा टप्पा फक्त मागील पाच-दहा वर्षांत गाठला गेलेला नाही. किंबहुना स्वातंत्र्यानंतरचे अथक परिश्रम आणि तत्कालीन नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे हे घडले. अमेरिका, इस्रायल व इतर राष्ट्रांच्या पुढे आज हिंदुस्थान पोहोचला. महासत्तांनी हिंदुस्थानचे आभार मानले. हा मानवतेचाही विजय आहे!

आपली प्रतिक्रिया द्या