सामना अग्रलेख- एकवीस दिवसांचा निर्धार, हीच खरी गुढी

इटली, जर्मनी, चीन, अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवला आहे. आपला देश अद्याप त्या स्थितीला पोहोचलेला नाही. तो त्या स्थितीला पोहोचू न देण्याचा निर्धार करणे याच निश्चयाची गुढी आज घरोघर उभारायला हवी. कोरोनाशी सारे जग लढते आहे. हिंदुस्थान लढतोय. महाराष्ट्राने तर महायुद्ध पुकारले आहे. आजचा गुढी पाडवा “कोरोना”वरील विजयाची गुढी नक्की फडकवेल. वालीरूपी कोरोनाचा नाश होईल. घराघरात राम सैन्य आहे. त्यातील प्रत्येक जण सरकारी आदेश पाळून नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी घरात बसूनच सरकारला सहकार्य करेल. जे रामास मानतात त्यांनी एकवीस दिवस घरीच थांबावे. असे घडले तरच आजची गुढी अखंड टिकेल.

देशाचे वातावरण निराशाजनक आहे. लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. कोरोना संकटाचे ढग काळ्याकुट्ट सावल्या घेऊन फिरत आहे. या ढगांचा गडगडाट नसला तरी वातावरणात अंधार निर्माण करण्याचे काम त्यांनी नक्कीच केले आहे. अशा वातावरणात समस्त हिंदू धर्मीयांचा आनंदाचा सण, गुढी पाडवा उगवला आहे. पाडवा उगवला, पण तो साजरा होईल का? घरात गोडधोड शिजेल का? गुढ्या, पताका फडकतील का? आजच्या आनंदाच्या दिवशी “पै पाहुणे” येण्याजाण्याची मुभा आहे का? असे अनेक प्रश्न यंदाचा पाडवा घेऊन आला आहे. पाडव्याच्या मंगलदिनी एकमेकाना गळाभेटी देण्याची इच्छा असली तरी सध्याच्या घडीला ते शक्य दिसत नाही. गर्दी टाळणे, घरातच थांबणे, एकमेकांशी संपर्क न ठेवणे, आपली सुरक्षा आपण स्वतःच सांभाळणे, आपणच आपली कवच कुंडले बनणे आणि आपल्याबरोबर समाजाच्याही सुरक्षेची गुढी उभारणे हाच आजच्या पाडव्याचा आनंद मानायला हवा. गुढी पाडवा हा चैतन्यहीन मानवात चेतना निर्माण करून त्याची अस्मिता जागृत करणारा सण आहे. मनातील सर्व वैरभाव विसरून अशांतता, अस्वस्थता यांवर विजय मिळवून देणारा, त्यातून आनंदाची उधळण करणारा सण आहे. एक प्रकारे हिंदू नव वर्षाचा प्रारंभ करणारा शुभ दिवस आहे. महाराष्ट्रात साजरा होणारा गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणाचा संचार केला अशी लाक्षणिक कथा आहे. आज कोरोनामुळे संपूर्ण मानवजात लोळागोळा होऊन पडली आहे. जिवंत माणसे गतप्राण झाल्यासारखी वावरत आहेत. त्यांच्यात प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे आहे. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामाने वालीच्या त्रासातून दक्षिणेतील जनतेला मुक्त केले होते. या मुक्त झालेल्या प्रजेने उत्सव साजरा करीत घराघरांवर विजयाच्या, स्वातंत्र्याच्या आणि स्वाभिमानाच्या गुढ्या उभारल्या होत्या. वालीचा वध करून श्रीरामांनी प्रजेला छळमुक्त केले होते. आज वालीरूपी कोरोनाचा पराभव करून आपल्याला विजयाचा उत्सव साजरा करायचा आहे. निदान तसा निश्चय आपण केलाच पाहिजे. घराघरातून रामाने वालीचा, आसुरी शक्तींचा नाश केला. याची गुढी ही सूचक आहे. प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास आजच्याच दिवशी संपला. म्हणून हा आनंदाचा दिवस साजरा होतो. प्रभू राम चौदा वर्षे वनवासात राहिले, तसे महाराष्ट्राच्या, जनतेच्या अखंड आनंदासाठी आपल्याला पुढील एकवीस दिवस विजनवासात राहायचे आहे. हा “वनवास” नसून अज्ञातवास आहे. हे एकवीस दिवस म्हणजे पुढील अनेक वर्षं आनंदात घालवणाऱ्या

सुखाची शिडी

आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी आपण हा विचार पक्का करायला हवा. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हा दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, म्हणजे आजच्या गुढी पाडव्याचा. आजचा दिवस शत्रूचा पराभव करण्याचा. उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजचा “पाडवा” घरीच साजरा करा. गुढी आनंदासाठी उभारली जाते हे एकदा मान्य केले तर उद्याच्या आनंदासाठी आज घरातच आनंद साजरा करा. इटली, जर्मनी, चीन, अमेरिकेत कोरोनाने हाहाकार उडवला आहे. आपला देश अद्याप त्या स्थितीला पोहोचलेला नाही. तो त्या स्थितीला पोहोचू न देण्याचा निर्धार करणे याच निश्चयाची गुढी आज घरोघर उभारायला हवी. हे नव वर्षं हिंदूंचे आहे, पण त्या हिंदुत्वात उन्माद नको, धर्मांधता नको. हिंदुत्व हे

मानवतेचे दुसरे रूप

आहे. आज कोरोनामुळे जगातील सर्वधर्मीय संकटात सापडले आहेत. अनेक देशात शवपेट्या, कब्रस्ताने कमी पडत आहेत. त्या सगळ्यांसाठी सद्भावनेची गुढी हिंदू म्हणून उभारणे हीच हिंदुत्वाची ताकद ठरेल. कोरोनाशी सारे जग लढते आहे. हिंदुस्थान लढतोय. महाराष्ट्राने तर महायुद्ध पुकारले आहे. आजचा गुढी पाडवा “कोरोना”वरील विजयाची गुढी नक्की फडकवेल. वालीरूपी कोरोनाचा नाश होईल. घराघरात रामसैन्य आहे. त्यातील प्रत्येक जण सरकारी आदेश पाळून नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी घरात बसूनच सरकारला सहकार्य करेल. प्रभू रामाने चौदा वर्षांचा वनवास आजच्या दिवशी संपविला. जे रामास मानतात त्यांनी एकवीस दिवस घरीच थांबावे. असे घडले तरच आजची गुढी अखंड टिकेल!

आपली प्रतिक्रिया द्या