सामना अग्रलेख – सर्वनाश! बंगालच्या पाठीशी उभे रहा…

कोरोनाशी झुंजत असतानाच सर्वनाश करणारे अम्फान हे चक्रीवादळ पश्चिम बंगालवर आदळले. या भयंकर प्रलयात जे नुकसान झाले, ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. या न भूतो अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये पश्चिम बंगाल एकाकी लढतोय, असे चित्र उभे राहणे योग्य नाही. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनीच पश्चिम बंगालच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. संपूर्ण देश या संकटकाळात पश्चिम बंगालच्या सोबत आहे, असा संदेश देण्याची ही वेळ आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सारे जग ठप्प आणि स्तब्ध झाले असतानाच हिंदुस्थानवर बुधवारी आणखी एक आपत्ती कोसळली. अम्फान या प्रलयंकारी चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांत हाहाकार उडविला. खास करून पश्चिम बंगालमध्ये या भयंकर चक्रीवादळाने जो उत्पात माजविला, तो थरकाप उडविणारा आहे. हिंदुस्थानच्या पूर्वेस असलेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेस असलेला अरबी समुद्र या दोन्ही महासागरांच्या किनारपट्टीवरील राज्यांनी आजवर अनेक चक्रीवादळांचे तडाखे झेलले आणि पचविले. मात्र, अम्फान या चक्रीवादळाचे रूपच इतके अक्राळविक्राळ होते की, बांगलादेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील शेकडो गावे तहसनहस झाली. अवघ्या काही मिनिटांत अनेक जिल्ह्यांतील घरेदारे जमीनदोस्त झाली. शेती-वाडी उद्ध्वस्त झाली, विजेचे खांब पालापाचोळ्यासारखे उडून गेले, लाखो झाडे उन्मळून पडली. ताशी सुमारे 200 किलोमीटर इतक्या भयंकर वेगाने घोंघावत आलेल्या या चक्रीवादळाने क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले. शेतातील उभी पिके, बागा नेस्तनाबूत झाल्या. वादळी वारे, धुवाधार पाऊस आणि सोबतच समुद्रातून उठलेल्या अजस्र लाटा हे सगळेच दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वॉररूममध्ये बसून हे सगळे विनाशकारी थैमान उघडय़ा डोळ्यांनी बघितले. चक्रीवादळाचे हे

भयभीत करणारे तांडव

बघून ममता दीदींच्या तोंडून एकच शब्द उमटला ‘सर्बोनाश’! ही प्रतिक्रियाच पुरेशी बोलकी आहे. ओडिशाच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये झालेली भयंकर हानी सर्वनाश म्हणावा अशीच आहे. एकटय़ा पश्चिम बंगालमध्ये 80 लोक चक्रीवादळाच्या तडाख्याने मृत्युमुखी पडले. ममता बॅनर्जी यांनी वेगवान हालचाली करून 5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले म्हणून प्राणहानी कमी झाली. किनारपट्टीलगत असलेला पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील संपूर्ण भाग या महाविनाशी चक्रीवादळाने गिळंकृत केला. संपूर्ण जगाला धडकी भरविणाऱ्या कोरोना व्हायरसपेक्षाही अम्फान चक्रीवादळाचा तडाखा अधिक भयंकर आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच म्हटले आहे. जे आर्थिक नुकसान या प्रलयाने घडविले, ते पश्चिम बंगालचे कंबरडे मोडणारे आहे. वीज, इंटरनेट ठप्प आहे. रस्ते अदृश्य झाले आहेत. जे रस्ते थोडेफार टिकले, त्यावर तुटून पडलेल्या झाडांचा खच पडला आहे. ही सगळी साफसफाई करून प्रशासन दुर्गम भागातील गावखेड्यापर्यंत कसे पोहचणार, हादेखील प्रश्नच आहे. त्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज लागू शकेल. मात्र, जी प्राथमिक माहिती मिळते आहे, त्यानुसार

1 लाख कोटी रुपयांहून

अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील विनाशाचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर 1 हजार कोटी रुपयांचे पॅकेज पश्चिम बंगालसाठी जाहीर केले. बंगाल पुन्हा आपल्या पायावर ताठपणे उभा राहील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. पण 1 लाख कोटींचे नुकसान झाले असताना अवघ्या 1 हजार कोटींच्या मदतीवर बंगाल कसा उभा राहील, हा प्रश्नच आहे. तुफानी पाऊस आणि समुद्रात उसळलेल्या महाकाय लाटांसह समुद्राचे खारट पाणी किनारपट्टीलगतच्या शेतजमिनींमध्ये घुसले. समुद्राच्या पाण्यातील मिठाचा अंश जमिनीत गेल्यामुळे या शेतजमिनींचे जे कायमस्वरूपी नुकसान झाले, त्याची तर मोजदाद करणेही कठीणच. एक तर देशभरातील सर्वच राज्यांच्या तिजोऱ्या कोरोनाच्या संकटामुळे रिकाम्या झाल्या. तीन महिन्यांत कुठलाही नवा महसूल नाही आणि खर्च मात्र अव्याहतपणे सुरू आहे. अशा परिस्थितीतही कोरोनाशी झुंजत असतानाच सर्वनाश करणारे अम्फान हे चक्रीवादळ पश्चिम बंगालवर आदळले. या भयंकर प्रलयात जे नुकसान झाले, ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. या न भूतो अशा आपत्तीमध्ये पश्चिम बंगाल एकाकी लढतोय, असे चित्र उभे राहणे योग्य नाही. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनीच पश्चिम बंगालच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. संपूर्ण देश या संकटकाळात पश्चिम बंगालच्या सोबत आहे, असा संदेश देण्याची ही वेळ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या