सामना इफेक्ट – महिला कर्मचाऱ्यांच्या भांडणात सर्व कंपनी डिओची उचलबांगडी

pune-police

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होते असे बोलले जाते. प्रत्यक्षात मात्र, शिवाजीनगरमधील पोलीस मुख्यालयात दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा तोटा सर्व कंपनी डिओंना झाला आहे. संबंधित कंपनी डिओंची तातडीने बदली करण्यासाठी पोलीस मुख्यालय पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पातळीवरून आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ए, बी, सी, आर आणि महिला कंपनींची उचलबांगडी करण्यात आली आहे. यासंदर्भात ‘दैनिक सामना’ ऑनलाईन पोर्टलने सर्वातआधी वृत्त प्रसिद्ध केले होते.

काल ड्युटी ऑफिसर मदतनीस असलेल्या पोलीस शिपाई महिलेने थेट पोलीस नाईक महिलेला मारहाण केली. मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन सर्व डिओ कंपनीची उचलबांगडी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दीपाली जाधव असे हाणामारीत जखमी झालेल्या पोलीस नाईक महिलेचे नाव आहे. सना शेख असे मारहाण करणाऱ्या महिला शिपायाचे नाव आहे. ड्युटीसंदर्भात दोघींमध्ये शाब्दिक वादावादीतून शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानंतर मारहाणीच्या घटनेनंतर थेट सर्व कंपनीच्या डिओंची बदली करण्यात येणार आहे. यासंदर्भात कंपनीमधील डिओंचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त झाल्याचे कारण देत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, दोघींच्या भांडणात आमच्याविरुद्ध विनाकारण कारवाई केल्याची माहिती एका महिला डिओने सामनाला दिली आहे.

हाणामारीनंतरही गुन्हा दाखल नाहीच

सर्वसामान्य नागरिकांची भांडणे झाल्यानंतर पोलिसांकडून तातडीने गुन्हा दाखल करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र, पोलीस मुख्यालयात झालेल्या हाणामारीत महिला पोलीस नाईक रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांनी पाठराखण केल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या