सामना इफेक्ट! चंद्रपुरातील कोंडाणा गावाला पाणीपुरवठा करण्याचे खासदार धानोरकर यांचे आदेश

चंद्रपुरातील कोंडाणा या गावात पिण्याच्या पाण्याचं भयाण चित्र मांडणारी बातमी मंगळवारी प्रकाशित झाली होती. त्या बातमीची दखल खासदार सुरेश धानोरकर यांनी घेतली असून कोंडाणा ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या मागासलेला भाग अशी ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील कोंडाणा हे लहानसं गाव आहे. धाबा ग्रामपंचायतीत हे गाव येतं. गावाला जाण्यासाठी नीट रस्ताही नाही. गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यालगतचे नाले तुडुंब भरलेले आहेत. पण ठेच लागली तरी मार्गाने चालत जाऊ. घाण सहन करू, मात्र किमान प्यायला शुद्ध पाणी द्या, अशी मागणी हे ग्रामस्थ करत आहेत.

या गावात नळ योजना पोहोचली आहे. धाबा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा होतो . मात्र ही योजना महिन्यातून दहा पंधरा दिवस बंदच असते. नळांना पाणी आलं तर ते एकतर गढूळ असतं, काही नळाना पाणी पोहोचत नाही. अशा स्थितीत गावकरी एक किमी अंतरावर असलेल्या नाल्यातील डबक्याचे पाणी आणतात. या डबक्याभोवती कुंपण नाही. दिवसाउजेडी आणि रात्रभर या डबक्यातील पाणी गुरंढोरं पितात. मोकाट कुत्री या डबक्यात बसतात. जंगली जनावरंही येथील पाण्याने तहान भागवतात. पहाटे याच डबक्यातील पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करतात. अख्ख गाव या डबक्यातील पाण्याने तहान भागवतं. गावात नळ योजना कार्यान्वित होण्याच्या पूर्वी याच पाण्याने गावकरी तहान भागवायचे. आता नळ असले तरी तीच वेळ गावावर ओढवली आहे.

या दुर्दशेची बातमी 23 मे रोजी सामनाने प्रकाशित केली होती. त्या बातमीची दखल खासदार सुरेश धानोरकर यांनी घेतली आहे. चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना या संबंधी तत्काळ व्यवस्था करण्याचे आणि त्याची माहिती कळवण्याचे आदेश धानोरकर यांनी दिले आहेत.