पुष्पक विमान – निरागस नात्यांची विमान भरारी

>>वैष्णवी कानविंदेपिंगे<<

आयुष्यात बांधिलकीसाठी गरज असते ती नात्याची. जितकं सहज नातं तितकं ते सुंदर फुलतं…अशीच नात्यांची गोड गोष्ट घेऊन ‘पुष्पक विमान’ हा सुबोध भावे लिखित सिनेमा लँड झाला आहे. स्वप्न मोठीच असली पाहिजेत असं नाही. अगदी छोटय़ा छोटय़ा स्वप्नपूर्तीतून आणि त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी केलेल्या खटाटोपातूनही तितकाच आनंद मिळतो. याचा प्रत्यय देणारा हा सिनेमा त्यासोबत वेगवेगळय़ा नात्यांच्या आणि त्या नात्यातल्या सहजतेच्या लडीदेखील उलगडायचा प्रयत्न करतो. सिनेमा मांडणीतून अधिक घट्ट नक्कीच बांधता आला असता. त्याच्यात मिसळलेल्या फॅण्टॅसीपेक्षाही अधिक सहज भाव वापरला असता तर सिनेमाची गंमत जास्त खुलली असती, पण तरीही सिनेमाची हलकी फुलकी आणि आयुष्याबद्दल काही सांगू पाहणारी ही कथा सुखावून नक्कीच जाते.

आईवडिलांच्या पश्चात आपल्या नातवाला हिमतीने सांभाळणाऱया आजोबांनी त्याला लहानपणापासून स्वप्नांची कास धरायला शिकवलेलं असतं. नातू मोठा झाल्यावर आपल्या कोकणातल्या बायकोसोबत मुंबईला एका वस्तीत छोटंसं घर, छोटासा व्यवसाय स्थापन करून स्थिर होतो, पण खान्देशातच राहणारे आजोबा आपल्या नातवाच्या आठवणीत कासावीस होत असतात. मग काही कारणांमुळे नातू आजोबांना हट्टाने मुंबईत आपल्या घरी घेऊन येतो. मुंबईतल्या कोंदट वातावरणाला कंटाळलेल्या आजोबांना अचानक इथे राहण्यासाठी एक दिशा मिळते. त्यांना अशक्य वाटणारं एक स्वप्न या मुंबईतच पूर्ण होऊ शकतं हे त्यांना समजतं आणि मग त्या स्वप्नाच्या दिशेने भरारी घेण्यास आजोबा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यास नातू सज्ज होतो. काय असतं ते स्वप्न, ते पूर्ण होतं का, त्या स्वप्नाला पूर्ण करायला कोण काय काय करतं या सगळय़ाची गंमत म्हणजे हा सिनेमा.

खरं तर एखादं स्वप्न आणि त्या स्वप्नाच्या दिशेने घेतली जाणारी झेप असे विषय मराठी सिनेमांमध्ये आपण खूपदा पाहिले आहेत. त्यामुळे विषयाच्या गाभ्यात तसं नावीन्य नाही, पण तरीही त्याला दिलेली नात्यांची नाजूक वीण, हलका फुलका बाज आणि अलगद भावनांना या कथेतून सुबोध भावेने एक सहजता दिली आहे. त्यामुळे ही कथा सुखावून नक्कीच जाते, पण ती पडद्यावर मांडताना पटकथेत बऱयाचदा तोचतोचपणा आल्यासारखा वाटतो. कदाचित खुसखुशीत प्रसंगांची मालिका आणि त्यात काही गहिरे प्रसंग पेरले असते तर या कथेने अधिक समतोल साधला असता. दिग्दर्शनालाही बऱयाच ठिकाणी मर्यादा पडल्यासारख्या वाटतात. ही गोष्ट नात्यांची आहे, साधीसोपी आहे, मध्यमवर्गीयांचं स्वप्न जोपासणारी आहे. त्यामुळे त्यात तोच साधेपणा ठेवला असता तर ती आणखी खुलली असती, पण ती खुलवायला सातत्याने फॅण्टॅसीची जोड दिली गेली आहे. मोजक्या प्रसंगांत गंमत म्हणून ही फॅण्टॅसी ठीक होती, पण ती परत परत येत राहिल्याने आणि नंतर तोच भाग या सिनेमासाठी मुख्य बनल्यामुळे सिनेमाला मर्यादा येतात. मध्यांतराआधी सिनेमा त्याच्या गोड भावानुसार पुढे जात रहातो. खान्देशातील आजोबांचं वास्तव्य, गावातलं वातावरण, गावात राहणाऱया मंडळींचे स्वभाव उलगडायला लागतात, तर दुसरीकडे मुंबईतल्या माणसांचे स्वभाव, वेगवेगळय़ा जातीधर्माचं एकत्र नांदणं हे दिसत राहतं, पण या सगळय़ातून काही ठोस असं घडतच नाही. अपेक्षा असते ते सहजच काहीतरी घडायची, पण मध्यांतराआधीचा भाग हलका फुलका बाज सांभाळत तितक्यापुरताच राहतो. मध्यांतरानंतर काही संघर्षाचे प्रसंग येतात खरे, पण ते प्रसंग सिनेमामध्ये उगाच मोठे केल्यासारखे वाटतात. म्हणजे त्यातला संघर्ष तितकासा भिडतच नाही आणि तो संघर्ष सुटतो तोदेखील तितकाच सहज. त्यामुळे त्यातली गंमत तितकीशी अनुभवता येत नाही. आजोबांना उंचीची भीती असते, पण त्यानंतर दुसऱयाच प्रसंगात गावातल्या नदीवर उंच बांधावर ते आणि नातू पहुडलेले दिसतात. त्यामुळे त्या प्रसंगातलं गांभीर्य तितकंसं उरतच नाही.

अर्थात संवाद छान आहेत. हमखास हसा वसूल करणारे आणि सिनेमाच्या बाजाला साजेसे. या संवादांमधून कोकणी बाज, खान्देशी सूर तर पकडला आहेच, पण नर्म विनोदांमुळे सिनेमाला खास उठावही आला आहे. शिवाय आजोबा आणि नातवाचं मर्म सांगणारा संवाद. ‘वय वाढतं तसं आत्मा अभिमानी होतो आणि शरीर परावलंबी’ अशा तऱहेचे काही मार्मिक संवाद यामुळे सिनेमा नक्कीच खुलतो. अभिनय हे तर या सिनेमाचं शक्तिस्थळ आहे. मोहन जोशींनी रंगवलेला आजोबा झक्कास. त्याला सुबोध भावेंनी उत्तम साथ दिली आहे. खान्देशी बाज, पण मुंबईला राहिलेल्या माणसाची व्यक्तिरेखा झक्कास वठवली आहे. त्याच्या बायकोच्या भूमिकेत नवोदित अभिनेत्री गौरी महाजननेही उठावदार अभिनय केलाय. बाकीचे कलाकारही छोटय़ा छोटय़ा भूमिकेत छान वाटतात.

या सिनेमाची अभंग, कीर्तनाची गाणी किंवा मुंबईच्या पार्श्वभूमीवरील नृत्यं आणि गाणी छान जमून आली आहेत. त्यामुळे सिनेमा रंगीबेरंगी आणि सुरेल झाला आहे हे नक्की. एकूणच या सिनेमात पुरेपूर रंगीबेरंगी अनुभव आहे, हलका फुलका बाज आहे, हळुवार आनंद आहे, पण एक खमकेपणा अपेक्षित होता तो कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो. मात्र, दोन-अडीच तासांचं मनोरंजन हवं असेल तर या ‘पुष्पक विमाना’त बसायला काहीच हरकत नाही.

 दर्जा         : ***

 सिनेमा     : पुष्पक विमान

 निर्माता    : मंजिरी सुबोध भावे, सुनील फडतरे, अरुण जोशी, मुकेश पाटील

 दिग्दर्शक : वैभव चिंचाळकर

 कथा        : सुबोध भावे

 पटकथा    : चेतन सैदाणे, वैभव चिंचाळकर

 संवाद       : चेतन सैदाणे

 छायांकन : महेश अनेय

 संगीत      : नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर

 कलाकार : मोहन जोशी, सुबोध भावे,  गौरी महाजन, सुयश झुंझूरके, राहुल देशपांडे