रोखठोक – पाच राज्यांचे सोपे निकाल! नक्की कोण जिंकले?

पाच राज्यांच्या निवडणुकांत भाजपने चार राज्ये सहज जिंकली. त्यातले उत्तर प्रदेश जिंकल्याचा जल्लोष आजही सुरूच आहे. पण सीमेवरील पंजाब राज्यात भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण पानिपत का झाले? त्यावर कोणीच बोलत नाही. ‘आप’ने दिल्ली ते पंजाब हातपाय पसरले. गोव्यात ते शिरले. हे चित्र काय सांगते?

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुकांचे रणकंदन संपले आहे. पंजाब वगळता चार राज्यांत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला. त्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. पाच राज्यांत उत्तर प्रदेश हे सगळय़ात मोठे व महत्त्वाचे राज्य. लोकसभेच्या 81 जागा या राज्यातून निवडून जातात. या राज्यावर भाजपने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले, पण समाजवादी पार्टी या वेळी 42 वरून 125 पर्यंत गेली व समाजवादी पार्टीचे शंभराच्या आसपास उमेदवार दोनशे ते पाचशे मतांच्या फरकाने पराभूत झाले. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 18 जागा भाजपला यामुळे गमवाव्या लागतील हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात मोदी, शहा यांच्यापेक्षा जास्त मेहनत केली, पण त्यांना जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेसने पंधरा जागा जिंकल्या तरी भरपूर, असे सुरुवातीपासून बोलले गेले. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या मैदानात थोडे आधीच उतरायला हवे होते. त्या खूप उशिरा आल्या, पण आज त्या जे प्रयत्न करीत आहेत त्याचा फायदा त्यांना 2024 सालात होईल. दिल्लीतील विजय सभेत पंतप्रधान मोदी यांनी जोरदार भाषण केले. 2024 च्या विजयाचा मार्ग या निकालांनी मोकळा केला असे ते म्हणाले. हे त्यांचे मत आहे. 2024 पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाईल. जेथे उद्या काय घडेल हे राजकारणात सांगता येत नाही, तेथे 2024 म्हणजे फार दूरची गोष्ट झाली. गोवा, उत्तराखंड, मणिपुरांत लढाई नव्हतीच. त्यामुळे कोणती लढाई जिंकल्याचा आविर्भाव आज आणला जात आहे? खरी लढाई भाजपसाठी फक्त पंजाबात होती. पण त्या मैदानातून भाजपने पळ काढला व जेमतेम दोन जागा कशाबशा जिंकल्या. पंजाबात भाजपने विजयी झेंडा फडकवला असता तर तो विजयी जल्लोष खरा ठरला असता. पण शीख समाजाने पंजाबच्या भूमीवर अहंकाराचा पराभव केला. भाजपला पंजाबात काहीच गमवायचे नव्हते, पण काँग्रेसने पंजाब कायमचे गमावले आहे. पंजाबातून अकाली दलाचाही अस्त झाला व बादल कुटुंबीयांचे राजकारण जनतेने संपविले. स्वतः प्रकाशसिंग बादल व त्यांचे पुत्र सुखबीर बादल पराभूत झाले. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी व काँग्रेसच्या पराभवास जबाबदार असलेले प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू निवडणूक हरले. हे चित्र काय सांगते? हिंदुस्थानच्या उद्याच्या राजकारणाचे जे चित्र या पाच प्रांतांतून स्पष्ट झाले आहे त्याचा विचार आपण सर्वांनीच करावयास हवा.

आहे ते राखले!

भारतीय जनता पक्ष पाच राज्यांतील विजय साजरा करीत आहे, पण त्यांनी आहे ते फक्त राखले. नवे काय मिळवले? उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये त्यांचे राज्य होते, ते राखले. पंजाबात त्यांचा दारुण पराभव झाला व जेमतेम दोन जागा ते जिंकू शकले. येथे केजरीवाल व ‘आप’समोर श्री. नरेंद्र मोदी व शहा टिकू शकले नाहीत. पंजाबात सत्ताधारी काँग्रेसने स्वतःचा पराभव स्वतःच घडवून आणला. सिद्धूसारख्या अस्थिर मनाच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवून काँग्रेसने स्वतःच पायावर कुऱहाड मारून घेतली. उत्तराखंडमध्ये हरीश रावत हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारच पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाचा उत्तराखंडात विजय झाला. पण मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पराभूत झाले. जिंकलेल्या राज्याचा सेनापतीच पराभूत होतो तसे हे घडले. आता पुढील काळात उत्तराखंडात भाजपविरोधात नाराजी होती. पण हरीश रावत या वृद्ध नेत्याच्या हट्टापुढे बरेच काही गमवावे लागले. आता पुढील काळात जुन्या नेत्यांच्या विळख्यातून काँग्रेसची सुटका करणे हे मोठे काम गांधी बहीण-भावांसमोर आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमधील ‘जी 23’ हा जुन्यांचा गट पुन्हा उसळी मारेल. काँग्रेसचे चांगले होऊ नये अशी प्रार्थना करणारे लोक काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेस बरखास्तीचा विचार गांधीजींनी 1947 मध्ये मांडला. तो अमलात आणायची जबाबदारी या ‘जी 23’ वाल्या मंडळींनी घेतलेली दिसते. पंजाब भाजपकडे नव्हते, पण ज्या काँग्रेसकडे ते होते ते त्यांनी गमावले आहे. देशाच्या सीमावर्ती राज्यात ‘आप’सारख्या पक्षाने बहुमत मिळवणे हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव आहे. अत्यंत संवेदनशील असे हे राज्य. दिल्लीच्या केंद्रशासित राज्यावर ‘राज्य’ करणे व पंजाबचा सुभा सांभाळणे यात फरक आहे. दुसरे म्हणजे स्वतः केजरीवाल हे अर्धवट राज्याचे मुख्यमंत्री. त्यांच्याकडे गृह, अर्थ यासारखी खातीच नाहीत. उलट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मान मोठा असेल. त्यांच्या हातात स्वतःचे पोलीस दल असेल. त्याचा गैरवापर दिल्लीच्या राजकारणात होऊ नये इतकेच.

डॉ. नड्डांचे यश

भाजपचे नेते नरेंद्र मोदी हेच आहेत, पण उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या विजयाचा तुरा भाजपचे अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांच्या शिरपेचात खोवला गेला आहे. श्री. अमित शहा व योगी आदित्यनाथ यांच्यातील संबंध बरे नाहीत, अशा बातम्या अधूनमधून उठत असतात. त्या तितक्याशा खऱया नसाव्यात. कारण श्री. शहा यांनी उत्तर प्रदेशात योगींच्या विजयासाठी सभा व रोड शो केले. समाजवादी पार्टीवर सगळय़ात जास्त हल्ले शहा यांनीच केले, पण आझम खानपासून इतर सर्व वादग्रस्त लोक तरीही विजयी झाले.

वारे विरोधात

उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी वाहत होते. तरीही भाजपास मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो व त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा–सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात. मोदींप्रमाणेच दुसरे उत्सववीर श्री. अरविंद केजरीवाल. ते स्वतःचे व पक्षाचे मार्केटिंग जोरात करतात. कालपर्यंत नास्तिक असलेले केजरीवाल निवडणुकीआधी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतात व आपण हनुमान भक्त असल्याचा प्रचार करतात. केजरीवाल यांच्या दिल्ली राज्यात त्यांनी चांगले काम केले. विजेपासून पाण्यापर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत सर्वच फुकट दिले. हीच फुकटेपणाची आश्वासने त्यांनी पंजाबच्या जनतेला दिली, पण पंजाबातला सगळय़ात मोठा प्रश्न शेवटी शेतकरी व कायदा–सुव्यवस्थेचा राहील. मुख्यमंत्री भगवंत मान तो कसा हाताळणार? पंजाबात आता काँग्रेस दुर्बल झाली व अकाली दल नगण्य ठरले. संवेदनशील सीमावर्ती राज्यातले हे चित्र बरे नाही.

विरोधक नकोत!

संसदीय लोकशाहीतून राजकीय विरोधक संपविणे हा देशाला सगळ्यात मोठा धोका आहे. देशाच्याच राजकारणातून विरोधी पक्ष साम, दाम, दंड, भेदाने संपवायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करायचा हा भाजपचा आता एककलमी कार्यक्रम बनला आहे. 10 मार्चनंतर महाराष्ट्राचे सरकार पाडू, अशी घोषणा श्री. देवेंद्र फडणवीस करतात व चंद्रकांत पाटील त्यास दुजोरा देतात. प. बंगालात व महाराष्ट्रातील राज्यपाल मनमानी पद्धतीने वागतात. मग निवडणुका आणि बहुमताचा अर्थ काय? पंजाबात ‘आप’ने विजय मिळविला. गोव्यात त्यांचा शिरकाव झाला. दिल्लीतून त्यांना हटविणे कठीण आहे.

प. बंगालात ममता व महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहणारच आहे. देशातील 29 पैकी फक्त 10 राज्यांतील विधानसभेतच भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. सिक्कीम, मिझोराम, तामीळनाडूमध्ये तर भाजपचे अस्तित्वच नाही. आंध्र, केरळ, पंजाब, बंगाल, तेलंगणात, दिल्लीत, ओडिशा आणि नागालँडमधील विधानसभेत भाजप किरकोळ स्वरूपात आहे. कारण या राज्यांत ‘हिजाब’सारख्या प्रकरणांना मतदार थारा देत नाहीत. गोव्यात भाजपास 20 जागा मिळाल्या त्या फक्त इतरांनी केलेल्या मतविभागणीने. पणजीतून बाबूश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी जेनिफर जिंकल्या. हे बाबूश महाशय जिंकल्यावर म्हणतात, ‘आमच्या विजयात भाजपचे काडीमात्र योगदान नाही. आम्ही आमच्या ताकदीवर जिंकलो.’ मुंबईत गोव्याचा विजय साजरा करणाऱयांनी बाबूश महाशयांचे हे उद्गार लक्षात ठेवले पाहिजेत. गोव्यासारख्या राज्यात कोणीही जिंकले तरी तो विजय खरा नसतो. राजकारणात काहीच कायमचे नसते. मग ते उत्तर प्रदेश असो, नाहीतर महाराष्ट्र. राष्ट्रीय नेता म्हणून श्री. नरेंद्र मोदी यांना आज पर्याय नाही. पण तो पर्याय शेवटी लोकच निर्माण करतील व अहंकाराची माती होईल! पाच राज्यांतील निकालाने अहंकाराची पातळी वाढली. ती कमी झाली तरी पुरे!

Twitter – @rautsanjay61
Email – [email protected]