रोखठोक – महाराष्ट्रात राजकीय पेच, कायद्याच्या कचाट्यात लोकशाही!

महाराष्ट्र विधानसभेच्या 16 फुटीर आमदारांचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपेपर्यंत हा कायदेशीर पेच कायम राहील. लोकशाहीची सर्वच मंदिरे कशी भ्रष्ट झाली आहेत व विश्वस्तच मंदिराचा कळस कापून नेतात तेव्हा न्यायालय हाच लोकशाहीचा रखवाला ठरतो!

महाराष्ट्रात आजच्याइतका राजकीय पेच कधीच निर्माण झाला नव्हता. सारे राज्यच कायद्याच्या पेचात अडकले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील पेच कायम ठेवला. त्या 16 आमदारांत स्वतः मुख्यमंत्री शिंदे आहेत.

श्री. शिंदे मंगळवारी दिल्लीत पोहोचले व त्यांनी लोकसभेतील 12 फुटीर खासदारांचे स्वागत केले. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही फुटले असे चित्र देशपातळीवर निर्माण केले. महाराष्ट्राच्या विधानसभेतील जे सदस्य शिवसेनेतून बाहेर पडले त्यांचा युक्तिवाद एकच आहे तो म्हणजे, आमचीच शिवसेना खरी. आम्ही शिवसेना सोडली नाही! त्यांची ही भूमिका कातडी वाचविण्याची आहे. घटना ही शेवटी माणसांसाठी असते. माणसे घटनेसाठी नसतात. घटनेतील 10 व्या शेडय़ुलनुसार 16 फुटीर आमदार सरळ अपात्र ठरतील. सरकारला वाचविण्यासाठी व शिवसेनेला कायमचे संपवून टाकण्यासाठी 16 अपात्र आमदारांना पेंद्र सरकारात बसलेले लोक वाचवीत आहेत, पण सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काय निर्णय घेते यावर आता देशाचे व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे.

लोकशाहीचे भवितव्य

हिंदुस्थानातील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी जयपूरमधील एका कार्यक्रमात लोकशाही व संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली. विरोधी पक्षांची जागाही सत्ताधाऱयांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नाही. काही वर्षांपूर्वी ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर एक सर्वपक्षीय परिसंवाद झाला. त्यात विठ्ठलराव गाडगीळांसह अनेक नेते होते. गाडगीळांच्या आधी बोलणाऱया नेत्यांनी लोकशाहीच्या भवितव्याबाबत निराशेचा सूर लावला. ‘आपल्या लोकशाहीला शेवटची घरघर लागली आहे. आपली लोकशाही अतिदक्षता विभागात आहे, कोमात आहे.’ कुणी म्हणाले, लोकशाहीची अंत्ययात्रा निघाली आहे. त्या सगळय़ांच्या नंतर श्री. गाडगीळ भाषणास उभे राहिले व त्यांनी एक गोष्ट सांगितली,

‘‘एक म्हातारी होती. ती गरीब होती. एका बकाल झोपडपट्टीत राहात होती. तिच्या झोपडीच्या बाहेर एक आंब्याचे झाड होते. त्या झाडाचे आंबे विकून ती आपले पोट भरत होती, परंतु तिचे शेजारी ते आंबे चोरायला लागले. ती आणखी गरीब झाली. एके दिवशी एक साधू तिच्या झोपडीत आला आणि म्हणाला, ‘‘म्हातारे मी भुकेला आहे. मला काहीतरी खायला दे.’’ म्हातारी म्हणाली, ‘‘मी गरीब आहे. माझ्याकडे एकच भाकरी आहे. पण मी तुला त्यातली अर्धी देते.’’ साधूने अर्धी भाकरी खाल्ली, पाणी प्यायला आणि प्रसन्न झाला. तो तिला म्हणाला, ‘म्हातारे तू गरीब असशील, परंतु तुला खरी माणुसकी आहे. तू मला तुझ्यातली अर्धी भाकर दिलीस. मी प्रसन्न आहे. तू माझ्याकडे वर माग.’’

म्हातारी म्हणाली, ‘‘मला असा वर दे की, माझे शेजारी आंबे चोरायला आले की त्यांनी झाडाला हात लावल्याबरोबर ते झाडाला चिकटून लटकत राहतील व मी आज्ञा केल्याशिवाय सुटणार नाहीत.’’ साधू म्हणाला, ‘‘तथास्तु!’’ दुसरे दिवशी तिला सकाळी आठ-दहा शेजारी आंब्याच्या झाडाला लटकलेले दिसले. सर्व ओरडत होते, ‘‘म्हातारे सोडव! म्हातारे सोडव! पुन्हा झाडाला हात लावणार नाही.’’ असे त्यांनी कबूल केल्यावर तिने त्यांना सोडून दिले.

आणखी काही वर्षे गेली. म्हातारी आणखी म्हातारी झाली. तिच्या मृत्यूची वेळ आली. तिच्या मरणाचा दिवस आला. एके दिवशी यमराज तिला न्यायला आला. ती यमराजाला म्हणाली, ‘‘मला आणखी काही दिवस जगू द्या!’’ यमराज म्हणाले, ‘‘नाही, ते शक्य नाही. कारण तुझ्या कपाळावर मरीआईने आजचा दिवस लिहिला आहे. त्यामुळे तुला आजच न्यावे लागेल. परंतु तुझी शेवटची काही इच्छा असेल तर सांग.’’

म्हातारी हुशार. ती म्हणाली, ‘‘माझ्या झोपडीच्या बाहेर माझे एक आंब्याचे झाड आहे. मरण्यापूर्वी त्याचा एक आंबा खावासा वाटतो आहे.’’ आंबा आणायला यमराज स्वतः झाडाजवळ गेले. झाडाला स्पर्श करताच यमराजही झाडाला चिकटले आणि ओरडू लागले, ‘‘म्हातारे सोडव, म्हातारे सोडव.’’ म्हातारी म्हणाली, ‘‘एका अटीवर सोडवीन. मी इच्छा करेन त्याच वेळी मरेन. मला इच्छामरणी करशील तर सोडवेन.’’ यमराजही म्हणाले, ‘‘तथास्तु!’’

त्यामुळे ती म्हातारी अजून जिवंत आहे आणि ती कधी मरणार नाही. तिचे नाव आहे- ‘भारतीय लोकशाही!’

भारतीय लोकशाहीचे चित्र आजही बदलले नाही. ते तसेच आहे.

हे का घडले?

महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे पेंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. आमदारांना पह्डले व खासदारही पह्डले. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. त्याचा बदला शेवटी शिवसेना पह्डून घेतला गेला. तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील. सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर पेंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्या आहेत. त्याच वेळी ज्यांच्यावर पेंद्रीय यंत्रणांचे खटले होते अशा शिवसेनेतील फुटीर आमदार-खासदारांना सर्व जाचांतून मुक्त केले. आता त्यांना शांत झोप लागेल. ईडी, सीबीआय त्यांच्या दारात जाणार नाही. समान न्यायाचे तत्त्व किती चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे ते स्पष्ट दिसते. भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक आहे. हे चित्र काय सांगते?

शिवसेनेचे 12 खासदार वेगळे झाले व त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. मूळ शिवसेनेतून ते सरळ बाहेर पडले. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा त्यांनाही लागू होतो. शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते विनायक राऊत यांनी फुटिरांबाबत दिलेल्या पत्राची साधी दखलही न घेता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फुटीर गटास मान्यता देऊन टाकली व कायदेशीररीत्या अडचणीत न येता कसे फुटावे याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. इतिहासात या घटनेची नोंद होईल. विधानसभा व लोकसभा ही लोकशाहीची बलस्थाने आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी नवे सरकार स्थापन होताच घटनेची पायमल्ली केली. लोकसभेतही त्यापेक्षा वेगळे चित्र दिसले नाही. मंदिराची दानपेटी पुजाऱयाने लुटावी, देवळावरचे कळस मंदिराच्या विश्वस्तांनीच कापून न्यावे असाच प्रकार देशातील लोकशाहीच्या सर्व मंदिरांत सुरू आहे. तरीही लोक श्रद्धेने मंदिरात जातात व मूर्तींपुढे नाक घासतात.

राष्ट्रपती काय करणार?

हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत देशाला नवा राष्ट्रपती लाभलेला असेल. ओडिशाच्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून विराजमान होतील. श्रीमती मुर्मू यांना स्वतःचे काही मत पिंवा भूमिका आहे काय? त्यांना जाहीरपणे बोलताना अद्याप कुणी पाहिले नाही. देशातल्या सद्यस्थितीवर मावळते राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी कधी भाष्य केले नाही. द्रौपदी मुर्मू तरी काही बोलतील काय? न बोलणारे, कृती न करणारे व डोळे मिटून सर्वकाही सहन करणाऱयांसमोर भारतीय लोकशाही विवशतेने उभी आहे. ती जिवंत आहे इतकेच. दूध, दही, कडधान्ये, स्टेशनरी अशा सगळय़ांवर सरकारने ‘जीएसटी’ लादला. हे काँग्रेसच्या काळात घडले असते तर भारतीय लोकशाही उसळून रस्त्यावर उतरली असती. आज ती म्हातारीच्या आंब्याच्या झाडाला चिकटून लटकली आहे. ‘‘मला सोडवा, मला वाचवा’’ असा तिचा आक्रोश सुरू आहे.

लोकशाही जिवंत आहे, पण ती मुर्दाड बनली आहे.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]