रोखठोक – रशियापासून तुटलेला सुंदर उझबेकिस्तान, हिंदुस्थानवर प्रेम करणारा ‘बाबरा’चा देश!

8328

rokhthokरशियाच्या जोखडातून जे देश बाहेर पडले त्यातला एक उझबेकिस्तान. ताश्कंद ही त्याची राजधानी. लाल बहादूर शास्त्रींचे स्मारक या देशाने आजही जतन केले आहे. आक्रमक बाबर येथूनच आला. पण आज हा देश धर्माने ‘इस्लामी’ असूनही कमालीचा शांत व निधर्मी बनला आहे.

सोव्हिएत रशिया या बलाढ्य देशाचे अनेक तुकडे झाले. त्यातील एक महत्त्वाचा तुकडा उझबेकिस्तान. रशियाच्या सर्व खुणा पुसणाऱ्या उझबेकिस्तानला मी पोहोचलो. उझबेक एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीहून ताश्कंदला तीन तासांत उतरलो. विमानातून बर्फाने चकाकणारे डोंगर, घरांच्या छपरावरील बर्फ, त्यावर चकाकणारी सूर्यकिरणे. ‘उणे सात’ इतकी थंडी दुपारी तीन वाजता होती. रात्री हा पारा आणखी खाली जाईल असे विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या मंडळींनी सांगितले. उझबेकिस्तानची राजधानी म्हणून ‘ताश्कंद’ नव्या पिढीस माहिती असण्याचे कारण नाही. पण हिंदुस्थान-पाक संबंधात ताश्कंद शहराचे महत्त्व मोठे. 1966 साली ‘ताश्कंद करारा’च्या निमित्ताने आपले त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री येथे प्रथम आले. 1965 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अयुब खान यांच्याशी बैठका झाल्या व त्याच रात्री ताश्कंदच्या शासकीय गेस्ट हाऊसवर शास्त्रींचे हृदयविकाराने निधन झाले. शास्त्रींच्या स्मृती आजही ताश्कंद शहराने जतन करून ठेवल्या आहेत. ताश्कंदला शास्त्रींच्या नावाने रस्ता आहे. मधल्या चौकात शास्त्रींचा पुतळा आहे. 1991 पर्यंत उझबेकिस्तान हा सोव्हिएत रशियाचा भाग होता. पुढे रशियाचे विघटन झाल्यावर उझबेकिस्तान स्वतंत्र राष्ट्र झाले. त्यानंतर ताश्कंदमधील लेनिनचे पुतळे पाडले गेले. सोव्हिएत रशियाच्या राजवटीतील सर्व खुणा नष्ट केल्या गेल्या. ‘‘त्यांना शास्त्रींच्या खुणा, पुतळाही तोडता आला असता, पण त्यांनी तसे केले नाही. शास्त्री ताश्कंदच्या मध्यवर्ती भागात विजयी इतिहासाचा झेंडा घेऊन आजही विराजमान आहेत,’’ असे गाईडने स्पष्ट केले. ‘हे असे का?’ हा माझा त्यावर प्रश्न. ‘‘उझबेकिस्तानच्या संस्कृतीची, नात्याची मुळे हिंदुस्थानशी आजही टिकून आहेत. त्यांना हिंदुस्थानविषयी प्रेम आहे,’’ असे त्यांनी सांगितले व हे प्रेम व आदर पुढील सात दिवसांत जागोजागी दिसले.

lal-bahadur-shashtri-tashka

नयनरम्य देश
उझबेकिस्तान हा एक नयनरम्य देश आहे. प्राचीन इतिहास, सुंदर वास्तुकला, विविध संस्कृतीने बहरलेला हा देश चारही बाजूने Land Lock म्हणजे इतर देशांनी घेरलेला आहे. कझाकिस्तान, ताजिकिस्तान, किरगिस्तान, अफगाणिस्तान आणि तुर्कमिनिस्तान असे देश चारही बाजूने घेरल्यासारखे उझबेकिस्तानच्या भोवती उभे आहेत. हे सर्व देश ‘इस्लामी.’ त्यात मधोमध 99 टक्के मुसलमान लोकसंख्या असलेला ‘उझबेक’ मुसलमान असूनही सर्वधर्म समभावाचा झेंडा घेऊन उभे राहण्याची धडपड करीत आहे. मुसलमान असल्याची खूण ताश्कंदला कोठेच दिसत नाही.

सुंदर पुरुष व सुंदर स्त्रिया. त्यांच्या वागण्यात, कपडय़ात मुसलमान असल्याची झाक कोठेच नाही. आधुनिकतेचा पेहराव व मनात निर्मळता. ती त्या सगळय़ांच्या हसऱ्या चेहऱ्यावर दिसते. देशात श्रीमंती नसूनही प्रत्येकाच्या चेहऱयावर स्मित आहे. आपल्याकडे मोठा भांडवलदारही ‘ओझे’ खांद्यावर व जगाचे दुःख चेहऱ्यावर घेऊन वावरतो. त्या ढोंगाची छटा येथे नाही. ‘सोम’ हे त्यांचे चलन डॉलर्स आणि रुपयांच्या तुलनेत लुडकलेले आहे. 1 रुपयासाठी 130 ‘सोम’ हा भाव बरेच सांगून जातो. त्यामुळे एका कॉफीच्या कपासाठी 12,000 सोम मोजावे लागतात व हॉटेलात खाण्यासाठी दोन-अडीच लाख ‘सोम’ मोजावे लागतात. एक हजार डॉलर्स सुट्टे करायला जायचे म्हणजे थैली घेऊन जावे लागते. पण लोकांना कष्ट करायचे आहेत व देश नव्याने उभा करायचा आहे. सोव्हिएत संघाच्या पकडीतून ते बाहेर पडले. फॅसिझमच्या गुदमरल्या वातावरणातून बाहेर पडले. सोव्हिएत संघाचा ‘नास्तिक’पणा त्यांनी ठोकरून लावला.

देश धर्माने मुसलमान, पण कर्माने ‘सेक्युलर.’ आधुनिकतेची व ज्ञानाची कास धरणारी नवी पिढी त्यांना घडवायची आहे. ताश्कंदला मशिदी व मदरसे नाहीत. आधुनिक इंग्रजी शाळा आहेत. तेथे आधुनिक पेहरावातली मुले शिकताना मी पाहिली. जगातल्या उत्तम शिक्षण संस्था, विद्यापीठे आता ताश्कंदला अवतरली आहेत. नवे राष्ट्रपती शौकत मिर्जियोयेव यांनी ‘उझबेक’चे दरवाजे सगळय़ांसाठी उघडले व त्यातून जग उझबेकिस्तानच्या आत शिरत आहे. आधुनिक देश असेच उभे राहतात.

इस्लाम, पण निधर्मी!
उझबेकिस्तानवर ‘इस्लाम’चा पगडा आहे. पण हा देश म्हणजे पाकिस्तान, इराण किंवा इराक नाही. 13 व्या शतकात चंगेजखान आणि 16 व्या शतकापर्यंत तैमुरलंगने येथे राज्य केले. ज्या ‘बाबरा’वरून अयोध्येत मंदिर आणि मशिदीचा वाद पेटला व देशाचे राजकारणच बदलले तो बाबर हा तैमुरलंगचा खापर पणतू. बाबर हा याच उझबेकिस्तानातून आपल्याकडे आला. तैमुरलंग आणि बाबराच्या नावाने भव्य बगिचे, म्युझियम्स ताश्कंद तसेच समरकंद येथे उभी आहेत. मी ताश्कंदला असताना बाबराची जयंती होती व आपल्याकडे जयंतीनिमित्त वृत्तपत्रांत राष्ट्रपुरुषांचे फोटो छापून श्रद्धांजली वाहण्यात येते तसे बाबराचे फोटो बहुतेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर होते. शाळांतून व सरकारी कचेऱ्यांतून बाबराचा जन्मदिवस त्या दिवशी साजरा झाला. आपल्याकडे ऐतिहासिक नाटय़छटा सादर केल्या जातात तसे नाटय़ अनेक ठिकाणी मुलांनी साजरे केले व त्यात ‘बाबर’ हे पात्र सादर केले. ‘बाबरनामा’ची काही पाने वाचून दाखवली. ताश्कंदच्या प्लॅनेट म्युझियमच्या बाहेर संध्याकाळी एक वृद्ध जोडपे भेटले. ‘‘आपण हिंदुस्थानी का?’’ असे त्याने विचारले. ‘‘बाबराच्या नातवाने आग्य्राचा ताजमहाल उभा केला व तो महाल आज जगाची शान आहे. हे तुम्हाला माहीत आहे काय?’’ असा प्रश्न टाकून तो निघून गेला. तैमुरलंग, बाबराच्या नावाने जी म्युझियम्स तेथे आहेत त्यात बाबर साम्राज्याचा भाग म्हणून ‘ताजमहाल’ची भव्य प्रतिकृती उभी आहे. बाबर त्यांचा योद्धा व राजा असला तरी हिंदुस्थान, हिंदूंविषयी त्यांच्या मनात राग नाही. हे सांगायचे यासाठीच की, बाबर हा आक्रमक होताच, पण त्याला त्याच्या देशात कोणी विचारीत नाही हा आपल्याकडील प्रचार खोटा आहे. हे उझबेकिस्तानला गेल्यावर समजले. उझबेकमधून लेनिनचे पुतळे पाडले. रशियाच्या खुणा नष्ट केल्या गेल्या. पण तेथे बाबर आहे व त्याच बरोबरीने राज कपूर जिवंत आहे. हिंदी सिनेमासाठी एक स्वतंत्र चॅनल चोवीस तास सुरू आहे. त्याचा परिणाम असा की, येथील लोक हिंदुस्थानी पर्यटकांशी मोडक्या हिंदीत संवाद साधतात. हिंदुस्थानी दिसला की ‘नमस्ते’ म्हणतात. कैसे हो विचारतात. यात एक आपुलकीचा ओलावा आहे. आम्ही जग पालथे घालतो, ज्यांना हिंदुस्थानविषयी प्रेम नाही अशा देशात जातो. पण बाजूच्या उझबेकिस्तानात हिंदुस्थानविषयी प्रेमाचा झरा अखंड वाहतोय त्याविषयी आपण अंधारात आहोत.

आधुनिकतेचा साज
उझबेकिस्तानच्या मुसलमानांकडून आपल्या देशातील मुसलमानांनी शिकावे असे बरेच काही आहे. 90 टक्के मुसलमान आहेत, पण बुरखा, दाढी, मुसलमानी शेरवाण्या, लुंग्या येथे नाहीत. हे लोक मुसलमान असूनही स्वतंत्र विचारांचे. तितकेच धर्मनिरपेक्ष आहेत. येथे लोकसंख्या कमी, पण मुसलमानांची लोकसंख्या वाढावी म्हणून पोरांची लटांबरे नाहीत. इतर धर्मीयांशी त्यांचे वैर नाही. इस्लामी कट्टरतावाद हा राष्ट्राचा आणि विकासाचा शत्रू आहे, असे सध्याचे राष्ट्रपती शौकत मिर्जियोयेव सांगतात. शौकत 2016 मध्ये सत्तेवर आले. त्यांनी सगळय़ांसाठीच धार्मिक स्वातंत्र्याचा पुकारा केला. उझबेक जेव्हा सोव्हिएत संघाचा भाग होता तेव्हा साम्यवादाबरोबर येणारा ‘नास्तिक’तेचा विचार येथे होता. साम्यवादाबरोबर ज्ञानाचे दरवाजेही बंद झाले व अचानक येथे तालिबान व अल कायदाच्या छत्र्या उगवल्या. नव्या सरकारने त्या मुळापासून उखडल्या. अज्ञानातून धर्मांधता, कट्टरतेचा जन्म होतो. आम्ही आमच्या लोकांना ‘ज्ञानाचे इस्लाम’ शिकवायचा प्रयत्न करू, हे राष्ट्रपती शौकत मिर्जियोयेवचे चार दिवसांपूर्वीचे भाषण आहे. एखाद्या देशाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल आणि झेपावयाचे असेल तर आधी धर्माचा त्याग करावा लागतो व जनतेच्या मनातली कट्टरता नष्ट करावी लागते. उझबेकिस्तान सध्या तेच करीत आहे.

कबुतराचे पंख
मुसलमान बहुसंख्य असलेल्या देशात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त हा समज ताश्कंदला खोटा ठरतो. उझबेकिस्तानला खून, चोऱया, फसवणूक अशा गुन्हय़ांचे प्रमाण ‘नाही’च्या बरोबर. पोलीस सहसा रस्त्यावर दिसत नाहीत. पोलीस चुकून दिसलेच तर लोकांना मदत करण्यासाठी. समरकंदसारख्या भागात ‘टुरिस्ट पोलीस’ दिसतात ते पर्यटकांना मदत करण्यासाठी. मोठे सैन्य नाही, पोलीस नाही, अशा धाटणीचा हा देश. कापूस आणि फळांचे उत्पादन येथे होते. युरेनियमच्या उत्पादनात त्यांनी प्रगती केली. अर्थात नवे कारखाने आणि उद्योग मात्र तेथे निर्माण झाले नाहीत. मोकळय़ा जमिनीचे काय करायचे हा प्रश्न तेथील लोकांना पडला आहे. मुंबई – गुडगाव शहरात आहेत तसे ‘बिल्डर’ तेथे अद्याप निर्माण झाले नाहीत. ताश्कंदसारख्या शहरात ‘नाईट क्लब’ जोरात आहेत. तरुणांना त्यात रमावेसे वाटते. स्वातंत्र्याचा उपभोग नवी पिढी जरा जास्तच घेत आहे. उझबेकिस्तान झेपावत आहे, पण कबुतराच्या पंखाने. समाधान इतकेच की, कबुतरे म्हणजे शांततेचे प्रतीक. त्याच शांततेत उझबेकिस्तानचा प्रवास आणि जगणे सुरू आहे. मुसलमानी राष्ट्राची उग्रता, आक्रमकता नसलेल्या या देशाने प्रगतीत झेप घ्यायला हवी. त्यांच्या पंखांना बळ कोण देणार?

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या