आजचे रोखठोक – कोरोनाची आनंदयात्रा, उमर खय्याम आज हवा होता!

4868

rokhthokउमर खय्याम आज असता तर त्याने स्वत:ला धन्य धन्य मानले असते. दारू दुकानांसमोरच्या गर्दीने सर्व विक्रम मोडले. चाळीस दिवसांनंतर तहानलेले जीव इतक्या संख्येने बाहेर पडले. पण ‘लॉक डाऊन’मधल्या या आनंदयात्रेलाही शेवटी दृष्टच लागली. लोकांनी दारू किती प्यावी? कोलमडलेली अर्थव्यवस्था फक्त पिणाऱ्यांमुळेच ताठ उभी राहील, हा विचारही त्यातूनच उभा राहिला.

मुंबईच्या रस्त्यांवर सोमवारी आणि मंगळवारी मला प्रथमच गर्दी दिसली. ही गर्दी फुटपाथवरून रस्त्यांवर पसरली होती. ‘लॉक डाऊन’ तर उठले नाही मग गर्दी कसली? वाईन शॉप म्हणजे दारूची दुकाने उघडण्याची परवानगी सरकारने दिली. लोक आनंदाने, शिस्तीत बाहेर पडल्याचे हे चित्र होते. आधीची शिस्त नंतर बिघडली आणि वाईन शॉप पुन्हा बंद केले गेले. संपूर्ण राज्यात हेच चित्र असल्याचे नंतर समजले. लॉक डाऊनच्या अंतसमयी ही जणू दिवाळीच होती. ”वाईन शॉपच्या समोरची गर्दी पाहून असं वाटत होतं की, हिंदुस्थानची अर्थव्यवस्था पुढल्या चोवीस तासांतच सुरळीत होईल,” असा विश्वास माझ्या एका सहकाऱ्याने व्यक्त केला. ‘कोरोना’मुळे जे संकट कोसळले ते अन्न-पाणी-निवारा, रोजगाराचे नसून खरे संकट हे ‘मद्यपीं’वरच कोसळले आहे. मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेले. हे अनेकांना दु:खद वाटले नाही कारण पोटात व घशात गेल्या 50 दिवसांपासून दारूचा थेंब गेला नाही हे दु:ख सगळ्यात मोठे. अखेर लोकाग्रहास्तव सरकारला झुकावे लागले व निदान ‘वाईन’ शॉप नावाचा प्रकार तरी सर्वत्र सुरू करण्यात आला, हा आनंद काय वर्णावा? सोशल डिस्टन्सिंग वगैरे शिस्त सांभाळून ‘पिणारे’ वाईन शॉपच्या रांगेत उभे आहेत त्यांचे काही किस्से प्रसिद्ध झाले आहेत. बेळगावातील एका वाईन शॉपसमोर प्रचंड रांग लागली. त्यातील पहिल्या ग्राहकाला ‘हार’ वगैरे घालून सत्कार केला असे वृत्त प्रसिद्ध झाले. मराठवाड्यातील एका अट्टल ग्राहकाने मुलाखत देताना सांगितले, ”हा आनंदाचा क्षण आहे. आज मी चार किलो मटण व पंचवीस बाटल्या विकत घेऊनच घरी जाऊन झोपणार आहे.” त्यामुळे कोरोनाचे संकट विसरण्यासाठी ‘उतारा’ म्हणून दारूकडे बोट दाखवायचे काय?

crowed-liquor

महसूल बुडाला

दिल्लीत केजरीवाल सरकारने दारूची दुकाने उघडायला लावली व दारूवर 70 टक्के जादा कोरोना टॅक्स लावला. त्यामुळे दिल्ली सरकार किती शहाणे पहा; केजरीवाल हेच उत्तम मुख्यमंत्री, ते अशाप्रकारे आर्थिक तूट भरून काढत आहेत असे ‘वाइन’ शॉपच्या रांगेतील शहाणे बोलू लागले. ‘लॉक डाऊन’मुळे महाराष्ट्राचे जे आर्थिक नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी दारू दुकाने उघडा असे श्री. राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांना स्पष्टपणे सांगावे लागले. या सर्व काळात दारुबंदीचा पुरस्कार फार कोणी केला नाही. उमर खय्याम या जमान्यात जिवंत असता तर तोसुद्धा मद्यप्रेमींची तडफड बघून खूष झाला असता. ‘वाईन शॉप म्हणजे मदिरालय सुरू करा एकदाचे’, हे सांगणारे यावेळी सगळ्याच स्तरांतील लोक होते. ‘आपण निधन पावल्यावर आपल्या देहाला मद्याने आंघोळ घालून एखाद्या अंगुरी बागेत पुरावे आणि तर्पणार्थ मदिरेचाच एक पेला उलटा करण्यात यावा’, अशी इच्छा उमर खय्यामने प्रकट केली होती. त्यामागचे इंगीत ‘लॉक डाऊन’ काळात स्पष्ट झाले.

लोकांची हौस कशी ती पहा, ”उद्या दारूच्या दुकानातून घरी आल्यावर त्याला ओवाळा. त्याच्यावर पुष्पवृष्टी करा. कारण तो अर्थव्यवस्था मजबूत करतो आहे,” असा नवा मंत्र सोशल माध्यमांवर कोणीतरी मांडला आहे तर दुसरा म्हणतोय, ”अहो पोलीस मामा, मारता कशाला? आम्ही अर्थव्यवस्थेच्या आधाराचे ‘खंबे’ आहोत ‘खंबे’! काय समजलात?” शेवटी सांगायचे ते इतकेच की, एका बाजूला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हातचे गेले म्हणून दु:ख आहेच, पण राज्याचा व देशाचा आर्थिक आधार भक्कम करण्यासाठी सरकारला दारूची दुकाने उघडावी लागली. तेसुद्धा खास लोकाग्रहास्तव! या आनंदात ते दु:ख जणू वाहून गेले.

पुण्यात अपेक्षाभंग

पुण्यात दारूची दुकाने सुरू नसल्याने लोकांचा अपेक्षाभंग झाला. लोक सकाळपासून रांगा लावून उभे राहिले, पण दुकानांचे ‘शटर’ काही वर गेले नाही. नाशिकमध्ये दारू दुकानांसमोर प्रचंड गर्दी उसळली व तेथे पोलिसांना लाठीमार करावा लागला. मद्यपींच्या जीवनातला जणू ‘पाडवा’च उगवला असे उत्साही वातावरण ‘लॉक डाऊन’नंतर प्रथमच दिसले. मद्यप्रेमींच्या उत्साहास आवर घालण्यासाठी पोलिसांची जादा कुमक बोलवावी लागली. नाशिकमध्ये अंगुराच्या म्हणजे द्राक्षाच्या बागा अवकाळी पडझडीत नष्ट झाल्या, पण अंगूरच्या ‘बेटी’च्या स्वागतासाठी जणू जनताच रस्त्यावर उतरली. ‘रमजान’च्या काळात मुसलमान गर्दी करतात व कोरोना पसरतो असे जे बेताल, बेरस हिंदुत्ववादी सांगतात त्यांनी ‘स्वर्ग’ गाठण्यासाठी दारू दुकानांबाहेर जमणाऱ्या मद्यप्रेमींकडे एकदा कौतुकाने पाहायला हवे. हे बहुसंख्य हिंदूच आहेत. सुताने स्वर्गाला जाणाऱ्या देशात वेगळेच घडताना दिसले. सुताने नव्हे तर सुरेच्या सहाय्याने पृथ्वीवर स्वर्ग आणणारा देश म्हणून हिंदुस्थान आता कोरोनाच्या काळात लौकिक पावला. दारूची दुकाने उघडत असल्याची नुसती बातमी येताच जी आनंदाची लाट उसळली ती पाहून स्वर्गात गांधी, विनोबा भावे यांच्यासारखे महात्मेही स्वत:ला गुन्हेगार मानू लागले असतील. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारात जणू अनेक भक्त याकाळात एकच प्रार्थना करीत असावेत, ”कोरोनाचे काय ते नंतर पाहू. आधी

‘वाईन शॉप’ उघडा हो!”
फरिश्ते खुल्द में पुछेंगे पाक बाजों से।
शराब क्यों न पिये?
क्या खुदा गफुर न था?।।

अरे, पाकबाज सोवळ्या मंडळींनो, तुमची स्वर्गात मोठी पंचाईत होईल. कारण तेथे देवदूत तुम्हाला विचारतील, ”आयुष्यभरात एकदाही मदिरापानाचा गुन्हा का केला नाही? काय, ईश्वराच्या क्षमाशीलतेवर तुमचा विश्वास नाही?”

मिर्जा गालिब तर म्हणाला होता, ”मशिदीच्या कमानीजवळच मदिरालय पाहिजे!”

उर्दू काव्याचा कुलगुरू मीर तर स्वत:च कबुली देतो की,

आखिर उमर में मय के
खातिर ‘मीर’।
सज्जादा गिरवी रखने
निकाला हमने।।

याचा अर्थ, ‘आयुष्याच्या अखेर-अखेरीस मद्यप्राप्तीसाठी नमाज पढण्याचे आसनही आम्ही गहाण ठेवण्यास काढले!’
रियाझ खैराबादी नामक शायराने तर मदिरेचे पावित्र्य वर्णन करताना एक आश्चर्यकारक अनुभव कथन केला आहे. तो म्हणतो –

राहसे काबे के हमने
रेजये – मीना चुने।
क्या अजब इसके सबब
हमको मिले हजका सबाब?

दोस्त हो, काब्याला जाणाऱया मार्गावर पडलेले मद्यपात्रांचे नुसते तुकडे आम्ही वेचले. केवळ एवढ्या कृत्यामुळेही आम्हास हजच्या यात्रेचे पुण्य मिळाले तर त्यात आश्चर्य कसले?
जगभरातील शायरांनी, लेखकांनी वेळोवेळी असा ‘मद्य महिमा’ वर्णन केला आहे. मदिरा ही पवित्र आहे, स्वर्गातल्या पऱयांच्या ओढण्यांतून गाळली असल्यामुळे ती शुद्ध आहे, अशी ग्वाही अनेकांनी दिली आहे. थोडक्यात, समाजातील मोठ्या वर्गासाठी ‘मद्य’ हेच अध्यात्म आहे आणि कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेचा सध्या तोच एकमेव कणा आहे. ‘लॉक डाऊन’ काळातही हा ‘कणा’ मोडला नाही. काय हे आश्चर्य? हरिवंशराय बच्चन यांनी संपूर्ण ‘मधुशाला’ निर्माण केली. मद्याच्या एका थेंबासही स्पर्श न करता अशीही नशा. ते सांगतात,

यज्ञ-अग्नि-सी धधक रही है।
मधु की भट्टी की ज्वाला,
ऋषी-सा ध्यान लगा बैठा है
हर मदिरा पीने वाला

ते खरेच आहे, पंचेचाळीस दिवसांच्या तपस्येनंतर मदिरालये उघडी झाली होती. कोरोनाच्या संकटातही लोकांनी आनंद साजरा केला. बाकी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी, महागाई वाढली, इस्पितळात खाटा कमी पडल्या. भविष्याची चिंता सतावत आहे. त्याचे काय घेऊन बसलात? या दु:खावर एकच औषध, ‘मदिरा.’ खरंच उमर खय्याम आज जिवंत हवा होता. त्याने निर्माण केलेले मदिरेचे विश्व, नवा स्वर्ग, आनंद प्रत्यक्ष साकार होताना पाहात तो पुन्हा पुन: स्वर्गात गेला असता. जे मदिरेवर ‘टीका करतात’ त्यांना उमर खय्यामनेच विचारले आहे, ”हाय कंबख्त! तूने पी ही नहीं!” तुम्हाला काय मदिरेची लज्जत कळणार? तुम्ही कधी प्यायलाच नाहीत!

पी लिया करते है
जीने की तमन्ना में कभी
डगमगाना भी जरूरी है
संभलने के लिए…

तेव्हा कायद्याच्या रक्षकांनो उमर खय्याम, गालिब, मीर, अमीर खुसरोच्या ‘भक्तां’नाही जगू द्या. त्यांचे जगणेच कोरोनाचे दु:ख इतरांना विसरायला लावेल. ऋषी कपूर हा एक आनंदयात्री होता. मद्याचा ग्लास हे त्याचे जीवन होते. ऋषी कपूरने आनंदाने स्वर्गलोकी प्रयाण केले. हातात मद्याचा भरलेला प्याला असलेली त्याची अनेक छायाचित्रे मृत्यूनंतर प्रसिद्ध झाली आहेत. ऋषी कपूर जणू या सर्व ‘एकच प्याला’प्रेमींचा ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर ठरावा. मंगळवारीही मी पाहिले की, दारूच्या दुकानांबाहेरील रांग संपत नव्हती. भक्त फक्त मोदींचेच नसतात, ते उमर खय्यामचेही आहेत. उमर खय्यामच्या एखाद्या महान भक्तासही अर्थशास्त्रातला नाही तर सांस्कृतिक कार्यातला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा. ‘पद्म’ पुरस्कार एक-दोन रांगेतल्या भक्तांना गेले तर बिघडले कोठे?

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या