रोखठोक – सगळेच आनंद दिघे नसतात! काही शिंदे असतात!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात… दिघे नक्की कोण होते? त्यावर प्रकाशझोत टाकणारे खळबळजनक रोखठोक.

सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली!

चुकीचे दिघे

एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली. बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते अशी थाप हे लोक मारत आहेत. मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत असत. या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते. ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते. त्यावेळी व नंतरही दिघे यांचे प्रभाव क्षेत्र ठाणे जिल्ह्याच्या बाहेर नव्हते, पण आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ राज्यात तेव्हा अनेकांना पडली होती. त्याग, निःस्वार्थी भावना व शिवसेनेवरील अढळ श्रद्धा ही त्यांची राज्यात ओळख होती. त्यांच्या टेंभी नाक्यावरील कार्यपद्धतीवर अनेकदा छापून आले, पण दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय ती चुकीची आहे. अनेक वर्षे ठाण्यातील राजकारण हे आनंद दिघे व वसंत डावखरे या जोडगोळीच्या युतीने केले. दोघांचे संगनमत व मैत्री होती. डावखरे काँग्रेसचे व नंतर राष्ट्रवादीचे झाले. भारतीय जनता पक्षाला ठाण्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिघे व डावखरे कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून सूत्रे हलवीत. आता दिघे किती भाजपप्रेमी होते त्याचा एक प्रसंग सांगतात. कदाचित शिंदे व त्यांच्या 40 आमदारांना तो माहीत नसावा. 1992 साली अयोध्येत बाबरी पडली. भाजपने जबाबदारी झटकली. बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे, असे जाहीरपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समस्त देशाचे हिंदुहृदयसम्राट बनले. देशात हिंदुत्वाची तुफान लाट त्यातून आली व शिवसेनाप्रमुख त्या लाटेचे नेतृत्व करू लागले. उत्तर प्रदेशात कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त केल्याने कल्याण सिंगांच्या कपाळावर हौतात्म्याचा टिळा लागला होता. तेव्हा ठाणे हा कल्याण-डोंबिवलीसह एकच लोकसभा मतदारसंघ होता व भाजपचे राम कापसे हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्याआधी कापसे हे कल्याण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत असत. तर या कापसे यांनी बाबरी पाडल्याचा आनंद म्हणून ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भाजपची सभा लावली व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांना सभेस बोलावून त्यांचा वीरोचित सत्कार करण्याचे ठरवले. ही सभा म्हणजे ठाण्यातील शिवसेनेस अप्रत्यक्ष आव्हान देण्याचा पहिला प्रयोग होता. आनंद दिघे यांना हे पटले नाही. त्यांनी सभेत मोडता घातला नाही, पण संध्याकाळी ते सभेच्या ठिकाणी दूर एका बाजूला गाडीत बसून सभा ऐकायला गेले. त्यांचे खास लोक गाडीत बसले होते. सभा सुरू होताच खासदार राम कापसे भाषणास उभे राहिले. भाषणात त्यांनी कल्याण सिंग यांचा उल्लेख देशाचे एकमेव हिंदुहृदयसम्राट असा करताच दिघे अस्वस्थ झाले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला. ‘‘अरे, कापसे हे काय बोलताहेत? हिंदुहृदयसम्राट तर फक्त आपले बाळासाहेब ठाकरे आहेत. भाजप नवे हिंदुहृदयसम्राट का निर्माण करतोय? हे शिवसेनेला आव्हान आहे. ठाण्यात तरी मी चालू देणार नाही. मी आता सांगतो, इकडची दुनिया तिकडे होईल, पण कापसे पुन्हा ठाण्याचे खासदार नसतील. ठाण्याचा खासदार फक्त शिवसेनेचाच असेल!’’ आनंद दिघे त्या गाडीतच जाहीर करून बसले. ही खदखद त्यांनी मनातच ठेवली, पण लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच जागा वाटपात ठाण्याचा विषय येताच दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा सांगितला. ठाण्यात भाजप चालणार नाही. दिघे बाळासाहेबांना भेटले व त्यांनी आग्रह केला. ‘‘राम कापसे व भाजप ठाण्यात चालणार नाहीत. शिवसेनाप्रेमी जनता त्यांचा पराभव करेल. ठाण्याचा खासदार शिवसेनेचाच होईल.’’ शिवसेनाप्रमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी दिघे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दिघे ठाम होते. अखेर त्यांच्या हट्टापुढे सगळय़ांना मागे हटावे लागले. कापसे यांना मागे ठेवून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आला व महापौर निवडणुकीत पराभूत झालेले प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले. भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनाद्वेषाला आव्हान देणाऱया दिघ्यांचे हे खरे रूप होते, पण शिंदेनिर्मित चित्रपटात ते कोठेच दिसले नाही!

विचारे काय म्हणतात?

शिंदे हे दिघे यांच्या नेमके किती जवळ होते, हे राजन विचारेच सांगू शकतील. दिघे यांच्या अपघाती मृत्यूचा शिंदे यांनी फायदा करून घेतला. मो. दा. जोशी हे शिवसेनेचे ठाण्यातील पहिले आमदार होते. अर्थात जोशी हे शिवसेनाप्रमुखांचे ठाण्यातील निकटवर्तीय आणि आनंद दिघे यांचे राजकीय गुरू. मो. दा. जोशी दिघ्यांना ‘अरे-तुरे’ असे प्रेमाने एकेरीत म्हणत. ते ठाणे जिल्हाप्रमुखसुद्धा होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर समीकरण बदलले. मो. दां.च्या जागी राजन विचारे ठाण्याचे आमदार झाले. पुढे विचारे खासदार झाले. तेव्हा त्या जागी शिवसेनेचे ठाणे शहरप्रमुख नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचे उद्धव ठाकरे यांनी ठरवले. त्यास शिंदे यांनी कडाडून विरोध केला व काँग्रेसमधून आयत्या वेळी आलेल्या रवी फाटक यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. फाटक हे स्थानिक नव्हते, पण वागळे इस्टेट भागात स्वतःस त्रास होऊ नये म्हणून म्हस्के यांच्या जागी काँग्रेसचे फाटक लादले. ही जागा तेव्हा शिवसेनेने गमावली ती शिंदे यांच्यामुळेच. हे फाटक राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले होते व ठाण्यातील शिवसैनिकांची डोकी त्यांनी फोडली होती. हा प्रसंग बोलका आहे. प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आनंद परांजपे खासदार झाले. आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडावी असे अंतर्गत वातावरण शिंदे यांनी तयार केले. कल्याण-डोंबिवलीच्या मतदारसंघातून जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना उमेदवारी द्यावी असे उद्धव ठाकरे यांनी नक्की केले, पण शिंदे यांनी लांडगे यांना विरोध केला व राजकारणात, शिवसेनेत नसलेले आपले डॉक्टर चिरंजीव श्रीकांत यांना उमेदवारी देण्यास भाग पाडले. शिवसैनिक गोपाळ लांडगे यांच्यासाठी आग्रह करीत होते. आताही ठाणे-पालघर-डोंबिवलीमधील जे शिवसैनिक शिंदेंबरोबर जायला तयार नाहीत त्यांचे घर, व्यवसाय, उद्योगांवर बुलडोझर फिरवून दहशत निर्माण केली जात आहे. हा दिघे यांचा वारसा म्हणता येईल काय? दिघे यांनी सच्च्या शिवसैनिकावर आपल्या राजकीय स्वार्थासाठी अन्याय केल्याचे उदाहरण दिसत नाही.

काँग्रेसची मदत

काँग्रेस-राष्ट्रवादीवर श्री. शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते व तेव्हाही त्यांच्या मनात वेगळे विचार होते. सौदेबाजी फिसकटली इतकेच, असे पुराव्यासह सांगणारे अनेक लोक आजही त्यांच्या अवतीभोवती आहेत. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही आता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे. ‘‘भाजप-शिवसेना ‘युती’चे सरकार असताना व फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता (2014). त्या शिष्टमंडळात स्वतः एकनाथ शिंदे होते’’, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते. त्याच काळात त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व 15 ते 20 आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत. शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर (एफआयआर) तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती. ‘ईडी’च्या भीतीने शिंदे हे भाजपमध्ये गेले. कारण ठाणे महानगरपालिका, समृद्धी महामार्ग, नगरविकास खाते या माध्यमांतून पैसाच पैसा. त्या पैशातून सत्ता. सत्तेतून पुन्हा पैसा, या दुष्टचक्रात ते पूर्ण अडकले. नाही तर शिंदे आदमी काम का था असे उघड बोलले जाते. मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असणे वेगळे व लालसा असणे वेगळे. शिंदे हे लालसेचे बळी ठरले. या चक्रात दिघे कधीच फसले नाहीत. सिगारेट हेच त्यांचे व्यसन आणि विरंगुळा. शिवसेना हाच त्यांचा संसार. दिघे यांच्या 21 व्या स्मृतिदिनी राजन विचारे यांचे एक विधान प्रसिद्ध झाले ते महत्त्वाचे. ते म्हणतात, ‘खोपकर प्रकरणात आनंद दिघे यांना टाडा लावण्यात आला. अडीच वर्षे त्यांनी तुरुंगात काढली, परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत. गद्दारांना क्षमा नाही या विधानापासून त्यांनी माघार घेतली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसेनेसाठीच झटत होते.’ दिघे यांनी पक्षात कोणतेच सत्तेचे पद घेतले नाही, पण संकट काळात ते पक्षाची ढाल बनून लढत राहिले. अशा दिघे यांचे नाव घेण्याचा अधिकार शिंदे व त्यांच्या लोकांना नाही! नवीन पिढीस गुमराह करून शिंदे स्वतःचीच फसवणूक करीत आहेत. आनंद दिघे यांना ‘टाडा’तून जामीन मिळावा यासाठी त्यांच्या काँग्रेसमधील चाहत्यांनी प्रयत्न केले. बाळासाहेब ठाकरे जेथे बोलायचे तेथे बोलत होते. एके दिवशी पहाटे 4 वाजता यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी ‘वर्षा’वर बैठक बोलावली. काही सूचना दिल्या व दिघे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. ‘वर्षा’वर तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार होते. तेही काँग्रेसचे! दिघे यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधी सार्वजनिक ठिकाणी, मोकळय़ा मैदानात व्हावेत व तेथेच त्यांचे स्मारक व्हावे यासाठी पुढाकार घेणारे प्रभाकर हेगडे हे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष होते. भाजप या काळात कुठेच नव्हता.

हास्यास्पद दावा

शिंदे आज शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा करतात. आनंद दिघे यांचा हा सगळय़ात मोठा अपमान आहे. शिंदे हे खरंच हिमतीचे असतील तर त्यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवावी. ‘‘तुम्ही फुटा. न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून हवे ते निकाल मिळवून देतो’’, या दिल्लीतील महाशक्तीच्या आश्वासनानंतरच शिंदे व त्यांचे 40 मिंधे यांनी फुटण्याचे धाडस दाखवले. शिंदे यांच्या बरोबर जे ‘आमदार’ आहेत त्यातले किती खरे शिवसैनिक आहेत? या बनावट लोकांच्या पाठिंब्यावर ते माझीच शिवसेना खरी असा दावा करतात हे हास्यास्पद आहे. अब्दुल सत्तार, उदय सामंत, सरनाईक, शहाजी पाटील, तानाजी सावंत, शिवाय ‘ईडी’ पीडित इतर आमदार यांना कोणी शिवसैनिक म्हणायला धजावेल काय? अशा बाजारबुणग्यांनीच इतिहास काळात मराठा साम्राज्य लयास नेले. हे बाजारबुणगेच मोगलांना फितूर झाले व त्यांनीच संभाजीराजांचा वध घडवून आणला. आनंद दिघ्यांच्या भोवती अशा बाजारबुणग्यांचे कोंडाळे कधीच दिसले नाही. कल्याण सिंगांना हिंदुहृदयसम्राट म्हटले हा बाळासाहेबांचा अपमान या चिडीतून दिघे यांनी संपूर्ण भाजपच अंगावर घेतला होता. शिंदे हे त्या दिघ्यांचे शिष्य शोभतील काय? आज ते शिवसेनेचा समांतर दसरा मेळावा घ्यायला निघालेत. चार हजार एसटी गाडय़ा गर्दी जमवण्यासाठी भाडय़ाने घेणार आहेत. पुन्हा इतर खर्च वेगळाच. कुठून येते ही आर्थिक ताकद? आनंद दिघे यांना हे उपद्व्याप कधीच करावे लागले नाहीत. त्यांना मोह नव्हता. त्यांची शिवसेना निष्ठा हे ढोंग नव्हते. ते खरेच मनाने व कर्तृत्वाने महान होते. दिघे धार्मिक होते… अघोरी नव्हते. दिघे वायफळ बोलत नव्हते. माणसे विकत घेऊन राजकारण करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. दिघे कुणी तत्त्वज्ञ नव्हते. गरीब, अन्यायग्रस्तांना मदत करणारा ते मसिहा होते. आनंद दिघे यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्हय़ाची जबाबदारी होती, पण त्यांच्या त्यागाची व निष्ठेची कवने संपूर्ण राज्यात गायली जात होती. दिघे माणसांना ‘पैशात’ म्हणजे खोक्यात तोलत नव्हते. ते आज त्यांचे वारसदार म्हणवून घेणारे शिंदे करीत आहेत. शिंदे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात एक चटकदार वाक्य आहे ते असे, ‘‘राजकारणात सगळेच सारखे नसतात. काही आनंद दिघे असतात!’’ त्याच धर्तीवर आता सांगता येईल. सगळय़ांनाच दिघे बनता येत नाही. काही शिंदेही बनतात! शिंदे यांचा दसरा मेळावा म्हणजे चोरांचे संमेलन ठरेल! त्यात दिघ्यांचे नाव घेणे हा त्या पुण्यवान माणसाचा अपमान ठरेल!

शिंदे व त्यांच्या लोकांनी अजूनही विचार करायला हवा. दसऱयाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र फुटला हे चित्र देशासमोर जाऊ नये. लोकभावना पूर्णपणे शिवसेनेच्या बाजूनेच आहे; शिवसेना एकच आहे!

[email protected]