खवय्या

397
  • शिरीष कणेकर

पल्या सगळ्यांचे विनोदातले परात्पर गुरू पु. ल. देशपांडे यांनी लिहून ठेवलंय की, खूप गातो तो गवय्या नव्हे. त्याचप्रमाणे खूप खातो तो खवय्या नव्हे. ऍज ऑलवेज ही इज ऍब्सोल्युटली राइट!

कोणी बेसुरा रेडा आसपासच्यांचं डोकं उठवीत विसातले दहा तास रेकत असेल तर या कठोर तपश्चर्येनंतर तो भीमसेन जोशी होत नाही. त्याचप्रमाणे पाणघोड्याप्रमाणे जबडा वासून घमेलीच्या घमेली अन्न एका घासात गिळतो तो खाण्यातला दर्दी म्हणून ओळखला जात नाही.

खाण्यातला दर्दी कसा असतो? चपातीत मिठाची कणी हवी, नाहीतर ती अळणी लागते हे ज्याला कळतं तो दर्दी. बिर्याणीला पुदिनाच्या पानाशिवाय मजा नाही हे जाणतो तो दर्दी. चिंबोरी ‘लाखे’ची हवी हा ज्याचा आग्रह असतो तो दर्दी.

पुरणपोळीबरोबर नारळाचं दूध नसेल तर चालणार नाही हा ज्याचा हट्ट असतो तो दर्दी. इडली-वडा-डोसा यांच्याबरोबर खोबऱ्याची व मळगीपुरी चटणी हवीच हे ज्याला समजतं तो दर्दी. मालपोवा गरमागरमच खायचा असतो हे ज्याला भान असतं तो दर्दी. फोडणीच्या भातात चार सोडे घातले की त्याचा दर्जा एकदम कुठल्या कुठे जातो हे ज्याला माहीत असतं तो दर्दी.
जो अळणी चपात्यांची चळत खातो, जो पुदिना व शहाजिरे नसलेल्या बिर्याणीला उत्तम म्हणतो, जो पुरणपोळी नुसतीच बकरीसारखी ओरबाडून खातो, जो गारढोण मालपोवा उंदरासारखा कुरतडतो तो कसला आलाय बोडक्याचा दर्दी? लिंबू व घरी कढवलेल्या लोणकढी, साजुक, रवाळ तुपाशिवाय जो वरणभात खातो तो पिसांसकट कोंबडी व शिंगांसकट बोकड खात असला पाहिजे असा सुविचार माझ्या मनात येतो.

खाण्यात तरी दोन पायांच्या माणसात व चार पायांच्या जनावरात काही फरक नको का? ‘कुठणं आणलंय हे जून मटण?’ असं कपाळाला आठ्या घालत पाळलेला कुत्रा कधी विचारतो का? ‘काय चाललंय हे? आठवडा झाला, मी टुकार व्हेज जेवतोय’ असं चपटं नाक वरू करून कुत्रा तक्रार करतो का? ‘साले फिरायला बाहेर सोडत नाहीत आणि वर घरात घाण केली म्हणून बोंबलतात’ असं कुत्रा कातावून भुंकून सांगतो का? म्हणूनच कसलीही तक्रार (पक्षी – कटकट) न करणारा कुत्रा बायकांना नवऱ्यापेक्षा प्रिय असतो. ‘यूss यूsss ’ केल्याबरोबर नसलेली शेपटी हलवत हातातलं काम टाकून धावत येणारा कुंकवाचा धनी महिलांना भावतो. मग आमटी करपो नाहीतर भाजी कच्ची राहो, बोलणी खाण्याचा प्रश्नच नाही. कितीही महिने आई येऊन मुक्काम ठोकून राहिली तरी नो प्रॉब्लेम. नुसती खूण केली की नवरा सासूचे (ही) पाय चाटेल…

एक शेर आठवतोय –
‘शहीदे देग हूँ मैं, होटलमें हो तुरबत मेरी
खानसामाओंके कंधोपे उठे मय्यत मेरी’
‘देग’ म्हणजे बिर्याणी वगैरे करायला वापरतात ते जंगी पातेलं. ‘तुरबत’ म्हणजे थडगं. बिर्याण्या करून करून हे पातेलं तळाला काळं झालंय. म्हणजेच शायराच्या भाषेत ‘शहीद’ झालंय. शायर स्वतःला ‘देग’ म्हणवून घेतो व आपलं थडगं हॉटेलात असावं असं म्हणतो आणि अंतिम इच्छा काय, तर हॉटेलातील खानसाम्यांनी आपल्याला खांदा द्यावा. यंव रे गबू! (आपले पु. ल. म्हणाले होते की, माझा देह समुद्रात टाकावा. ज्या माशांवर मी आयुष्यभर ताव मारला त्यांना एकदा तरी मला खाऊ दे.)
हॉटेलवरून आठवलं. अनेक लोकांची अशी धारणा असते की, (नॉन-व्हेज) जेवायचं तर हॉटेलातच. (मग यथावकाश ते ‘शहीदे देग’ होतात.) एक तर त्यांच्या घरात मांसाहार चालत नाही किंवा करायला झेपत नाही किंवा आळसानं त्यांचा कबजा घेतलेला असतो. (चिंचगुळाची आमटी म्हणजे सुगरणपणाची परिसीमा. वर ‘ए, मला सांग ना रेसिपी’ असं एकमेकींना विचारायचं.) मी जातीपातीचा उल्लेख कटाक्षानं टाळलाय याची नोंद माझ्या सहृदय टीकाकारांनी घेतली असेलच. (सहृदय आणि टीकाकार दोन्ही गोष्टी एकाच माणसात कशा असू शकतात?) जे घरी सामिष भोजन करतात त्यांना सहसा बाहेरचं (पक्षी – हॉटेलचं) आवडत नाही. करणारी तरबेज असेल तर तिला व तिच्या घरच्यांना हॉटेलचं रुचत नाही. त्यातल्या त्रुटी सहन होत नाहीत. हे काय, कालवणाला लसूणच नाही? असले संतापजनक प्रश्न त्यांना समोरचं अन्न एन्जॉय करू देत नाहीत. ‘डिश’ची किंमत त्यांचे ब्लडप्रेशर वाढवते. आपण घरीच करून मस्तपैकी खाऊ, हा निर्णय घेऊन पश्चात्तापदग्ध कुटुंब बाहेर पडते. ज्यांना काहीच करता येत नाही त्यांना कोणीही, कुठेही व काहीही केलेलं आवडतं. चांगलं आहे. अज्ञानातलं सुख.

आमच्याकडे एक फोटोग्राफर जेवायला आले होते. (आले होते म्हणजे बोलावलं होतं म्हणून आले होते. वर्तमानपत्रातल्या माणसांनाही बोलवावं लागतं.) त्यांना एका वाटीत वरण व एका वाटीत पापलेटचं कालवण वाढलं होतं. (बाहेरचं कुणी आल्यानं वरणाला वाटीची पदोन्नती देण्यात आली होती. एरवी ते पळीनं भातावर वाढलं की त्याची भूमिका संपते.) जेवता जेवता पाहुण्यानं वरणाची वाटी कालवणाच्या वाटीत रिकामी केली. माझी चवचाल जीभ टाळ्याला चिकटून बसली.
‘क्-क् काय करताय?’ आम्ही विचारलं.
‘काही नाही, म्हटलं उगीच दोन-दोन वाटय़ा कशाला?’ पाहुणा सहजगत्या म्हणाला…
माझ्या मनात आलं की, पुन्हा वाढणी करायचं झाली तर एकाच वाटीत पळीभर वरण व पळीभर कालवण वाढायला लागेल. पळीदेखील वेगळी घ्यायला नको, कशाला उगीच दोन-दोन पळय़ा असं पाहुणा म्हणाला असता.
पापलेटच्या कालवणात वरण ही अनोखी रेसिपी मी कंप्युटरवर टाकू का?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या