आता एटीएमसारख्या यंत्रातून मिळणार सातबारा

40

सामना ऑनलाईन, नागपूर

सातबारासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे बंद करण्यासाठी एटीएमसारख्या यंत्रामधून सातबारा देण्याचा अभिवन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. फक्त २० रूपये भरून शेतकऱ्यांना सातबारा मिळू शकणार आहे. हा उपक्रम राज्यामध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपुरात सुरू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी या सेवेचा शुभारंभ केला.

सातबारासाठी वेगळं स्वयंचलित मशीन एटीए नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात सुरू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी ही अभिनव संकल्पना नागपूर जिल्ह्यात राबवायला सुरुवात केली असून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात अशी मशिन बसवण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून अभिनव भेट असल्याचे सांगतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की  “जनतेला सात-बाराचा उतारा सुलभ व एक मिनिटात ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहे. हे यंत्र मंडल अधिकारी कार्यालयापर्यंत बसविल्यास जनतेला सात-बारासाठी त्रास होणार नाही” सात-बारा मिळविण्यासाठी अत्यंत सुलभ  व सुटसुटीत प्रक्रिया सुरू केल्याबद्दल अनूप कुमार यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वेंच्या कार्याचा गौरव केला.

गोधनी येथील शेतकरी सिद्धेश्वर कोळे यांनी एटीएम मशीमध्ये 20 रुपये जमा करुन आपल्या शेतीचा सात-बारा घेतला. यापूर्वी सात-बारासाठी तलाठ्याकडे जावे लागत होते. एटीएमवर सात-बारा मिळत असल्यामुळे सुविधा झाल्याचे  यावेळी सिद्धेश्वर कोळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या