शबरीमाला मंदिराच्या दरवाजावर राडेबाजी

66

सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम

सर्वोच्च न्यायालयाने 800 वर्षांची अनिष्ट परंपरा मोडीत काढून शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिराचे दरवाजे आज बुधवारी उघडले पण महिलांना प्रवेश मात्र मिळाला नाही. मंदिराच्या दरवाजाबाहेर प्रवेशाचे समर्थक व विरोधकांमध्ये जबरदस्त राडा झाला. जमावाने तुफान दगडफेक केली. पत्रकार, पोलिसांनाही बदडण्यात आले.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने केरळातील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात शतकानुशतके महिलांना असलेली प्रवेशबंदी उठविली. मंदिरात महिलांना सन्मानाने प्रवेश देण्यात यावा असे आदेश न्यायालयाने दिले. या ऐतिहासिक निकालाने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले, मात्र कर्मठ वर्गाने न्यायालयाच्या निर्णयावर थयथयाट केला. या पार्श्वभूमीवर आज महिलांसाठी शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने तेथे प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळपासूनच मंदिर परिसराचा पोलिसांनी ताबा घेतला होता. दर्शनासाठी येणाऱया भाविकांची कसून तपासणी करण्यात येत होती. मंदिराच्या खालच्या भागात काँग्रेस नेते निलाक्कल हे आपल्या कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करत होते. महिलांचा जथा दरवाजे उघडण्याच्या प्रतीक्षेत असतानाच अचानक एका बाजूने दगडफेक सुरू झाली. दगडफेक सुरू होताच बिथरलेल्या भाविकांची पळापळ झाली. दंगलखोरांनी पोलिसांनाही निशाणा बनवले. दोन पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. वातावरण चिघळत असल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.

सायंकाळी पाच वाजता मंदिराचे दरवाजे उघडणार असल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला. मंदिराच्या दरवाजासमोरच अनेक जण उभे ठाकले. त्यांनी महिलांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला. मंदिराचे दरवाजे उघडले, परंतु महिलांना आत प्रवेश करता आला नाही. वातावरण तंग होत असल्याचे पाहून पोलिसांनी धरपकड सुरू केली. जवळपास 30 जणांना ताब्यात घेण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला विरोध करणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिला. भाविकांचा रास्ता रोखणाऱयांची गय केली जाणार नाही असे विजयन म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या