सब्जी मसाला

165

मीना आंबेरकर

उन्हाळय़ात त्याच त्या भाज्यांना जरा चविष्ट करूया मसालेदार

bringal-sabji

टोमॅटोच्या रसातील वांग्याची भाजी

साहित्य…पाच बिनबियांची मध्यम वांगी, अर्धी वाटी ओले पावटे, पाच मध्यम लाल टोमॅटो, अर्धी वाटी नारळाचे दूध, 1 टी स्पून धण्याची ताजी पूड, २ चमचे सब्जी मसाला, मीठ, तिखट, कोथिंबीर, तेल.

कृती…टोमॅटो वाफेवर शिजवून मिक्सरमधून काढावेत. कांदा बारीक चिरावा. वांग्याच्या फोडी करून पाण्यात बुडवून ठेवाव्यात. नारळाचे दूध काढावे. पाव वाटी तेलाच्या फोडणीत कांदा बदामी रंगावर परतावा. त्यात पावटे घालावे. थोडं पाणी शिंपडून वाफ आणावी. नंतर वांग्याच्या फोडी त्यात परताव्यात. वाटीभर गरम पाणी घालून भाजी अर्धवट शिजवावी. नंतर त्यात लाल तिखट, धणेपूड, सब्जी मसाला. टोमॅटोचा रस, नारळाचं दूध चवीनुसार मीठ व साखर घालावी. भाजी चांगली उकळावी. नंतर चिरलेली कोथिंबीर घालून ढवळून भाजी उतरावी.

veg-kheema

व्हेजिटेरियन खिमा

साहित्य…३०० ग्रॅम फ्लॉवर, २ कांदे, लसूण पाकळय़ा, १ इंच आले,२ टोमॅटो, १ चमचा तिखट, १ चमचा जिरे,१ चमचा खसखस, ४ वेलदोडे, ५-६ बदाम, २ चमचे सब्जी मसाला,१ वाटी मटारचे दाणे, ४ थेंब केवडा इसेन्स, तूप.

कृती…फ्लॉवर, कांदे व आले किसून घ्यावे. लसूण वाटून घ्यावी. मसाला वाटून घ्यावा. थोडय़ा तुपावर किसलेला फलॉवर तळून घ्यावा. नंतर बाहेर काढून ठेवावा. त्याच पातेल्यात आणखी थोडे तूप घालून किसलेला कांदा घालावा.कांदा लाल होईपर्यंत परतावा. नंतर त्यात आले, लसूण घालून परतावे. त्यात अर्धा वाटी पाणी घालून थोडा वेळ परतत राहावे. नंतर त्यात वाटलेला मसाला व सब्जी मसाला घालावा. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे. नंतर त्यात तळलेला फ्लॉवर व वाफवलेला मटार घालावा. पुन्हा अर्धी वाटी पाणी घालावे. पाणी आटले की, उतरवावे. वरून केवडा इसेन्स घालावा. वरून थोडी कोथिंबीर घालावी.

श्रावण घेवडय़ाची वाटणाची भाजी

गेल्या वेळेला आपण रुचीपालट करण्यासाठी रस्सा मसाला बघितला. त्या मसाऱयाच्या वापरामुळे खरोखरच रुचीपालट होतो की नाही हे तुम्हाला जाणवले असेल असा माझा कयास आहेच. आपल्या रोजच्या जेवणात भाजीला पर्याय नसतो. भाजी पानात असणे आवश्यक असतेच. मग ही रोजची भाजी करताना त्यात काहीतरी वेगळेपण असावे असे गृहिणीला वाटते. कारण उन्हाळय़ात भाज्यांची आवक कमी असते. काही ठराविकच भाज्या बाजारात दिसतात. तीच तीच भाजी खाऊन घरातले सदस्यही कंटाळतात. मग रोजच्या वापरातील मसाल्यात जरा बदल करून स्वाद बदल केल्यास निश्चित फरक पडेल म्हणून हा प्रपंच. बघूया, कसा होईल हा जरा हटके सब्जी मसाला…

mix-sabji

साहित्य…अर्धा किलो श्रावण घेवडा (फरसबी)

वाटण साहित्य…१ वाटी चिरलेला कांदा. ८-१० लसूण पाकळय़ा, १ इंच आल्याचा तुकडा, १०-१२ हिरव्या मिरच्या, २ टे. स्पून मीठ, अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओला नारळ. हे सर्व बारीक वाटा. १ टे. स्पून लिंबाचा रस,२ टे. स्पून साखर, २ टे. स्पून सब्जी मसाला.

कृती…श्रावण घेवडा धुऊन बारीक चिरा. ४ वाटय़ा पाण्यात पाव टी स्पून मीठ घालून उकळी काढा. चिरलेल्या शेंगा त्यात घाला व उकळी आणा. गॅस बंद करा. दहा मिनिटांनी शेंगा उपसून घ्या. २ टे. स्पून तेलाची फोडणी करा. हळद, मीठ घाला. वाटणाची गोळी व सब्जी मसाला घालून परता. रंग बदलण्यापूर्वी निथळलेली फरसबी घालून थोडी परता. लिंबाचा रस व साखर घालून थोडीशी परता. जास्त परतू नका. नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी चवदार लागते.

सब्जी मसाला

साहित्य…धणे पाव किलो, जिरे १०० ग्रॅम, मेथ्या २५ ग्रॅम, हिंग २५ ग्रॅम, काळी मिरी २५ ग्रॅम, तमालपत्र २५ ग्रॅम, मोहरी (लाल) २ चमचे, हरभरा डाळ १ चमचा, उडीद डाळ १ चमचा, सुके खोबरे १०० ग्रॅम.

कृती…खोबरे सोडून सर्व पदार्थ तेलात तळून घ्यावेत. मिक्सरवर बारीक दळावेत. सर्वांत शेवटी खोबरे भाजून बारीक दळून मसाल्यात मिसळावेत. बटाटे, फ्लॉवर, नवलकोल, सुरण या भाज्यांना हा मसाला वापरल्यास त्या विशेष चवदार होतात. पाहूया तर हा मसाला वापरून तयार केलेल्या काही खाद्यकृती.

दोडका बटाटा…भाजी अर्धा किलो, दोडका, तीन मोठे बटाटे.

साहित्य…२ टेबलस्पून तेल, ४-५ तमालपत्राची पाने. बडीशेप, २ चमचे सब्जी मसाला. अर्धी वाटी तेल तळण्यासाठी, बटाटे, २ वाटय़ा पाणी भाजी सारखी करण्यासाठी.

वाटण… ४ टे. स्पून खसखस, ८-१० लसूण पाकळय़ा, २ इंच दालचिनीचा तुकडा, ४-५  लवंगा,२  टे. स्पून मीठ, ४-५ लाल मिरच्या. हे सर्व थोडेसे पाणी घालून कच्चेच बारीक वाटा.

कृती…दोडक्याच्या शिरा काढा व २ इंच लांबीच्या फोडी करा. बटाटी सोलून २ इंच लांबीच्या फोडी करा. अर्धी वाटी तेलात बटाटय़ाच्या फोडी तळून काढा. २ टे. स्पून तेल तापवा. त्यात बडीशेप व तमालपत्रे घाला. त्यात वाटणाची गाळी व सब्जी मसाला घाला. परता. त्यात वाटणाची गोळी व सब्जी मसाला घालून परता. रंग बदलण्यापूर्वीच त्यात दोडक्याच्या फोडी घाला. वाफ आली की, पाणी घालून भाजी सारखी करा. जरा शिजल्यावर बटाटय़ाच्या तळलेल्या फोडी घाला. एक वाफ आल्यावर गॅस बंद करा. ही भाजी गरम फुलक्यावर छान लागते.

आपली प्रतिक्रिया द्या