
कोकणी माणूस विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. कोकणातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एका व्यासपीठावर आणून उदयोन्मुख तरुणांना मार्गदर्शन करणे, सहकार्याने समाजाचे हित साधणे या हेतूने मुंबईतील साबू सिद्दीक महाविद्यालयाच्या प्रांगणात कोकण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोकणी संस्कृतीची ओळख करून देणे आणि कोकणी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी जेएमबीआर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बशीर हजवानी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. या वेळी बशीर हजवानी, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, कोकण बॅंकेचे अध्यक्ष नजीब मुल्ला, उपाध्यक्ष आसीफ दादन, डॉ. जहीर काझी, मुश्ताक अंतुले, आर.सी. घरत, डॉ. मोहम्मद अली पाटणकर आदी उपस्थित होते.
तीन दिवसीय या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, माजी मंत्री आरीफ नसीम खान, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार अबू आझमी, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष नसीम सिद्दिकी, आयपीएस अधिकारी कैसर खालीद, सुफियान वणू आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
z माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास चित्रफीत व एकांकिकेच्या माध्यमातून या वेळी दर्शवण्यात आला. बॅंकिंग, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल इस्माईल दादन यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.