सचिन, गांगुली, लक्ष्मणचा मानधनासाठी आटापिटा

37

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये ज्यांना ‘महान’ मानले जातेय त्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’व्ही.व्ही. एस. लक्ष्मण या त्रिमूर्तीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक निवडीसाठी बीसीसीआयकडे मानधन मागितल्याच्या वृत्ताने क्रिकेट शौकिनांमध्ये खळबळ माजली आहे. क्रिकेटने ज्यांना देवपण आणि महानपण दिले त्या खेळाचे पांग फेडण्याऐवजी या महान त्रिमूर्तीने सल्ल्यासाठी मानधन मागावे ही गोष्ट मनाला पटत नाहीय असा नाराजीचा सूर हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांत दिसून येतोय. विशेष म्हणजे या तिघांनी दुसऱ्यांदा क्रिकेट बोर्डाकडे मानधनाची मागणी केल्याचे समजतेय.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना मुदतवाढ द्यायची की नवा मुख्य प्रशिक्षक संघासाठी निवडावा याचा फैसला सचिन, सौरभ व लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती करणार आहे. या त्रिमूर्तीने कुंबळेलाच झुकते माप दिल्याची चर्चा सर्वत्र आहे. मुख्य प्रशिक्षकपदाबाबत अंतिम निर्णय होण्याआधीच सल्लागार समितीने बोर्डाकडे मानधनाचा विषय पुन्हा उपस्थित केला आहे.

बीसीसीआय म्हणते, वृत्त चुकीचे
बीसीसीआय सल्लागार समिती सदस्यांनी बोर्डाकडे मानधनाची मागणी केल्याच्या वृत्ताचा बीसीसीआयने मात्र इन्कार केला आहे. सचिन, सौरभ व लक्ष्मण या महान त्रिमूर्तीचा सल्ला आमच्यासाठी बहुमूल्यच आहे. त्यांनी आमच्याकडे कोणतेही मानधन मागितलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या तथ्यहीन वृत्तावर कुणीही विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण बीसीसीआयच्या प्रसिद्धी विभागाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या