sachin pilot – राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून पायलट यांची हकालपट्टी

2355

काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही घोषणा केली आहे.

राजस्थानच्या वाळवंटात घोंघावणारे राजकीय वादळ आणखी गहिरे झाले असून, जयपूरपासून राजधानी दिल्लीपर्यंत घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी बोलविलेल्या बैठकीला शंभरावर आमदार उपस्थित होते, असे सांगण्यात आले. बैठकीनंतर या आमदारांना रिसोर्टवर ‘क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही 25-30 आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा कायम ठेवला आहे. दरम्यान, भाजपने ‘ऑपरेशन लोटस’साठी काँग्रेस आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आहे. या राजकीय घडामोडीत मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निकटवर्तीयांवर आयकर छापे टाकले आहेत.

gahlot-and-surjewala

राज्यसभा निवडणुकीवेळेसच भाजपने राजस्थानात ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले. काँग्रेस आमदारांना २५ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. याचा तपास ‘एसओजी’ने सुरू केला आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस बजावली. ही वादाची ठिणगी सांगितले जात असले तरी मुख्यमंत्री गेहलोत यांनाही नोटीस पाठविण्यात आली होती.

रविवारी उपमुख्यमंत्री पायलट यांनी बंडाचे निशाण उभारले आणि समर्थक आमदारांसह दिल्ली गाठली. या राजकीय नाट्यामागे भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ असून गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश प्रमाणेच राजस्थानातही हे ‘ऑपरेशन’ सुरू असल्याची चर्चा आहे. सोमवारचा दिवस अनेक राजकीय घडामोडींचा घडला.

भाजपची ऑफर, हवे तेवढे पैसे घ्या

हवे तेवढे पैसे घ्या; पण आमच्याकडे या अशी ऑफरच भाजपने दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार राजेंद्र गुडा यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

आयकर धाडींमागे ‘टायमिंग’

राजकीय नाट्य सुरू असतानाच आयकर विभागाने काँग्रेस नेते धर्मेंदर राठोड यांच्या निवासस्थानावर छापे टाकले. राठोड हे मुख्यमंत्री गेहलोत यांचे निकटवर्तीय समजले जातात. राजीव अरोरा यांच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले.

काय होऊ शकते?

  • सचिन पायलट आपल्या समर्थक आमदारांसह नवा पक्ष स्थापन करतील. पुरोगामी आघाडी किंवा पुरोगामी काँग्रेस असे नाव असू शकते, असाही अंदाज आहे.
  • भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री होण्यासाठी पायलट यांना 35 ते 40 आमदारांचा पाठींबा आवश्यक आहे; पण ही शक्यता कमी आहे.
  • समजा पायलट यांच्या दाव्याप्रमाणे जर त्यांच्याबरोबर 20 आमदार गेले तर त्यांची आमदारकी जाईल. काँग्रेसचे सध्याचे संख्याबळ 107 वरून 87 होईल.
  • भाजपचे 72 आमदार आहेत. विधानसभेत संख्याबळ 180 होईल. बहुमतासाठी 91 आमदारांची आवश्यकता लागेल. १३ अपक्ष आमदार आहेत.
  • काँग्रेसला यातील चार आमदारांचा पाठींबा मिळाला तरी, गेहलोत सरकारला धोका राहणार नाही.

उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी जयपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र मंगळवारी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून काँग्रेसने पायलट यांना मंत्रीपदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.

सोमवारी काय घडले…

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलविली. त्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे 107 आमदार आहेत. यातील शंभरावर आमदार बैठकीला उपस्थितीत होते. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचा एक ओळीचा प्रस्ताव मंजूर केल्याचे काँग्रेसने सांगितले. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. मात्र, यात उपमुख्यमंत्री पायलट यांच्या नावाचा उल्लेख नाही.

या बैठकीला काँग्रेस पक्षाचे निरिक्षक म्हणून रणदीप सुरजेवाला, अविनाश पांडे, राजीव सातव हे नेते जयपूरला पोहचले होते.या बैठकीनंतर चार बसेसमधून सर्व आमदारांना जयपूरच्या एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आले. काही दिवस काँग्रेसचे आमदार ‘राजकीय क्वारंटाइन’मध्ये असणार आहेत.राजधानी दिल्लीतही घडामोडींना वेग आला. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्याबरोबर दिल्लीत 25 आमदार आहेत असा दावा केला.

आपली प्रतिक्रिया द्या