वसुंधरा की आमदार, पायलट यांचे विमान भाजपमध्ये लँड होण्यापासून कोणी रोखले? वाचा सविस्तर…

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवलेले सचिन पायलट सध्या द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. पायलट यांचे बंड जवळपास फसल्यात जमा असून ते ‘घरवापसी’ करणार की भाजपमध्ये जाणार याबाबत सध्या निश्चित नाही. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देत असले तरी पायलट यांनी तूर्तास यावर निर्णय घेतलेला नाही. याला एक कारण माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा गट असल्याचे बोलले जात आहे. तसेच पायलट यांना समर्थन देणारे काही आमदारही याला विरोध करत असल्याचे दिसते.

सचिन पायलट गेल्या 6 दिवसांपासून हरयाणा मधील मानेसर येथील एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत समर्थन देणारे 22 आमदार देखील आहेत. यात काँग्रेसचे 19 आणि 3 अपक्ष आमदार आहेत. राजस्थानमधील राजकारणात उलथापालथ होऊन दोन-तीन दिवस झाले तरी सचिन पायलट निर्णय घेऊ शकलेले नाही. त्यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी नोटीस देखील धाडली आहे, मात्र पक्षाने अद्याप त्यांच्यासाठी दरवाजे बंद केलेले नाहीत.

… तर समर्थन नाही, आमदारांचा पवित्रा
गहलोत यांच्याशी बंड केल्यानंतर पायलट यांना भाजपने खुलेआम पक्षात येण्याची ऑफर दिली. मात्र तूर्तास त्यांनी यास नकार दिला आहे. पायलट यांना पाठिंबा देणाऱ्या आठ आमदारांनी त्यांना स्पष्ट शब्दात भाजपमध्ये गेल्यास साथ देणार नाही’, सांगितले आहे. आयुष्यभर आपण भाजपचा विरोध केला, मात्र या कारणाने आपण भाजपमध्ये जाऊ शकणार नाही, असे आमदारांनी सांगितले. अनेकांना आपल्या राजकीय कारकिर्दीची चिंता असल्याने त्यांनी यास नकार देत गहलोत यांच्यासोबत जाने पसंद केले. त्यामुळे पायलट यांना निर्णय घेता आलेला नाही.

भाजपचा एक गट नाराज
पायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पक्षातील भांडण चव्हाट्यावर येईल, असे मत राजस्थानचे ज्येष्ठ पत्रकार सुंदर शर्मा यांनी व्यक्त केले. भाजपमध्ये सध्या अनेक गट आहेत. यातील एक गट वसुंधरा राजे यांचा असून राजस्थानमध्ये त्यांना राजकीय वजन आहे, तर केंद्रीय राजकारणात गजेंद्र सिंह शेखावत यांची चलती आहे. त्यामुळे वसुंधरा गट पायलट यांच्या भाजप प्रवेशाला खोडा घालत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या