सचिनला दिला धोका, बॅट बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ‘टॉप’च्या कंपनीने मागितली माफी

2140

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशी धोकेबाजी केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या बॅट बनवणाऱ्या कंपनीने माफी मागितली आहे. कंपनीने करार संपल्या नंतरही सचिनच्या नावाचा वापर आपल्या उत्पादनाच्या खपासाठी केला होता. अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि येथे सचिनने बाजी मारली.

क्रिकेटचे साहित्य बनवणारी ऑस्ट्रेलियन कंपनी ‘स्पार्टन’ने करार संपल्यानंतरही आपल्या नावाचा वापर करत बाजारात उत्पादनांचा खप केल्याचा आरोप सचिन तेंडुलकरने केला. याविरोधात टोकाचे पाऊल उचलत सचिनने ऑस्ट्रेलियातील फेडरल कोर्टात दावा ठोकला होता. करारामधील नियमांचे पालन न करणे, ब्रँड एंडोर्समेंटसाठी ठरलेली रक्कम न देण्याचाही ठपका सचिनने ठेवला. अखेरी कंपनीने आपली चूक मान्य करत सचिनची माफी मागितली असून कोर्टाच्या आदेशानुसार सचिनचे नाव किंवा त्याचा फोटो आपल्या उत्पादनांवर न वापरण्याचे ठरवले आहे.

याआधी सचिन आणि ऑस्ट्रेलियन कंपनी ‘स्पार्टन’ कंपनीत 2016 मध्ये एक करार झाला होता. हा करार 17 डिसेंबर 2018 नंतर संपुष्टात आला होता. करार संपल्याने नंतरच्या काळात कोणत्याही उत्पादनांसाठी कंपनी सचिनचे नाव वापरणार नाही असे कंपनीचे संलाचक लेस गलाब्रेथ यांनी स्पष्ट केले. मात्र तरीही नाव आणि फोटो वापरल्याने सचिनने न्यायालयात दावा ठोकला. आता या प्रकरणात दोन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण तोडगा काढला असून याबद्दल सचिननेही समाधान व्यक्त केले आहे, असे SRT Sports Management कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मृणमॉय मुखर्जी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या