सचिनकडून अजिंक्यला ‘गुरुमंत्र’

13

सामना प्रतिनिधी । मुंबई

कसोटी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाचा आधारस्तंभ असलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला वन डे संघातील स्थान भक्कम करता आलेले नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतरही त्याला श्रीलंकेतील वन डे मालिकेत म्हणावी तशी संधी देण्यात आली नाही. आता येत्या १७ सप्टेंबरपासून हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी या मराठमोळ्य़ा खेळाडूला भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘गुरुमंत्र’ मिळालाय. मास्टरब्लास्टरच्या परीसस्पर्शाने अजिंक्य रहाणेची फलंदाजी आणखीन बहरील यात शंका नाही. पण कर्णधार विराट कोहलीने त्याला संधी देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे हेही विसरता कामा नये.

प्रवीण अमरे यांच्याकडून अजिंक्य रहाणे अगदी सुरुवातीपासून क्रिकेटचे धडे गिरवत आहे. दोन मालिकांदरम्यान मिळणाऱ्या वेळेमध्ये तो न विसरता प्रवीण अमरे यांचा सल्ला घेतो. यावेळीही त्याने तेच केले. याचदरम्यान त्याला सचिन तेंडुलकरचेही मार्गदर्शन लाभले. सध्या अजिंक्य रहाणे नेटमध्ये कसून सराव करतोय. सचिन तेंडुलकर व प्रवीण अमरे यांच्या मोलाच्या टीप्सनंतर अजिंक्य रहाणे याने आपला फोटो ट्विटरवर शेअर केला. यामध्ये तो म्हणालाय, नेट प्रॅक्टिस खूप छान होती. वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे पाजी…

आपली प्रतिक्रिया द्या