Video – क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर काशी विश्वनाथाच्या चरणी लीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा कोनशिला समारंभ पार पडला. या समारंभासाठी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, 1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, बीसीसीआय प्रमुख रॉजर बिन्नी, बीसीसीआय सचिव जय शहा आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे देखील काशीला पोहोचले होते.

काशीला पोहोचताच सचिनसह सर्वांनी काशी विश्वनाथाचे दर्शनही घेतले. यावेळी लाल कुर्त्यातील सचिनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कपाळावर त्रिपुंड टिळा, हातात रुद्राक्षाची माळ आणि काशी विश्वनाथाचा प्रसाद, गळ्यामध्ये ‘ओम नम: शिवाय’चे उपरणे घालून सचिन काशी विश्वनाथाच्या दर्शनाला पोहोचला. सचिनसह सर्व क्रिकेटपटू आणि पदाधिकऱ्यांनी काशी विश्वनाथाची पूजा-अर्चा करत भक्तीभावाने दर्शन घेतले. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

30 एकरावर बनणार मैदान

काशीतील राजातालाब भागातील गंजारी गावामधील रिंग रोडजवळ 30 एकरावर हे मैदान बनणार आहे. तीन ते चार वर्षांमध्ये हे मैदान तयार होणार असून जवळपास 451 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने या प्रकल्पात भूसंपादनासाठी 121 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर बीसीसीआय मैदान बांधण्यासाठी 330 कोटी रुपये खर्च करणार आहे.

डमरू, त्रिशुळ आणि बेलपत्र

धार्मिक थीमवर हे मैदान उभारण्यात येणार आहे. मैदानात जाताच काशीची संस्कृती आणि अध्यात्माचा अनुभव येण्यासाठी मैदानाला अर्धचंद्राचा आकार देण्यात येईल. तसेच फ्लड लाइट त्रिशूळाच्या आकारात असतील. इमारतीमध्ये बेलपत्राचे डिझाईन दिसेल, तर डिझाईनमध्ये डमरूचा आकारही असेल. गंगा घाटाच्या पायऱ्यांप्रमाणे प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असेल. या मैदानामध्ये 30 हजार प्रेक्षक एकाचवेळी बसून आनंद घेऊ शकतील.