सचिनची आता मोठ्य़ा पडद्यावर बॅटिंग

30

सामना प्रतिनिधी मुंबई

क्रिकेटच्या मैदानावरील आपल्या असामान्य खेळाने अनेक विक्रमांना गवसणी घालणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अभिनयाची झलक आता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सचिनच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन अ बिलियन ड्रीम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे आज मोठ्य़ा दिमाखात लाँच झाले असून दस्तरखुद्द सचिन यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

१९८३ साली हिंदुस्थानने पहिले क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर आपणही क्रिकेटपटू व्हायचे स्वप्न पाहिले. त्यावेळी आम्ही मित्रांनी मिळून हा सामना टीव्हीवर पाहिला होता. कर्णधार कपिलदेव यांच्या हाती चषक पाहिला आणि क्रिकेटपटू होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सचिनने यावेळी सांगितले. माझ्या आयुष्यातील अनेक चढउतार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. मी आजवर क्रिकेटचे मैदान गाजवले आहे, पण अभिनयात मी कसा आहे हे प्रेक्षक ठरवतील असेही सचिन पुढे म्हणाला.

लहानपणी मित्रांसोबत उनाडक्या करणारा सचिन ते विश्वचषक जिंकून स्वप्न पूर्ण करणारा क्रिकेटपटू हा सचिनचा प्रवास चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. जेम्स एरस्किन दिग्दर्शित हा चित्रपट २६ मे रोजी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमीळ, तेलुगू या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या