केंद्रीय क्रीडा समितीतून तेंडुलकर, आनंद ‘आऊट’

353

क्रिकेटचा देवदूत सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळाचा बादशहा विश्वनाथन आनंद या महान खेळाडूंना नरेंद्र मोदी सरकारच्या क्रीडा समितीतून ‘आऊट’ करण्यात आले. या समितीवर त्यांच्या जागेवर हरभजन सिंग व कृष्णाम्माचारी श्रीकांत यांची नवे सदस्य म्हणून वर्णी लागणार आहे.

खेळाच्या विकासासाठी सल्ला देण्यासाठी तत्कालीन क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 2015 साली अखिल भारतीय क्रीडा परिषदे (एआयसीएस)ची स्थापना केली होती. सचिन तेंडुलकर व विश्वनाथन आनंद हे दोघे दिग्गज ‘एआयसीएस’च्या स्थापनेपासून सदस्य होते.

समितीतील सदस्यसंख्येला कात्री

‘एआयसीएस’मध्ये असलेल्या 27 सदस्यसंख्येला कात्री लावून ती संख्या आता 18 करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर व विश्वनाथन आनंद हे क्रीडा समितीच्या बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांना हटविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्याआधी दुसऱया टर्ममध्येही राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद व माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया यांनाही या समितीवरून हटविण्यात आलेले आहे.

मास्टरब्लास्टर नव्या भूमिकेत

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर नव्या भूमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलाला काही दिवसांपूर्वी भीषण वणवा लागला होता. या वणव्यातील पीडितांसाठी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यामधून गोळा होणार पैसा पीडित जनतेला दिला जाणार आहे. रिकी पाँटिंग व शेन वॉर्न या दोन संघांमध्ये होणारा लढतीत सचिन तेंडुलकरकडे पाँटिंगच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या