शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सचिन तुपेला अटक

सामना प्रतिनिधी । जालना

शेती अवजारे खरेदी करण्यासाठी तसेच पीक कर्जासाठी रूलोन्स डिस्ट्रीब्युटर्स सव्र्हिस प्रा.लि. या कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या सचिन उत्तमराव तुपे, रा. नूतन वसाहत या भामट्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा तालुका जालना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या पथकाने त्याला सायंकाळी शेतकऱ्याकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नूतन वसाहत भागातील सचिन तुपे हा रूलोन्स डिस्ट्रीब्युटर्स सव्र्हिस प्रा.लि. या कंपनीमध्ये पूर्वी कामाला होता. परंतु कंपनीत कार्यरत असताना त्याने अनेक गैरप्रकार केल्याची कुणकुण लागल्यामुळे कंपनीने त्याला वर्षभरापूर्वीच कंपनीतून काढले होते.

मात्र कंपनीतून काढल्यानंतरही तुपे याने कंपनीच्या कागदपत्रांचा आणि शिक्क्यांचा वापर करून शेती अवजारे खरेदी करण्याबरोबरच पीक कर्जासाठी आमच्या कंपनीकडून कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवत अनेक शेतकऱ्यांना गंडवल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांना मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली बारी यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोनि.निमेश मेहेत्रे, पीएसआय शेख, फौजदार विठ्ठल सोळंके, पोहेकाँ कल्याण पाटोळे, यशवंत मुंडे, देवा जाधव आणि पठाण यांनी एका शेतकऱ्याला सचिन तुपेकडे काल सोमवारी दुपारी कर्जाची मागणी करण्यासाठी पाठवले होते.

संबंधित शेतकरी आणि तुपे या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर तुपेला शेतकऱ्यांकडून पैसे घेत असताना रंगेहाथ पकडून तालुका जालना पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार विठ्ठल सोळुंके करीत आहेत. आरोपी सचिन तुपेला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्याकडून अनेक गावांतील शेतकऱ्यांची झालेली फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.