तूर डाळ नासाडीबाबत माजी नागरी पुरवठा मंत्र्याला बडतर्फ करा; गोवा काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांची भेट घेत भाजप सरकारने दुर्लक्षित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे लक्ष वेधत कारवाई करण्याची मागणी केली आहे. म्हादई नदीवरील बेकायदेशीर बंधारा बांधकाम स्थळांची पाहणी करण्याची, तूर डाळीच्या नासाडीस जबाबदार माजी नागरी पुरवठा मंत्र्यांच्या बरखास्तीची आणि गोव्यातील रोजगाराच्या परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, विधीमंडळ गट उपनेते संकल्प आमोणकर, मुख्य प्रतोद अॅड. कार्लोस आल्वारीस फरेरा, आमदार एल्टन डिकोस्ता आणि रोडॉल्फो फर्नांडिस यावेळी उपस्थित होते.

म्हादई नदीचे संरक्षण करण्यासाठी, अन्नपदार्थांची होणारी नासाडी थांबवण्यासाठी आणि गोव्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोव्यातील लोकांच्या मनात भीती आणि चिंता आहे असे निवेदनात म्हटले आहे.

कर्नाटकने म्हादई खोऱ्यातील पाणी वळवण्यासाठी बंधाऱ्यांचे सुरू केलेले बेकायदेशीर बांधकाम आणि गोवा सरकारच्या निष्क्रियतेवर या निवेदनात प्रकाश टाकला आहे. म्हादई नदीवर कर्नाटकने केलेल्या कामाची नेमकी स्थिती जाणून घेण्याचा अधिकार गोव्यातील जनतेला आहे असे नमुद करुन काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांना कर्नाटकातील म्हादई नदीकाठी काम सुरू असलेल्या बांधकाम स्थळांना गोवा सरकारच्या संबंधित अधिकार्‍यांसह भेट देत परिस्थितीचा आढावा घेण्याची विनंती केली आहे. या पाहणी दौऱ्यात राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांच्यासोबत येण्याची परवानगी देण्याची विनंतीही काँग्रेस पक्षाने राज्यपालांना केली आहे.

काँग्रेस पक्षाने आपल्या निवेदनात 242मेट्रिक टन तूर डाळ आणि 10.3 मेट्रिक टन साखर वाया गेल्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि माजी नागरी पुरवठा मंत्री आणि यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

गोव्यातील वाढत्या बेरोजगारीची टक्केवारी दर्शविणारे विविध अहवाल आणि लाखो नोकऱ्यांचे आश्वासन देणारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणारी विधाने यामुळे राज्यातील विविध तरुण नैराश्यात गेले आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे . सुशिक्षितांमध्ये निराशेची पातळी चिंताजनकरित्या वाढत आहे व युवा वर्ग आता अंमली पदार्थांचे व्यसन आणि इतर वाईट गोष्टींकडे आकर्षित होत आहेत असे राज्यपालांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे.

गोव्यातील रोजगाराच्या परिस्थितीवर सरकारने खरी तथ्ये आणि आकडेवारी देणारी “श्वेतपत्रिका” जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती प्रक्रिया हाती घेण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली आहे. काँग्रेसने राज्यपालांच्या तात्‍काळ हस्तक्षेपाची मागणी करीत वरील तीनही मुद्द्यांवर सरकारला आवश्‍यक निर्देश जारी करण्‍याची विनंती निवेदनातून केली आहे.