प्रसंगी सरकारविरोधातही लढू! सदाभाऊ खोतांचं स्पष्टीकरण

सामना ऑनलाईन, सांगली

घटस्थापनेच्या मुहुर्तावर सदाभाऊ खोत यांनी स्वत:ची संघटना स्थापन करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज ते आपल्या संघटनेची स्थापना करणार असून ही संघटना रयतेची असेल असं त्यांनी सांगितलं आहे. या संघटनेचं नाव रयत क्रांती संघटना असेल असं सांगण्यात येत आहे.लोकांच्या समस्येवर या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनं करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोणाला मातीत घालण्यासाठी नाही तर मातीत घाम गाळणाऱ्यासाठी ही संघटना असेल असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

कोल्हापुराच्या महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आणि देवीच्या पायावर संघटनेचा झेंडा आणि अवतरणचिन्ह ठेवून संघटनेचा पहिला मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यापूर्वी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या बैठकीमध्ये संघटनेचं नाव जाहीर केलं जाणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे. राजू शेट्टी यांच्यासोबतच्या संघर्षाबाबत खोत यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की वर्षभर टीकेचा धनी झालो, त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी माझा जन्म झालेला नाही. यापुढे शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि गोरगरिबांसाठी आपली संघटना लढेल असं खोत यांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या