जगप्रसिध्द शिल्पकार सदानंद बाकरे यांच्या शिल्पाकृतीला तब्बल एक कोटींची किंमत

कलाकार एखादी कलाकृती घडवितो , त्यावेळी तो त्यामध्ये आपले प्राण ओतत असतो. अशा कलाकृती अनमोल असतात. अशा अनमोल कलाकृतींचे पैशातील मोल ठरवण्याचे काम त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी करत असतात. जागतिक दर्जाचे चित्रकार-शिल्पकार सदानंद बाकरे यांनी सह्याद्री कला महाविद्यालयामध्ये एक शिल्पाकृती साकारली होती. या शिल्पाकृतीची किंमत निश्चित करण्यात आली असून ती तब्बल एक कोटी रुपये इतकी आहे. ही माहिती कला महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिध्द चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी दै.सामनाशी बोलताना दिली.

सह्याद्री कला महाविद्यालयाला बाकरे यांनी अनेकदा सदिच्छा भेट दिली होती. एका भेटीदरम्यान राजेशिर्के यांनी सदानंद बाकरे यांना प्रात्यक्षिक दाखवण्याची विनंती केली होती. त्यावेळी कला महाविद्यालयाच्या परिसरात एका नवीन इमारतीचे काम सुरु होते . लाकडाच्या पट्ट्या इतस्ततः विखुरलेल्या होत्या. या पट्ट्या पाहून शिल्पकार बाकरे यांना एक कल्पना सुचली. त्यांनी भौतिकशास्त्राचा आधार घेत बाटलीच्या तोंडावर तोल साधेल अशी अर्धवर्तुळाकार कलाकृती घडविली . या कलाकृतीच्या दोन्ही बाजूला करवंट्या बसवून त्यात पक्षांसाठी दाणापाण्याची सोय केली. पक्षी या कलाकृतीवर येऊन बसले की हे शिल्प हलायला लागतं. शिल्प हलत असलं तरी त्याचा तोल कधीही जात नाही कारण भौतिकशास्त्राचा आधार घेऊन ते तयार करण्यात आलं होतं. हे शिल्प पाहून विद्यार्थी आणि प्राध्यापक थक्क झाले होते.

जागतिक दर्जा प्राप्त झालेले सदानंद बाकरे हे प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखले गेले. त्यांनी इंग्लंड मधील वास्तव्यातही अनेक कलाकृती घडविल्या . आमच्या कला महाविद्यालयात घडविलेल्या कलाकृतीची किंमत जरी आम्ही एक कोटी निश्चित केली असली तरी ही कलाकृती जागतिक स्तरावर अनमोल अशा पद्धतीची आहे. अशा प्रकारची बाकरे यांची कलाकृती अन्यत्र कुठेही नाही . सदानंद बाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आम्ही चित्र – शिल्प स्पर्धांचे आयोजन केले आणि प्रदर्शनात बाकरे यांची कलाकृती मांडून या कलाकृतीची प्रथमच किंमत जाहिर केली- प्रकाश राजेशिर्के

जगप्रसिद्ध चित्रकार शिल्पकार सदानंद बाकरे यांने नाव कलाविश्वात जगभरात आदराने घेतले जाते. जागतिक किर्तीचा हा कलाकार इंग्लंडमधून परतल्यानंतर कोकणात स्थायिक होणअयाच्या विचाराने आला होता. बाकरे यांनी गोव्यापासून दापोलीपर्यंत समुद्राजवळची विविध ठिकाणे पाहिली, मात्र त्यांचे मन हे दापोली जवळच्या मुरुड समुद्रकिनारी रमले. तिथे त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले. सदानंद बाकरे हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे प्रमुख संस्थापक सदस्य होते. चित्रकार फ्रान्सिस न्यूटन सुझा, चित्रकार मकबूल फिदा हुसेन, चित्रकार सय्यद हैदर रझा, चित्रकार कृष्णाजी हौळाजी आरा , चित्रकार हरी अंबादास गाडे या महान सहा चित्रकारांमध्ये फक्त सदानंद बाकरे हे एकमेव चित्रकार-शिल्पकार होते.