सदाशिवगड पाणी योजनेची चाचणी यशस्वी

सामना ऑनालाईन । कराड

सातारा जिल्ह्यातील कराडजवळ असलेल्या किल्ले सदाशिवगडावर लोकवर्गणीतून साकारलेली महत्त्वकांक्षी पाणी योजना यशस्वी झाली आहे. सदाशिवगडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाईपलाईनद्वारे गडाखालून तब्बल दोन किलोमीटरवरून पाणी आणण्यात आले आहे. या योजनेसाठी ‘सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान’ने शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकवगर्णीतून ही योजना यशस्वी करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सोमवारी संद्याकाळी या पाणी योजनेची पहिली चाचणी यशस्वी झाली.

सदाशिवगडावर पाणी नेण्यासाठी मागीलवर्षी 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान’ने सदाशिवगड पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ केला होता. यासाठी त्यांना बाबरमाची येथील शेतकरी जयवंत मुळीक यांनी मोलाची साथ दिली. मुळीक यांनी सढळहस्ते आपल्या विहिरीचे पाणी सदाशिवगड पाणी योजनेसाठी विनामूल्य उपलब्ध केले आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून सोमवारी झालेल्या पहिल्या चाचणीत गडावरच्या पुरातन महादेव मंदिरासमोरील विहिरीत पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या