घातपाताचा सुरक्षित ‘रेल्वेमार्ग’?

41

वैभव मोहन पाटील

रेल्वेमार्गावर घातपात होणार असल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. काही दिवसांपूर्वी दिवा स्थानकाजवळ लोखंडी तुकडे सापडले, त्यानंतर पनवेल-दिवा रेल्वेमार्गावर 7 फुटांचा खांब, त्यानंतर पनवेल-जेएनपीटी रेल्वे मार्गावर 11 फुटांचा विद्युत खांब व कळंबोलीनजीक चक्क रेल्वे ट्रकवर जिलेटीन. त्याचप्रमाणे अकोला व नाशिक येथेदेखील रेल्वेमध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने मोठमोठे दगड रेल्वेमार्गावर टाकण्याचे प्रकार घडले आहेत. रेल्वेसेवेला लक्ष्य करण्याचा हा सर्व प्रकार एक धक्कादायक दहशतवादी षड्यंत्राचा भाग आहे. समाजातील काही विघातक शक्ती अराजकता व मानवी संहार माजवण्याच्या हेतूने हे सर्व प्रकार करत असल्याचा दाट संशय आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांनी आपल्या अतिरेकी कारवायांसाठी योजलेली ही नवी युक्ती तर नाही ना अशीदेखील शंका घेण्यास वाव आहे. आजवर मुंबईवर झालेला कुठलाही हल्ला पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. अतिरेक्यांना पकडण्यात भारतीय यंत्रणेने दरवेळेस यश प्राप्त केले आहे. सुगावा व पुराव्यांच्या आधारे दहशतवाद्यांना शिक्षा करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सध्या सर्वात जास्त सोयीचे ठिकाण म्हणून जीवितहानी करण्याच्या हेतूने रेल्वे स्टेशन व परिसराला लक्ष्य करण्यात येत असावे. एक तर येथे होणारे अपघात व त्याने होणारी जीवितहानी याचे कोणतेही पुरावे शिल्लक राहात नाहीत व आरोपींपर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड असल्याची बाब ओळखून रेल्वे लाइनवर लोखंडी-सिमेंटचे खांब व तत्सम वास्तु ठेवून अपघातांद्वारे घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न तर दहशतवादी करत नसावेत ना, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे.

एकतर आज रेल्वेची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे बेभरवशीच आहे. त्यामुळे सर्वात जास्त गुन्हे रेल्वे परिसरातच घडत आहेत. रेल्वे अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असून त्यावर उपाययोजना आखण्याचे कोणतेही प्रयोजन रेल्वेकडे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत अतिरेकी रेल्वेसेवेला अडथळा निर्माण करून घातपात घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यावर अंकुश ठेवण्याचे काम रेल्वेने करायला हवे. आज मुंबई व उपनगरात अनेक अज्ञात व संशयित व्यक्ती निवास करत असून त्यातील फार मोजक्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे परिसराच्या अवतीभोवतीदेखील अनेक अतिक्रमणे व झोपडपट्ट्या वसलेल्या असून तेथे वास्तव्य करणाऱ्या लोकांची देखील एकदा शहानिशा करून घ्यायला हवी. समाज व पोलीस यांच्या डोळ्यात धूळफेक करून वावरणाऱया समाजविघातक शक्तींना रोखणे आगामी काळात अवघड होणार असून अशा व्यक्ती जवळचा व आतंकवाद माजवण्याचा सुरक्षित मार्ग म्हणून रेल्वे सेवेकडे पाहत आहेत. त्यामुळे यापुढे रेल्वेने आपल्या प्रवाशांची सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे. आज मुंबईत राहणारा प्रत्येक व्यक्ती स्वस्त व जलद मार्ग म्हणून रेल्वेसेवेचा वापर करतो, अशी व्यक्ती सहजरीत्या या आतंकवादी हल्ल्याची शिकार होऊ शकते ही बाब विसरून चालणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या