धनु

1835

“धान्याच्या कणाकडे केंबडय़ांचे लक्ष जाते. पण त्यातील मोती राजहंस वेचतो. ग्रहांचा चढ-उतार चालूच असतो. अनुभवातून जो शिकतो तो यशस्वी होतो.’’

तुम्ही उचललेले धाडसी पाऊल मागे घेण्याची गरज नाही. देवाळी नित्यनेमाने येणारी आहे त्याचे स्वागत होईलच. तुमच्या विचारांचा दृष्टिकोन वेगळाच असतो त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात तुम्हाला आनंद असतो. तरीही तुम्ही स्वतंत्रच असता. नरकचतुर्दशी, लक्ष्मी-कुबेर पूजन व दिवाळी पाडवा उत्साहात राहील. भाऊबीजेच्या दिवशी मनावर दडपण राहील. सुप्त चिंता वाटेल. नव्या कार्याचा आरंभ मात्र तुम्हाला करता येईल. वर्षभर कन्या राशीत म्हणजे धनुच्या दशमस्थानात गुरू महाराज राहणार आहेत. ताण-तणाव कमी होतील. अडचणी दूर होतील. २६ जाने. २०१७ ला शनी स्वराशीत प्रवेश करीत आहे. जून ते ऑक्टोबर वक्री शनी वृश्चिक राशीत असेल. २६ ऑक्टोबर २०१७ ला शनी पुन्हा धनु राशीत मागी होत आहे. धनुराशीची अडीच वर्षांची साडेसाती संपलेली असेल. पाच वर्षांची साडेसाती शिल्लक असेल. धनस्थानात म्हणजे मकरेत केतू १९ ऑगस्ट २०१७ ला प्रवेश करीत आहे. अचानक धनलाभ काहींच्या मूळ पत्रिकेनुसार होऊ शकतो. प्रकृतीची मात्र जास्त काळजी घ्यावी. अनाठाई खर्च टाळावा. १२ सप्टेंबर २०१७ तूळ राशीत गुरू प्रवेश करीत आहे. कुटुंबाकडे घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमचा अधिकार वाढला तरी गुप्तकारवायांचासुद्धा सामना करावा लागेल. कल्पनेच्या जगात राहून स्वप्न पूर्ण होत नाही त्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती तुम्ही घ्या. यश मिळेलच. जिद्द ठेवा. सबुरी ठेवा. दुसऱयावर अपयशाचे खापर फोडण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदारीकडे लक्ष द्या म्हणजे निर्णय चुकणार नाही व माणसे तुटणार नाहीत. सविस्तर विचाराने भविष्याचा आढावा घेऊ या.

राजकीय – सामाजिक क्षेत्र:

धनु राशीत साडेसाती सुरू असली तरी राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीची घोडदौड सुरू राहील. अडचणींवर मात करण्याचा आत्मविश्वास वाढतच जाणार आहे. जनतेच्या हिताच्या योजना तयार करून प्रत्यक्ष कृतीत उतरवता येतील. नोव्हें., डिसें., मे व जूनमध्ये आरोप वाढतील. तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळेल. जुलैमध्ये शारीरिक व मानसिक तणाव होईल. जाने., फेब्रु., मार्च, एप्रिलमध्ये मान-सन्मानाचा योग येईल. पदाधिकार मिळेल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. एप्रिल व जुलैमध्ये रागावर नियंत्रण ठेवा. स्फोटक वातावरण विरोधक निर्माण करतील. तसेच प्रवासात सावध रहा. ऑगस्ट, सप्टेंबर २०१७ ला प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. थोरा-मोठय़ांचा सहवास व मार्गदर्शन मिळेल.

नोकरी – व्यवसाय:

शेतकरी वर्गाला मागील दोन वर्षांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु या वर्षात नुकसान भरून काढता येईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. परदेशी जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात सुधारणा करू शकाल. जाने. ते एप्रिल तुम्हाला नवी दिशा मिळेल. थोरा-मोठय़ांचे मार्गदर्शन मिळेल. मनाप्रमाणे घटना घडतील. मान-सन्मानाचा योग येईल. डिसे. व मेमध्ये कामाचा व्याप वाढेल. निष्कारण मनस्ताप होईल. तुमची हुशारी पाहून, तुमची प्रगती पाहून वैमनस्य करणारे लोक सहवासात येतील. जुलै आर्थिक लाभ झाला तरी मनावर एखादे दडपण येईल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. जाने. १३एप्रिलपासून व जुलैमध्ये राग वाढवणाऱया घटना घडतील. हायब्लडप्रेशरचा त्रास संभवतो. नोकरीत आरोप येतील. संयम ठेवा. मार्ग निश्चितच मिळेल.

विद्यार्थी – तरुण वर्गासाठी:

धनु राशीकडे हुशारी असते. संशोधक वृत्ती असते. फक्त तुम्ही नियमितपणा ठेवला पाहिजे. तुमचे यश या वर्षात मोठे असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोव्हे., डिसें, मे, जून व जुलैमध्ये येणाऱया परीक्षेसाठी व्यवस्थित तयारी करा. क्षुल्लक कारणाने उदास होऊ नका. परिस्थितीबरोबर सामना करून मिळवलेले यश अधिक तेजस्वी असते. तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर योग्य ठिकाणीच करा. नाहीतर कुणीतरी त्याचा फायदा घेईल व तुम्ही अडचणीत याल. माणसे ओळखता येतात तुम्हाला. त्याचा उपयोग करा.

महिलावर्ग:

सामाजिक कार्याची आवड असते. प्रेमाने बोलून तुम्ही दुसऱयाचे दुःख समजून घेता. त्यामुळे तुमची मैत्री वाढते. या वर्षात तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. धंदा, नोकरी किंवा इतर क्षेत्रात उन्नतीचा मार्ग मिळेल. जून ते ऑक्टोबरमध्ये गैरसमज व कौटुंबिक अडचणी येतील. वाटाघाटीत वाद होईल. ऑक्टो. व जूनमध्ये आर्थिक व्यवहारात सावध रहा. घर, वाहन, इ. मोठी खरेदी होईल. तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील.

आपली प्रतिक्रिया द्या