98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. स्थळ जाहीर झाल्यापासूनच संमेलन वादात सापडले आहे. प्रकाशक संघाने महामंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. दिल्ली दूर असल्यामुळे प्रकाशकांचा खर्च वाढेल अशी भूमिका प्रकाशक संघाने घेतलेय.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, नागपूरपासून बेळगांवपर्यंत आणि मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत प्रकाशकांचे आम्हाला पह्न आणि मेसेज आले की, साहित्य महामंडळाने हा निर्णय चुकीचा घेतला आहे. साहित्य संमलेन दिल्लीला झाले तर पुणे ते दिल्ली प्रकाशकांचा खर्च वाढणार आहे. विक्री किती होणार यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. आम्हाला प्रवासात किंवा स्टॉलच्या भाडय़ात काही प्रमाणात सूट द्यावी, अन्यथा आम्ही साहित्य संमेलनावर बहिष्कार टापू असा इशारा प्रकाशकांनी दिलाय.
प्रकाशकांच्या विरोधी भूमिका
एकीकडे प्रकाशक संघाने संमेलनाच्या स्थळ निवडीवर नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे मराठी साहित्य दिल्लीत पोहचेल आणि ते तिथे वाचलं जाईल अशी भूमिका प्रकाशक परिषदेकडून घेण्यात आली आहे. प्रकाशक परिषदेचे कोषाध्यक्ष अनिल पुलकर्णी म्हणाले, प्रकाशकांनी बहिष्कार टाकण्यापेक्षा आयोजकांशी चर्चा केली पाहिजे. सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. पुस्तकांची फार विक्री नाही झाली तरी त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल. त्यामुळे प्रकाशकांनी नफा तोटय़ाचा विचार करू नये, दिल्लीत जे काही होईल त्याचा नक्कीच फायदा होईल.’