
संमेलनात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमापूर्वी आज सुरक्षा व्यवस्थेचा अतिरेक पाहायला मिळाला. याचा फटका संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती (निवृत्त) नरेंद्र चपळगावकर यांनाही बसला. सुरक्षेच्या कारणास्तव संमेलनाध्यक्षांची गाडी अडवल्याने ते मुख्य मंडपात पोहोचू शकले नाहीत. याशिवाय काळे कपडे घालून येणाऱया प्रत्येकावर पोलिसांचा वॉच होता. काळे कपडे घातलेल्या लोकांना आत येऊ दिले जात नव्हते. यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची भावना होती. उपमुख्यमंत्र्यांना काळय़ा रंगाची भीती वाटते की काय, अशी चर्चा यानिमित्ताने साहित्य नगरीत रंगली.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना काही स्त्र्ााr-पुरुषांनी वेगळय़ा विदर्भाची मागणी करत घोषणाबाजी केली होती, फलक झळकवले होते. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे सावट आजच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर होते. त्यामुळे सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संमेलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. याचा नाहक मनस्ताप लोकांना झाला.
संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांची कन्या भक्ती चपळगावकर यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली. ‘गेले दोन दिवस सरकारी सुरक्षा व्यवस्थेमुळे माझ्या पंच्याऐंशी वर्षांच्या बाबांना आणि त्यांच्या 88 वर्षांच्या मित्राला, डॉ. सुधीर रसाळ यांना वेळोवेळी अडवण्यात आले. मुख्यमंत्री आले तेव्हा 900 पोलीस होते. आज उपमुख्यमंत्री येणार आहेत. मी प्रत्येक वेळी पोलिसांना समजावून, विनंती करून, ओरडून मार्ग काढला. आज धीर संपला आणि पोलिसांना ओरडले, चालणार नाहीत ते, चालू शकणार नाहीत एवढं! बिचारे पोलीस, ते आदेशाचे पालन करत होते’ अशी पोस्ट भक्ती यांनी लिहिली.
महिला पत्रकाराला त्रास
प्रवेशद्वारावर एका महिला पत्रकाराला काळे जॅकेट, काळी ओढणी घालून मंडपात यायचे नाही, असे सांगण्यात आले. काळे जाकीट काढल्यावर महिला पत्रकाराला आत सोडण्यात आले.
संमेलनाची पोलीस छावणी करणे थांबवा – श्रीपाद जोशी
संमेलनाची पोलीस छावणी करणे थांबवलेच पाहिजे. याहून लज्जास्पद स्थिती अजून किती आपण येऊ द्यायची? त्यासाठी कितीही श्रेष्ठ पदांवरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला-मग ते राष्ट्रपती असोत, पंतप्रधान, मुख्यमंत्री, कोणतेही मंत्री आदींना -संमेलनाच्या व्यासपीठावर आमंत्रित करणे थांबवणेच गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दिली. त्यांना आमंत्रण दिले नाही म्हणून शासनाचे सहाय्य बंद होईल ही भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. आर्थिक सहाय्याच्या बदल्यात आपली संमेलने ही पोलीस छावण्या करून घेणे थांबवण्याचा निर्णय महामंडळाने घ्यावा, असे आवाहन श्रीपाद जोशी यांनी केले.