श्री साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून भाविकांना उदी आणि लाडूचा प्रसाद मोफत मिळतोच. मात्र, अधिकच्या लाडूसाठी संस्थानने सशुल्क आठ काऊंटर सुरू केले असून, तेथून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी कोट्यवधी भाविक शिर्डीत येतात. बाबांच्या समाधी दर्शनानंतर भाविकांना मोफत लाडू आणि उदी दिली जाते. मात्र, मोफतचा प्रसाद हा मर्यादित असतो. अधिकचा प्रसाद पाहिजे असल्यास त्यासाठी शुल्क मोजावे लागते. दर्जेदार शुद्ध तूप, बेसन, काजू, मनुके आणि इलायचीपासून 100 ग्रॅम वजनाचा प्रसाद लाडू तयार केला जातो. वीस रुपये शुल्क आकारून हा प्रसाद भाविकांना दिला जातो. सशुल्क आठ काऊंटरवरून दररोज 50 हजार लाडू पाकिटाची विक्री होत आहे. याशिवाय भाविक मागेल तितके लाडू या प्रसाद काऊंटरवरून दिले जातात. महिन्याला 15 लाख, तर वर्षाकाठी दोन कोटींपेक्षा अधिक प्रसाद लाडू विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
शिर्डीत वर्षभर देश-विदेशातून साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात. याशिवाय विविध उत्सव आणि सणावेळी लाखोंच्या संख्येने भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी प्रसाद लाडूंना मोठी मागणी असते. त्यातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.
येणाऱ्या साईभक्तांच्या निवासाची, भोजन तसेच आरोग्य व चहापानाची व्यवस्थाही संस्थानकडून केली जाते. साईआश्रम, धर्मशाळा, द्वारकातील 1500 रूम येथून साई समाधी मंदिर आणि भोजनालयात जाण्यासाठी बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह जवळपास चार हजार कर्मचारी अविरतपणे २४ तास भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असतात.