।। श्री साईगाथा ।। भाग -२४ साईचे वात्सल्य

विवेक दिगंबर वैद्य

जळगाव  येथे उतरल्यावर आपणांस शोधत आलेला शिपाई पाहून रामगिरबापू सुखावले. अवघ्या दोन आण्यामध्ये जामनेर आणि त्यापुढे आपल्या गावास कसे जावे म्हणून चिंतातुर झालेल्या रामगिरबापूंना नानासाहेबांनी टांगा पाठविल्याचे पाहून हायसे वाटले. बहुतेक बाबांनीच नानासाहेबांना आगाऊ सूचना देऊन आपल्याकरिता टांगा पाठविला असावा असा विचार करीत ते टांग्यात बसले.

शिपाई खासा हुशार व चपळ होता. कल्लेदार मिश्या आणि झुबकेदार दाढी राखलेला, नीटनेटका पेहराव असलेला शिपाई वेगाने टांगा हाकत निघाला. रात्रीची वेळ असली तरीही सावधपणे टांगा हाकत पहाटेस विश्रांतीकरिता त्याने एका ओढय़ाजवळ टांगा थांबविला. घोडे पाणी पिण्याकरिता सोडून शिपायाने न्याहारीची पिशवी उघडली आणि त्यातील आंबे, पेढे व गूळपापडी आदी जिन्नस बाहेर काढून एका कपडय़ावर अंथरले. त्याच्याकडील फराळाचे सामान पाहून रामगिरबापूंच्या मनात संशय निर्माण झाला. शिपाई बहुधा मुसलमान असावा असा संशय त्यांच्या मनात येताच शिपाई म्हणाला, ‘शंका घेऊ नका, मी क्षत्रिय आहे. हिंदू गढवाल, जातीने राजपूत आहे आणि हा फराळ तुमच्याकरिता नानासाहेबांनी दिला आहे, तेव्हा निश्चिंत मनाने खा.’ दोघांनीही फराळ केला आणि त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला.

सूर्य उगवण्याच्या सुमारास टांगा गावात शिरला. नानांची कचेरी समोरच दिसू लागली हे पाहून शिपायाने विश्रांतीसाठी टांगा थांबवला. रामगिरबापू देखील प्रातर्विधी उरकण्यासाठी खाली उतरले व आडबाजूस गेले. तेथून काही वेळाने परत येऊन पाहतात तो तेथे टांगा नाही, टांगेवाला नाही आणि घोडे देखील नाहीत. आजूबाजूस काही खुणाही दिसेना. रामगिरबापूंना काही कळेनासे झाले आणि तशातच ते चालत नानासाहेबांच्या कचेरीपाशी गेले तेव्हा त्यांना समजले की नानासाहेब घरी आहेत. रामगिरबापू अर्थातच नानांच्या घरी गेले. नानासाहेबांची भेट घडताच रामगिर यांनी झोळीतून उदीची पुडी व आरतीचा कागद दिला आणि नानासाहेबांना साईबाबांचा निरोपही दिला.

त्याच सुमारास नानांची मुलगी मैना बाळंतपणात वेदनेने तळमळत होती. नानासाहेबांनी लागलीच पत्नीस हाक मारली व मुलीला पाण्यातून उदी मिसळून देण्यास सांगितले आणि स्वतः आरतीचा कागद हाती घेऊन ते साईंची आरती म्हणू लागले. या कालावधीमध्ये काही क्षणांचाच वेळ गेला असावा, मात्र उदीयुक्त पाणी घेताच मैनाताईंच्या वेदना थांबल्या आणि निर्विघ्नपणे ती प्रसूतदेखील झाली. मैनाताईंना आराम पडला आणि सुखरूपपणे बाळंतीण होऊन ती निश्चिंत पावली. याकारणाने अर्थातच सर्वचजण आनंदित झाले.

24-saibaba-2

रामगिरबापूंनी नानासाहेबांकडे टांगेवाल्याचा विषय काढला आणि घडलेला प्रसंगही त्यांना सांगितला त्यावर ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “मी टांगेवाल्यास पाठविलेच नव्हते. तुम्ही येथे येणार हेच ठाऊक नव्हते तर मी टांगा कसा पाठवेन?’’ प्रसंगाचे औचित्य लक्षात येताच रामगिरबापू आणि नानासाहेब या दोघांनाही साईंच्या वात्सल्याची आणि त्यांच्यामधील माऊलीतत्त्वाची खूण पटली. नानासाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. कुठला टांगा आणि कुठला शिपाई? आपल्या प्रिय भक्तावर ओढवणारे संकट जाणून साईमाऊलीने जणू कल्पनेचे एक अफाट विश्व उभे केले. नानासाहेबांना उदी हवी असल्याचे कळताच बाबांनी हा मायेचा खेळ उभारला आणि त्यात रामगिरबापूंच्या गावाला जाण्याच्या इच्छेपासून ते शिपाई आणि टांग्याच्या निमित्तापर्यंतचा अतर्क्य खेळ मांडून नानासाहेबांपर्यंत उदी पोहोचवली. साईबाबांच्या लीला खुद्द साईबाबाच जाणोत!

असे हे उदीचे माहात्म्य आणि महिमान आहे. उदी ही शिवशंकराचे ‘भूषण’ आहे. भक्तांकरिता साईंची ही प्रेमळ ‘भेट’ आहे. शुचिर्भूत होऊन, साईनामाचे उच्चारण करीत, साईचरणांवर नितांत श्रद्धा व दृढ आत्मभाव राखून, जो कुणी भक्त कपाळावर ही उदी लावेल अथवा सर्वांगास ही उदी फासेल त्यास कळिकाळाचेही भय उरणार नाही हे साईंचे सत्यवचन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या