संत गोपालदास यांचे आंदोलन, अमित शहांच्या पुढ्यात टाकला मेलेला बैल!

सामना ऑनलाईन । रोहतक

हरयाणा आणि दिल्लीतील गायरान जमिनीसाठी गेले ६२ दिवस उपोषण करत आलेले संत गोपालदास यांनी गुरुवारी हरयाणातील रोहतक येथे पोलीस यंत्रणेला आणि भाजप नेत्यांना चांगलेच हादरवून टाकले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे८०० मीटर अंतरापर्यंतचे सुरक्षा कवच भेदून आत घुसून गोपालदास यांनी जोरदार निदर्शने केली.

भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करतानाच स्वतःला आसूडाने फटके मारून घेत त्यांनी आत्मक्लेष आंदोलन केले. इतकेच नव्हे तर, अमित शहा यांचे सुरक्षा कडे तोडण्याआधी गोपालदास यांनी मेलेला बैल जेसीबीने वाहून नेऊन शहा यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी टाकला. त्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांची आणि भाजप नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. संत गोपालदास यांना त्यांच्या काही कार्यकर्त्यांसहित पोलिसांनी या आंदोलना वेळी ताब्यात घेतले.

पत्रकार परिषदेतही दोघे जण घुसले
अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेतसुद्धा संत गोपालदास यांच्या दोन कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली होती. पोलिसांनी दादरी येथील संजीव आणि दिल्ली येथील हरीश या दोघांना पकडले आहे.

जबरदस्त सुरक्षेचा फज्जा
अमित शहा हे गुरुवारी तिलियार कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी जबरदस्त ‘पोलीस फोर्स’ तैनात करण्यात आला होता. त्यात दोन पीसीआर, चार रायडर, प्रोटेक्शन गार्डस, सहा फलटणी, पाच हॉर्स फोर्स, सीपीटी टीम, सीआयए आणि स्वेट टीम, एसपी सिक्युरिटी, गुप्तचर अधिकारी यांचा समावेश होता. अमित शहा हे सुरक्षा कड्यापासून ८०० मीटर आत काही मंत्र्यांशी चर्चा करत बसले होते. मात्र त्याचे सुरक्षा कवच भेदून आत घुसण्यात संत गोपालदास आणि त्यांचे कार्यकर्ते सफल ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या