
बॉलिवूडमधील चित्रपट निर्माता साजिद खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. ‘मी टू’ चळवळीच्या अंतर्गत लैंगिक छळाचा आरोप झालेल्या साजिदवर आता दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत.
गेल्या आठवड्यात बीबीसीवर जिया खानवर आधारित ‘डेथ इन बॉलिवूड’ हा टीव्ही शो प्रसिद्ध करण्यात आला. हा कार्यक्रम फक्त युकेमध्ये दाखवण्यात आला होता. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जिया खान हिची बहिण करिश्मा हिने साजिदवर बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला.
हा किस्सा ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचा आहे. चित्रिकरणासाठी रिहर्सल सुरू होती आणि जिया स्क्रिप्ट वाचत होती. त्याच वेळी साजिदने तिला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले. साजिदच्या या विधानामुळे तिला धक्का बसला पण ती शांत बसली. याबाबत तिनेच आपल्याला सांगितले होते, असेही करिश्मा म्हणते. चित्रपटाचे चित्रिकरण अद्याप सुरुही झाले नव्हते आणि हे असे सर्व होत होते. त्यामुळे ती फार अस्वस्थ होती. ती घरी आली आणि रडत बसली होती, असेही तिने सांगितले.
पुढे करिश्मा म्हणते की, जियाने तिला रडत रडत सांगितले होते की ती कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधलेली आहे. जर हा चित्रपट सोडला तर तिचे नाव बदनाम केले जाईल. जर तिने चित्रपटात काम सुरू ठेवले तर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला जाईल. सर्वच बाजूने ती अडकली होती. पण अखेर तिने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.
करिश्माने आणखी एक किस्सा सांगितला. मला आठवतेय की मी जिया सोबत साजिद खानच्या घरी गेले होते. त्यावेळी मी 16 वर्षांची होते आणि फक्त स्ट्रॅपी टॉप घातलेला होता. साजिद एकसारखा मला बघत होता आणि हिला सेक्स करायचा आहे का असे म्हणाला. यावर जियाने त्याच्यासोबत वादही घातला होता असेही तिने सांगितले.
Reminder that Sajid Khan is not in jail yet. pic.twitter.com/cZ5I8Rrys0
— Sidd (@siddanthdaily) January 18, 2021
दरम्यान, जिया खान हिने 2013 मध्ये आत्महत्या केली. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत तिने अमिताभ बच्चन (निशब्द), आमिर खान (गजनी), अक्षय कुमार (हाऊसफुल्ल) या दिग्गज कलाकारांसोबत काम केले.